Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

माध्यमिक सोसायटीच्या सभेत गुरूजनांचा धुडगूस! पाच मिनिटांतच सभा गुंडाळली
नगर, २८ जून/वार्ताहर

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ६६ वर्षाच्या इतिहासातील वार्षिक सभेत आज प्रथमच जोरदार घोषणाबाजी, शिव्यांची लाखोली, धराधरी, जोरदार धक्काबुक्की करीत माईक फेकून देणे असे धुडगूस घालणारे प्रकार घडले. या गोंधळामुळे अवघ्या पाच मिनिटांतच सभा गुंडाळण्यात आली! सभेनंतर सत्ताधाऱ्यांची शिक्षक सोसायटी सभागृहात, तर विरोधकांची सहकार सभागृहात प्रतिसभा पार पडली.

‘पांढरे सोने’ पुन्हा काळवंडणार? दुसऱ्या वर्षीही लागवड उशिरा
नगर, २८ जून/प्रतिनिधी
मान्सूनच्या पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्य़ातील सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर अजूनही मोठय़ा प्रमाणात कापूस लागवड होऊ शकलेली नाही. या आठवडय़ात समाधानकारक पाऊस न झाल्यास कपाशीची उशिराने होणारी लागवड, त्यामुळे घसरणारा पिकाचा दर्जा, रोगराईचे संकट आणि परिणामी लक्षणीय घटणारे उत्पादन या नकारात्मक स्थितीला उत्पादकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे कपाशीचे जवळपास ३०० कोटींचे अर्थकारण आताच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे.

वकिलीचे दिवस
सन १९४५च्या मे महिन्यात मला वकिलीची सनद मिळाली. संगमनेरला वकिली सुरू केली. ते वर्ष मुदतीच्या तापाने आणि न्यूमोनियाच्या आजारात गेले. अधून-मधून कोर्ट-कचेरीत जाणे-येणे झाले एवढेच. १९४५-४६ मध्ये संगमनेर शहरात प्लेगची साथ सुरू झाली. काही अधिकारी व इतर थोडे वगळले, तर बहुतेकांनी गाव सोडून कुटुंबासहीत बाहेर वस्ती केली. मीही त्याला अपवाद नव्हतो. धांदरफळला कुटुंबासहीत राहू लागलो. कोर्टाची कामे सरकारी हुकुमानेच बंद होती. त्यामुळे वकिली व्यवसाय जवळजवळ बंद होता. तेव्हा वकिलांची संख्या मर्यादित असली, तरी मी सगळ्यात खूप नवीन होतो.

बाह्य़वळण रस्ताकामास रेल्वेचा खोडा!
सागर वैद्य, नगर, २८ जून

अडथळे पार करीत पूर्णत्वास येत असलेल्या नगर शहराभोवतीच्या बाह्य़वळण रस्त्याच्या कामास आता सोलापूरस्थित रेल्वे क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खोडा घातला जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा रेल्वे अधिकारी दाद देत नसल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनीच या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत राजकारण नको - विखे
नगर, २८ जून/प्रतिनिधी

राज्य सरकारने ११वी प्रवेशासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विरोध करताना विद्यार्थी राजकीय नसतात, याचे तरी भान राजकीय पक्षांनी ठेवावे, असा सल्लावजा टोला शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेना व या प्रक्रियेच्या विरोधकांना मारला.

भगवतीपूर ट्रस्ट विखेंची मालमत्ता नाही - कर्डिले
कोल्हारमध्ये बेमुदत ‘बंद’ सुरू

कोल्हार, २८ जून/वार्ताहर

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट म्हणजे विखेंची खासगी मालमत्ता नाही किंवा त्यांच्या पैशातून मंदिर उभे राहिलेले नाही. विधीमंत्री विखेंनी कायदे व नियम धाब्यावर बसवून ट्रस्टवर आपल्या मर्जीतील लोकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. आपले काळे धंदे उघड होतील, या भीतीपोटी त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून आपणास भाषणाची परवानगी नाकारली, अशी घणाघाती टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.

माणिकमोती फोर्जिगमध्ये अडीच लाखाची चोरी
नगर, २८ जून/प्रतिनिधी

नगर-दौंड रस्त्यावरील माणिकमोती फोर्जिग प्रश्न. लि. कंपनीतून आज पहाटे तीन चोरटय़ांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीक मशिन पार्ट चोरून नेले. पहाटे साडेचारच्या दरम्यान कंपनीच्या रखवालदारास आवाज आल्यामुळे त्याने कंपनीत जाऊन बघितले. त्यावेळी कंपनीच्या उत्तरेकडील भिंतीची जाळी तोडून अज्ञात तिघे मशिन पार्ट घेऊन पळत असल्याचे रखवालदाराने पाहिले. त्याने पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून गेले. या प्रकरणी कंपनीचे संचालक शरद मुनोत (रा. सथ्था कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

जीपची धडक बसून वारक ऱ्याचे निधन
नगर, २८ जून/प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी दिंडीने निघालेल्या नगर तालुक्यातील वारकऱ्याचा आज जीपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश निवृत्ती काळे (वय ४५, हिवरेझरे, तालुका नगर) असे मृताचे नाव आहे. ते दिंडीचे मृदंगवादक होते. दुपारी चारच्या सुमारास करमाळा (जिल्हा सोलापूर) येथे रस्त्याने जात असताना जीपने काळे यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना नगरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सायंकाळी साडेसात वाजता त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेतनासाठी मृतदेह हलविण्यात आला. कोतवाली पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली.दरम्यान, काळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरातील वारकरी, नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली.