Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
ठकाचे हृदयपरिवर्तन

नानकदेव आणि मरदाना यांचे झोपेत गळे दाबून प्राण घ्यायचे असा शेखचा बेत होता आणि त्याच आसुरी योजनेचा विचार करीत तो पलंगावर पहुडला. थोडा वेळ झोप घेऊन ताजेतवाने व्हावे आणि मग कार्यभार साधावा असे त्याने ठरविले. पण त्याला काही केल्या झोप येईना. उगाच मन भरकटू लागले. त्याला कळेना असे का होते आहे? खरे तर एखाद्याला गाढ झोपवून त्याचा गळा आवळण्याचा त्याचा फार जुना उद्योग. एकदा त्याने हातपाय झाडून, मुठी आवळून, गडागडा हसून पाहिले.. पण त्याचे भसाडे हसणे एकदम थांबले. कुणीतरी सुरेल स्वरात गात होते. असे मधुर संगीत शेखने आजवर ऐकलेले नव्हते. संगीताच्या योगाने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, हे त्याला अगदी नवीन होते. अगदी अलगद त्याचे पाय नानकदेवांच्या खोलीकडे वळले. खिडकीतून त्याला दिसले : गुरुजी डोळे मिटून ध्यानस्थ बसलेत. मरदाना आपल्या रबाबाच्या सुरेल संगीतावर त्यांचे भजन गुणगुणतो आहे. सारी खोली एका अद्भुत प्रकाशाने उजळून निघालेली आहे. शेखने नकळत हात जोडले. त्याच्या आयुष्यात एखाद्या अपूर्व आनंदाने अश्रू अनावर होण्याचा प्रसंग यापूर्वी कधी आलेला नव्हता. शेखचे सजन व सज्जन हे नाव चरितार्थ झाले. तो गुरुजींपाशी येऊन त्यांच्या चरणांवर लीन होऊन अश्रू ढाळू लागला. नानकदेवांनी सहजस्नेहाने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांच्या ओठावर भजन आले..
उजलु कैहा चिलकणा घोटिम कालडी मसु।
धोतिआ जूठि न उतरै जै सउ धोआ तिसु।।
सजण सेई नालि मै चलदिआ नालि चलन्हि।
जिथै लेखा मंगिऐ तिथै खडे दिसंनि।।
(श्रीगुरुग्रंथसाहिब : राग : सूहीमहला : १ पृ. ७/२९)
कौसा अथवा कांस्य हा धातू पांढरा दिसतो, चमकतो. पण जर त्याचे घर्षण केले तर तो काळा पडतो. त्याप्रमाणे अंतरंगात जर मळ असेल, अपावित्र्याने मनात घर केले असेल, तर केवळ वरवरच्या सफाईने ते जात नाही. शेकडो वेळा धुऊनही तो मळ निघत नाही. ही झाली दुर्जनांची स्थिती. याउलट सज्जनांचे असते. ते जिथे कुठे जातात तिथे सोबती होऊन जातात. त्यांना जीवनपथावर कुठेही तुम्ही भेटा, जीवनातल्या भल्या-बुऱ्याचा त्यांना विचार करता येतो. आपल्या पाप-पुण्याचा, चांगल्या-वाईटाचा हिशोब झट्दिशी सांगता येतो. शेखने हे शब्द ऐकले आणि तो अधिकाधिक अंतर्मुख होत राहिला.
अशोक कामत

कु तू ह ल
वॅन अ‍ॅलनचे पट्टे
वॅन अ‍ॅलनचे पट्टे हे काय आहेत?
एखाद्या ग्रहाच्या गाभ्यात जर द्रव अवस्थेतील लोह असेल तर ग्रहाच्या स्वत:भोवतीच्या फिरण्यामुळे त्यात विद्युतप्रवाह निर्माण होतो. हा विद्युतप्रवाह त्या ग्रहाबरोबर फिरत असल्यामुळे त्या ग्रहात एक विद्युतचुंबक तयार होते आणि त्या ग्रहाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे चुंबकीय क्षेत्र त्या ग्रहाच्या दिशेने बाहेरून आलेल्या विद्युतभारित कणांची दिशा बदलू शकते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली २,९०० ते ५,००० कि.मी. या भागात लोह आणि निकेल हे धातू द्रव अवस्थेत आहेत. यामुळे पृथ्वीला चुंबकत्व लाभून पृथ्वीभोवतीही चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. सूर्यापासून आलेल्या बऱ्याच विद्युतभारित कणांची दिशा जरी हे क्षेत्र बदलत असले तरी काही कणांना ते आपल्याकडे ओढून घेते. आपल्याकडे ओढून घेतलेले हे विद्युतकण एका ठराविक प्रदेशात पट्टय़ांच्या स्वरूपात पृथ्वीभोवती एकत्रित झालेले असतात. याच पट्टय़ांना वॅन अ‍ॅलन या अमेरिकन शास्त्रज्ञाच्या नावे ओळखले जाते. अशा प्रकारचे पट्टे हे ज्या ग्रहांभोवती चुंबकीय क्षेत्र आहे अशा सर्व ग्रहांभोवती आढळतात. पृथ्वीभोवती असे दोन पट्टे आहेत. यापैकी आतील पट्टा हा २,००० ते ५,००० कि.मी. उंचीवर पसरलेला आहे. या भागात आपल्याला प्रामुख्याने प्रोटॉन सापडतात. बाहेरील पट्टा हा १६,००० कि.मी. उंचीवर असून याची जाडी सुमारे ६,००० कि.मी. आहे. या भागात आपल्याला इलेक्ट्रॉन किंवा ऋण विद्युतभारित कण सापडतात. विद्युतभारित कणांनी व्यापलेले अशा प्रकारचे प्रदेश सापडण्याची शक्यता अंतराळयुग सुरू होण्यापूर्वीच व्यक्त केली गेली होती. इ.स. १९५८ साली सोडण्यात आलेल्या अमेरिकेच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहावर, आयोवा विद्यापीठातील वॅन अ‍ॅलन यांच्या सूचनेनुसार विद्युतभारित कणांची नोंद घेणारे उपकरण बसवून, या पट्टय़ांचा प्रत्यक्ष वेध घेण्यात आला.
अरविंद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
कोल्हटकर घराणे मूळचे रत्नागिरीचे. पण कोल्हटकरांचे बालपण अकोला व बुलढाण्यात गेले. २९ जून १८७१ रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या १०व्या वर्षी अर्धागवायूचा झटका आल्याने त्यांचे तोंड व जीभ वाकडी झाली. उच्चारही स्पष्ट करता येईनात, त्यामुळे एकाकीपणाची वृत्ती बळावली. मॅट्रिक पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले. कॉलेजात असतानाच व्यायाम, खेळ व गाणे बजावण्यापासून गप्पांचाही शौक त्यांना जडला. साहित्यिक कारकीर्दीचा श्रीगणेशा त्यांनी समीक्षा लेखनाच्या माध्यमातून केला. ‘विक्रमशशिकला’ आणि ‘शापसंभ्रम’ या नाटकांवरील त्यांच्या समीक्षा गाजल्या. किलरेस्कर नाटक मंडळींनी त्यांचे पहिले नाटक ‘मूकनायक’ रंगभूमीवर आणले. त्यानंतर ‘जन्मरहस्य’, ‘मतिविकार’, ‘सहचारिणी’, ‘शिवपार्वतीय’, ‘वधूपरीक्षा’ ही नाटके, ‘गाणारे यंत्र’, ‘पती हाच श्रेष्ठ अलंकार’, ‘संपादिका, श्यामसुंदर’ हे कथासंग्रह, ‘गीतोपायन’ हा काव्यसंग्रह, त्यांचे आत्मवृत्त आणि ‘भारतीय ज्योतिर्गणित’ नावाचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. याशिवाय काही लघुकथा, कादंबऱ्याही त्यांच्या नावावरआहेत. तथापि, मराठी साहित्यात त्यांचे नाव कायम कोरले गेले, ते त्यांच्या ‘सुदाम्याचे पोहे’ या विनोदी लेखसंग्रहामुळे. १ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
चतुराचे उड्डाण
नदीच्या पाण्यातल्या एका छोटय़ा झुडपावर चतुर कीटकाच्या मादीने पुंजक्यांनी अंडी घातली होती. जवळजवळ ३०० अंडी होती. अंडी फोडून अनेक चिमुकले जीव बाहेर आले. त्यातलाच एक आपल्या कथेचा नायक आहे. हा चिमुकला जीव जन्माला आला एका अळीच्या रूपाने. जन्माला आल्यावर बाहेरचे जग पाहावे असे त्याला वाटले नाही. भोवतालचे वातावरण बदललेलेही जाणवले नाही. मनात फक्त एक विचार ‘मला भूक लागलीय’. छोटे छोटे पाय. बारीक मण्यांसारखे डोळे, छोटे पाणकीटक, बेडूक, मासे, लहान मासे आपल्या कणखर जबडय़ात पकडून ती त्यांचे तुकडे तुकडे करून खाऊन टाके. आजूबाजूच्या चिखलासारखाच तिचा रंग गढूळ तपकिरी होता. शत्रूपासून बचाव करण्यासाठी निसर्गाने तिला दिलेले ते फक्त कवचकुंडल होते. चिखलातून वेगळी अशी ती दिसायचीच नाही. भक्षक संभ्रमात पडायचा की चिखल कुठला आणि चतुराची अळी कुठली. एके दिवशी निसर्ग म्हणाला, बाई गं, तुझं पाण्यातलं जीवन संपलं. कारण मोकळय़ा हवेत, आसमंतात ती संचार करणार होती. तिचं रूपांतर सुरू झालं. कातडी ताणली जाऊ लागली. पाठीवरची कातडी फाटली आणि त्यातून एक देखणा चिमुकला रंगीत कीटक बाहेर पडला. मंद हालचाली करत तो पानांच्या दांडय़ावर बसून राहिला. त्याचा रंग पक्ष्यासारखा देखणा होता. लालबुंद अंगावर काळय़ा आकृती आणि डोक्याच्या दोन्ही बाजूला सारे डोके भरून जाईल एवढे प्रचंड असे डोळे त्याला होते. या सामथ्र्यवान डोळय़ांमुळे ५ ते ६ मीटरचा परिसर त्याला कळू शकत होता. आपली मिशी त्याने हालवली, त्यामुळे गंध, नाद, स्पर्शाचे ज्ञान त्याला झाले. चार सुंदर निळेहिरवे पंख त्याच्या निमुळत्या शरीराच्या पाठीवर होते. चारी वेगळे, प्रत्येकाची हालचाल स्वतंत्र, त्यामुळे प्रचंड वेगाने तो उडू शकत होता आणि सुटय़ा पंखांमुळे आपल्या भरारीचे नियंत्रण करू शकत होता, हे मात्र त्या बापडय़ाला ठाऊकच नव्हते. सकाळची वेळ. पानाच्या देठावर बसून तो कंटाळला. त्याच्याबरोबर जन्माला आलेले त्याचे बहीणभाऊ हवेत उडत होते. हा एकटाच बसून होता. उडायची त्याला भीती वाटत होती. तो पानावर बसला. त्याने पंख फडफडवले. तो बसूनच घसरत पानाच्या टोकापर्यंत आला. पान संपले तसा तो प्रचंड घाबरला. सगळीकडे प्रचंड पोकळी दिसायला लागली. तो मागे सरकू लागला. आपले पंख एवढय़ा मोठय़ा अवकाशात उडायला मुळीच मदत करणार नाहीत याची त्याला खात्री होती. पानावर बसून खूप तास लोटले. त्याच्याजवळ त्याची भावंडे फिरकली नाहीत. त्याच्या भित्रेपणाचा सगळय़ांनाच राग आला होता. कुणी टोमणा मारे. उडून जाई. कुणी घालून पाडून बोले. तो मख्खच होता. सूर्यास्त झाला. त्याला खूप थकल्यासारखे वाटले. आदल्या रात्रीपासून पोटात काहीच नव्हते. त्याने पाने कुरतडून त्याचे तुकडे केले. पण त्या कडवट वासाने, चवीने त्याला मळमळले. हळूहळू भूक शरीरभर पसरली. पोटात खड्डा, घशाला कोरड पडली. त्वेषाने त्याचे अंग आकसले. डोक्यावरून एक कीटक पुन:पुन्हा फिरत होता. संतापाने एक किंकाळी फोडून तो कीटकावर झेपावला. पायाखालचा आधार सुटल्यावर विलक्षण भीतीने तो थरारला. भेदरून त्याने डोळे गच्च मिटून घेतले. दुसऱ्या क्षणाला त्याच्या लक्षात आले तो हवेत अलगदपणे वरखाली तरंगत होता. त्याला भीती वाटेनाशी झाली. तो आणखी उंच उडाला. छाती पुढे करून मजेत त्याने कीटकाला गट्ट केले. भाईबंध पंख फडफडवत त्याच्याजवळ आले. तो त्यांच्यातलाच एक झाला.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com