Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

प्रादेशिक

कोकणात रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही - तटकरे
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी

कोकणाच्या विकासासाठी शासनाने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे कोकण भूमी प्रतिष्ठानने कोकणात गेली दोन-तीन वर्षे चालविलेल्या कृती परिषदेचा परिणाम असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री सुनील तटकरे यांनी केले. कोकणात पर्यावरणाचा ऱ्हास करणारे कोणतेही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, असा पवित्रा तटकरे यांनी यावेळी घेतला. ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे आज मुंबई येथील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात ‘कोकण व्हिजन २०२०’ या परिषदेत ते बोलत होते.

नाकाबंदी केली असती तर यश जिवंत सापडला असता!
डोंबिवली, २८ जून / प्रतिनिधी

यश अनिल शहाच्या हत्येने डोंबिवली शहरातील प्रत्येक माणूस हळहळला आहे. रविवारी सकाळपासून शहरातील आमदार, नगरसेवक, व्यापाऱ्यांनी स्वतंत्रपणे रामनगरमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. येत्या सात दिवसापर्यंत याप्रकरणाचा तपास लागला नाहीतर भाजप डोंबिवली शहर आणि व्यापाऱ्यांतर्फे शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या शिपायाने केली सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी
वांद्रे रेल्वे स्थानकात बंदोबस्तावर असणारा रेल्वे सुरक्षा दलाचा शिपाई शिवराम शर्मा याने आज सकाळी आपला सहकारी उदय सिंह याची रायफलीने गोळ्या झाडून हत्या केली. आठ महिन्यांपूर्वी राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातून मुंबईत बदली झालेला शिवराम व मृत उदय हे दोघेही वांद्रे स्थानकात बंदोबस्तावर होते. सुरक्षा दलाच्या शिपायांना आराम करण्यासाठी असलेल्या बॅरेकमधून सकाळी अकराच्या सुमारास सात गोळ्या झाडल्याचा आवाज आला. रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले असता, उदय सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर शिवराम रायफल घेऊन उभा होता. पाच गोळ्या उदयच्या पोटात आणि छातीत घुसल्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हत्येमागील कारण मात्र कळू शकलेले नाही.

नीराबेन देसाई यांचे निधन
मुंबई, २८ जून/प्रतिनिधी

स्त्री चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक व कार्यकर्त्यां नीराबेन देसाई यांचे गुरुवार, २५ जून रोजी कर्करोगाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. १९७५ साली भारतीय सामाजिक शास्त्र अनुसंधान परिषदेतर्फे नीराबेन, वीणा मुजुमदार आदींना स्त्रियांच्या परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. देशभर हिंडून तयार केलेला त्यांचा हा अहवाल हे भारतीय स्त्री चळवळीचे मूळ होते. परिणामी यूजीसीने स्त्री-अभ्यास केंद्रे चालू करण्याचे ठरवले व नाथीबाई ठाकरसी विद्यापीठाला पहिले केंद्र चालू करण्याचा मान मिळाला. त्याचे संचालकपद नीराबेनकडे निर्विवादपणे आले.

मंत्री असल्याने हात बांधले गेले आहेत-हंडोरे
मुंबई, २८ जून / प्रतिनिधी
रस्त्यांवर उतरून आंदोलन करणे मला आवडते, मात्र मंत्री असल्याने हात बांधले गेले आहेत, असे उद्गार सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवाशक्ती संघटनेने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात हंडोरे बोलत होते. मागासवर्गीयांचे कर्ज माफ केल्याबद्दल हंडोरे यांचा खासदार संजय निरुपम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हंडोरे यांनी सांगितले की, मी पँथर चळवळीत होतो. मंत्री झालो तरी आपल्यातील पँथर जागा आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार मागासवर्गीयांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असा दावाही हंडोरे यांनी यावेळी केला. संघटनेचे सचिन सावंत यांनी प्रास्ताविक केले.

सूर्या नदीत बुडून दोघांचा मृत्यू
ठाणे, २८ जून/प्रतिनिधी

सूर्या नदीवर पोहण्यासाठी रविवारी गेलेल्या १५ वर्षे वयाच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मनोर गावातील दीपकेतन अर्धयू (१५) व विश्वजित पारसिंग (१५) या दोघांचा मृत्यू झाला. दीपकेतनचा मृतेदह सापडला असून विश्वजितचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध चालू होता.