Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २ ० ० ९

‘डिसइन्व्हेस्टमेंट’ हेच औत्सुक्य!
आता अर्थसंकल्पासाठी फक्त एक आठवडा उरला आहे. तोपर्यंत त्यात काय असणार याचे तर्कवितर्क चालूच राहतील. मग अलिबाबाची गुहा उघडल्यावर शेअर बाजारासाठी सर्व गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील. कुठल्या उद्योगक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात सवलती असतील तिथे निवेशकांचा रोख वळेल हे उघड आहे. त्यात निर्यातप्रधान क्षेत्राला उजवे माप असेल. वर उद्योग ही भारताची एक मिरासदारी होतील. पण ती परिस्थिती आता उरलेली नाही. हिरेजडजवाहिराची निर्यातही मोठय़ा प्रमाणावर होती. पण अमेरिका व इतरत्रही सधनांची संख्या कमी होत असल्याने ही निर्यात इथे सवलती देऊन वाढणार नाही. तरीही अमेरिकेची अर्थव्यवस्था २००९ च्या अखेरीस सुधारणार आहे असा आशावाद आता प्रकट होऊ लागल्याने, वस्त्रोद्योगातील आलोक टेक्स्टाइल्स व हिरे जवाहिर क्षेत्रातील राजेश एक्स्पोर्टस यांचा विचार माफक गुंतवणुकीसाठी होऊ शकतो. दिवाळीनंतर त्यांच्या किमती वाढाव्यात.
आलोक इंडस्ट्रिजचे भागभांडवल १९८ कोटी रुपये आहे. शेअरची दर्शनी किंमत १० रुपये आहे. पुस्तकी किंमत ७१.८०

 

रुपये आहे. कंपनीला भागभांडवलाच्या जवळजवळ तिप्पट कर्ज आहे. मार्च २००३ ते २००९ या सहा वर्षासाठीची विक्री अनुक्रमे ७९५, ११२०, १२८५, १४५४, १८५९, २१७० व २९६६ कोटी रुपये होती. मार्च २००९ वर्षाचा नक्त नफा १८८ कोटी रु. होता. कंपनीचे शेअरगणिक उपार्जन ९.५६ रुपये आहे. रोख उपार्जन तर २२.११ रुपये आहे. गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे ५१ रुपये व १३ रुपये होता. सध्याचा २२ रुपयांचा भाग बघता किं/अु गुणोत्तर २.४० पट दिसेल. १८ ते २० रुपयांपर्यंत खरेदी होऊ शकली तर वर्षभरात ८० टक्के नफा सुटावा. कमी किमतीत मिळणारा हा उत्तम शेअर आहे. जनतेकडे ६४.४३ टक्के शेअर्स आहेत.
कंपनीच्या विक्रीपैकी मार्च २००९ वर्षातील निर्यात ९९७ कोटी रुपये होती. गतवर्षाच्या ७५६ कोटी रुपयांपेक्षा ती ३२ टक्के जास्त आहे. तिचे कारखाने वापी व सिल्व्हासा इथे आहेत. टेरी टॉवेल्सचे प्रचंड उत्पादन असणाऱ्या आलोक इंडस्ट्रीजचा वापीचा नवा कारखाना जानेवारी २००९ मध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे मार्च २०१० ची विक्री व निर्यात नक्कीच लक्षणीय असेल.
सध्या एनटीपीसी सतत प्रकाशझोतात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून २६.७ लक्ष स्टॅंडर्ड क्यूबिक मीटर नैसर्गिक वायू ती ४.२ डॉलरच्या दराने (सुमारे २०५ रुपये) घेण्याचा करार करायला राजी आहे. हा दर एक दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी असेल. कावस व गंधार क्षेत्रातील नैसर्गिक वायूबद्दल तिचा रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर वाद चालू असला व रिलायन्स इंडस्ट्रीज, आरएनआरएलला न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे २.३४ डॉलरला एक दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटस जो वायू देणार आहे. त्याच दराने तो कृष्णा गोदावरी खोऱ्यातून निघणारा वायू एनटीपीसीला द्यायचा असला तरीही एनटीपीसी या वेगळ्या कराराला राजी आहे. कावस व गंधार क्षेत्रातला वायू १७ वर्षे स्वस्त दराने रिलायन्स इंडस्ट्रीजने पुरवावा या मुद्दय़ावर सध्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत.
एनटीपीसीला आंतरराष्ट्रीय क्षेत्रातूनही मोठय़ा प्रमाणावर नैसर्गिक वायूच्या कंपन्या विकत घ्यायच्या आहेत. त्यासाठी तिच्याजवळ ८,००० कोटी रुपये (१७० कोटी डॉलर्स) तयार आहेत. त्यासाठी कॅबिनेटच्या संमतीचीही जरूर नाही असा एक प्रस्ताव सध्या विचारात आहे. सध्या एका प्रकल्पासाठी कमाल १,००० कोटी ती घालू शकते. आग्रहण, संयुक्त प्रकल्प, पोटकंपन्या या तीन प्रकारे ती आपला विस्तार करू शकेल. ऊर्जा मंत्रालयाने, कंपनीला आपल्या नक्त मूल्याच्या १५ टक्के रक्कम एका प्रकल्पात व ५० टक्के सर्व प्रकल्पात घेण्याची परवानगी असावी असा एक प्रस्ताव संबंधित मंत्रालयाकडे विचारासाठी पाठविला आहे.
एनटीपीसीचे भांडवल ८,२४६.४५ कोटी रुपये असे प्रचंड आहे. त्यात केंद्रशासनाची टक्केवारी ८९.५० इतकी आहे. संस्थांकडे, कंपन्यांकडे उरलेले १०.५ टक्के आहेत. तिची २००३ ते २००९ मार्च या सात वर्षाची विक्री अनुक्रमे १९०४८, १८८६८, २२७३२, २६९०५, ३२८१७, ३७०९१ व ४४२४५ कोटी रुपये होती. नक्त नफा अनुक्रमे ३८०८, ५२६१, ५८०७, ५८२०, ६८६५, ७४२३ व ८०९२ कोटी रुपये होता.
एनटीपीसीचे शेअरगणिक उपार्जन नऊ रुपये ८१ पैसे आहे. सध्याच्या १९५ रुपये भावाला किं/अु गुणोत्तर सुमारे २० पट आहे. तिचा वर्षभरातील कमाल व किमान भाव २३३ व ११३ रुपये होता. केंद्र शासनाने फक्त ३० टक्के निर्निवेशन जरी १६० रुपयाने करायचे ठरविले तरी २५० कोटी शेअर्सचे तिला ४०,००० कोटी रुपये मिळतील. ही रक्कम कंपनीलाच जर पुढच्या वाढीसाठी दिली किंवा तिची कर्जे कमी करण्यासाठी दिली तरी तिचे नक्त मूल्य सुधारेल. सध्या या शेअरचे पुस्तकी मूल्य ६७ रुपये आहे. ते एकदम ११० रुपयांवर जाईल. एकूण नक्त मूल्य एक लक्ष कोटी रुपये होईल.
जगाच्या बाजारात एनटीपीसी एकदम वरच्या क्रमांकावर जाईल. तिची आग्रहणशक्ती वाढेल. नवीन ऊर्जा प्रकल्पांसाठी ती कितीतरी कर्ज वाटण्यास उभे करू शकेल.
भेल या दुसऱ्या ऊर्जा कंपनीचे भांडवल फक्त ४८९.५२ कोटी रुपये आहे. मार्च २००९ वर्षाची विक्री २७,१४४ कोटी रुपये होती; नक्त नफा ३११५ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन ६३.३४ रुपये होते. सध्याच्या २,१०० रुपये भावाला किं/अु गुणोत्तर ३४ पट आहे. वर्षातील कमाल व किमान भाव २,४०० व ९८१ रुपये होता. त्या मानाने एनटीपीसी स्वस्त आहे.
एनटीपीसीला जर ३० पट गुणोत्तर वाजवी धरले तर पुढील तीन वर्षात या शेअरचा भाव ४०० रुपयांवर जावा. भेलची विक्री अंशत: करून एनटीपीसीतील गुंतवणूक दीर्घ मुदतीच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरेल. भेलमध्ये गेल्या पाच वर्षात निवेशकांना दहा पट वाढ, बक्षीस भाग धरून मिळाली आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षे एनटीपीसीतली गुंतवणूक दहा पट नसली तरी बरीच वाढ होईल. निर्निवेशन झाले तर एनटीपीसीचे चित्र आणखी झळाळेल. एका मोठय़ा ऊर्जाकेंद्रावर निवेशकांना बसण्याची ही संधी आहे. हा शेअर आज घेतला तर तो पुढल्या पिढीसाठी कामधेनू ठरेल. पण त्यासाठी ‘तुरत दान महापुण्य’ ही वृत्ती नको.
वसंत पटवर्धन
०२०-२५६७०२४०