Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

बीपीएड परीक्षेतील रॅकेट उघड
काटोल पोलीस ठाण्यात तक्रार
प्रभारी प्रश्नचार्यासह चौघांची नावे
काटोलच्या माजी विद्यार्थ्यांस अटक
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी
बीपीएडच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पैसे घेऊन उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पाडले असून त्यांच्यावर काटोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात लाखो रुपयांची देवाणघेवाण झाली असून त्यात चार जणांची नावे पुढे आली आहेत. काटोलच्या छत्रपती शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिमेष मंडल याला काटोल पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांना प्रश्नथमिक प्रशिक्षणाच्याच वेळी गनिमीकाव्याचेही प्रशिक्षण देण्याचा विचार
किरण राजदेरकर, नागपूर, २८ जून

नक्षलवाद्यांचे वाढते थैमान पाहता पोलिसांना प्रश्नथमिक प्रशिक्षणाच्याच वेळी गनिमीकाव्याचे (जंगल) प्रशिक्षण देण्याचा विचार शासन दरबारी सुरू असून त्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. देशात नक्षलवाद्यांचे थैमान वाढतच असून विशेषत: नेपाळच्या सीमेपासून बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पूर्व आणि दक्षिण विदर्भ, आंध्र प्रदेशातील महाराष्ट्राला खेटून असलेल्या प्रदेशात नक्षलवाद्यांचा ‘रेड कॉरिडॉर’ तयार झाला आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, दक्षिणेला चंद्रपूर, यवतमाळ व पुढे नांदेड जिल्हा नक्षलवादग्रस्त म्हणून ओळखला जातो.

भावी टीटीई घुसले आरक्षित बोगीत; रेल्वे स्थानकावर गोंधळ
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी

रेल्वे तिकीट तपासणीस बनण्यासाठी परीक्षा देण्याकरिता नागपुरात आलेले उमेदवार पुरी-जयपूर एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यात घुसल्याने तेथे एकच गर्दी झाली. त्यामुळे प्रवासी आणि परीक्षार्थीमध्ये बाचाबाची झाल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर आज एकच गोंधळ उडाला. रेल्वे भरती मंडळ (आर.आर.बी. भोपाळ) तर्फे टी.टी.ई. करिता लेखी परीक्षा नागपुरात घेण्यात आली. परीक्षेकरिता शेजारच्या राज्यातील उमेदवार मोठय़ा संस्थेने आले होते. टी.टी.ई.च्या परीक्षेकरिता आजचा शेवटचा टप्पा होता. या परीक्षेसाठी सुमारे ८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने आर.आर.बी. भोपाळने ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली.

आल्या सरीवर सरी.. बाग फुलवा घरोघरी..
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दमदार पावसाने विदर्भासह नागपुरात हजेरी लावल्यामुळे फुटपाथवर रोपटय़ाची विक्री करणाऱ्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.
साधारणत मृग नक्षत्राला प्रश्नरंभ झाला की बहुतांश नागरिक अंगणामध्ये वेगवेगळी रोपटे लावून घराभोवतीचा परिसर निसर्गरम्य करीत असतात मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे त्याचा परिणाम रोपटय़ाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर झाला होता. कालपासून संततधार पावसामुळे आता घरोघरी बाग फुलवायला सुरुवात झाली आहे.

विमान वेळेवर रवाना न झाल्याने प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
नागपूर, २८ जून/प्रतिनिधी
विमान नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरापर्यंत रवाना न झाल्याने, तसेच यासाठी कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रवाशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून विमान पुढील प्रवासाला रवाना केले. मात्र, प्रवाशांनी झालेल्या त्रासाबद्दल एअर इंडियाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांची विमानतळ प्रश्नधिकरणाकडे (एएआय) लेखी तक्रार केल्याची माहिती आहे.

निर्यात केंद्रासाठी नागपूर योग्य ठिकाण -जैन
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

नागपूरचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता हे निर्यातीसाठी एक चांगले केंद्र म्हणून उदयास येऊ शकते, असे मत चार्टर्ड अकाऊन्टट पवन कुमार जैन यांनी व्यक्त केले. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टटस् ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कर पद्धतीवरील चर्चासत्रात ते बोलत होते.

परिचारिकांसाठी लवकरच सुधारित पदोन्नती धोरण
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

परिचारिकांसाठी सुधारित पदोन्नती धोरण लागू करणारा अध्यादेश लवकरच काढू, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

सहकाराच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी -खोपडे
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

सहकार क्षेत्रामुळे अनेक युवकांना रोजगार मिळाला. त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आला. या युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते स्वत:चा आणखी विकास साधू शकतील, असे प्रतिपादन गिरणार अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी येथे केले.
राज्य सहकारी संघाच्या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हा बोर्ड व गिरणार अर्बन क्रेडिट को-आॉप. सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थेतील दैनिक ठेव प्रतिनिधींकरता वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम सतरंजीपुरा येथे पार पडला. या कार्यक्रमात विविध विषय व व्यक्तिमत्त्व विकास विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बँकिंग तज्ञ सुरेंद्र खरबडे, नागपूर विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रूपश्री खुबाळकर, निवृत्त प्रश्नचार्य रामनाथ गोहणे, समन्वयक रवींद्र जाऊळकर उपस्थित होते. संचालन व प्रश्नस्ताविक विनायक मांडवकर यांनी केले. राजेंद्र घाटे यांनी आभार मानले.

शहरातील काही भागात आज मर्यादित पाणीपुरवठा
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

तांत्रिक बिघाडामुळे उद्या, सोमवारी पश्चिम, उत्तर, मध्य व पूर्व नागपूरच्या काही भागात मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोरेवाडा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गोरेवाडा पेंच टप्पा-२ व जुने गोरेवाडा पाणी पुरवठा केंद्राचा वीज पुरवठा रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० पर्यंत बंद होता. त्यामुळे पश्चिम, उत्तर, मध्य व पूर्व नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. तसेच या भागात उद्या, सोमवारी सकाळी मर्यादित व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व नागपूर या सहा जिल्ह्य़ातील भारिप बहुजन महासंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या, सोमवारी दुपारी १२ वाजता झाशी राणी चौकातील हिंदी मोर भवनात होणार आहे. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे, कार्यालयीन सचिव ज.वी. पवार, पक्षप्रवक्ते बाबुराव पोटघरे, ज्येष्ठ नेते प्रश्न. रणजीत देशमुख, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. उज्ज्वला जाधव, दिलीप तायडे, शहराध्यक्ष डॉ. मिलिंद माने, प्रश्नमुख्याने उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचे कामकाज गतिमान करण्यासाठी विभागीय बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात अशा विभागीय बैठका घेण्यात येत आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरुण फुलझेले यांनी केले आहे.

व्हीआयएच्या अध्यक्षपदावर प्रवीण तापडियांची अविरोध निवड
नागपूर, २८ जून/प्रतिनिधी

विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावर प्रवीण तापडिया यांची अविरोध निवड झाली. व्हीआयएच्या अध्यक्षपदावर तापडिया यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यावेळी व्हीआयएच्या इतर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. व्हीआयएच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदावर रोहित बजाज, सत्यनारायण नुवाल आणि प्रफुल्ल दोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर विठ्ठलदास तापडिया यांची कोषाध्यक्ष, सचिव म्हणून अतुल पांडे, तर सहसचिव पदावर गिरीश देवधर, सुधीर पालीवाल, दामोदर तिवाडे यांची निवड झाली आहे. तर हरगोविंद बजाज, सुरेश अग्रवाल, सुरेश राठी, शैलेंद्र मानावत, आदित्य सराफ, आकाश अग्रवाल, देबदत्त चॅटर्जी, मोहन गट्टानी, विनोद कुमार मोहता, रोहित अग्रवाल, सुभाष चावरा, आशीष सिन्हा, व्ही.पी. सिंघानिया, डॉ. राजा अय्यर, एस.एन. माहेश्वरी, कुश बजाज आणि गौरव सारडा हे कार्यकारणीतील सदस्य आहेत.

अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी
मोटारसायकलच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला. २४ जूनला सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास आशीर्वाद नगरात हा अपघात घडला. आनंद कवडू खंते (रा़ आशीर्वादनगर) हे बजाज बॉक्सरने (एमएच/३१/एडी/८९०२) जात असता विरुद्घ दिशने येणाऱ्या बजाज प्लॅटिनाने (एमएच/३१/सीएफ/६१४८) धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आनंदला केअर व नंतर शुअरटेक रुग्णालयात दाखल करण्यात आल़े तेथे उपचार सुरू असताना काल शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला़ सक्करदरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

किराणा दुकानाला आग, १५ लाखांचे नुकसान
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

गिट्टीखदान परिसरातील एका किराणा दुकानाला रविवारी सकाळी आग लागून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेने तेथे धावपळ उडाली होती. खंडेलवाल किराणा व जनरल स्टोअर्समधून सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे कुणाला तरी दिसले. त्याने आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. नागरिकांची तेथे गर्दी झाली. कुणीतरी अग्निशमन दलाला कळवले. तोपर्यंत आग चांगलीच भडकली होती. धान्य, किराणा सामानाला आग लागण्यास वेळ लागला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचे शटर तोडले. त्यानंतर आत पाण्याचा मारा सुरू केला. आत जाण्यास दुसरा मार्ग नसल्याने जवानांना आग विझवण्यास त्रास गेला. दोन तासानंतर आग विझवण्यात त्यांना यश आले. दुकानातील धान्य, किराणा, इतर सामान, फ्रीज, फर्निचर जळून खाक झाले. आगीत अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.