Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भावी टीटीई घुसले आरक्षित बोगीत; रेल्वे स्थानकावर गोंधळ
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी

रेल्वे तिकीट तपासणीस बनण्यासाठी परीक्षा देण्याकरिता नागपुरात आलेले उमेदवार पुरी-जयपूर

 

एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यात घुसल्याने तेथे एकच गर्दी झाली. त्यामुळे प्रवासी आणि परीक्षार्थीमध्ये बाचाबाची झाल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर आज एकच गोंधळ उडाला.
रेल्वे भरती मंडळ (आर.आर.बी. भोपाळ) तर्फे टी.टी.ई. करिता लेखी परीक्षा नागपुरात घेण्यात आली. परीक्षेकरिता शेजारच्या राज्यातील उमेदवार मोठय़ा संस्थेने आले होते. टी.टी.ई.च्या परीक्षेकरिता आजचा शेवटचा टप्पा होता. या परीक्षेसाठी सुमारे ८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने आर.आर.बी. भोपाळने ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली. पहिला टप्पा ३१ मे रोजी पार पडला. गेल्या रविवारला दुसरा टप्पा आणि आज तिसरा आणि अंतिम टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. सकाळी साडेनऊ ते साडे अकराच्या वाजता दरम्यान परीक्षा झाली. परीक्षेनंतर मध्य प्रदेशकडे जाणारी पुरी-जयपूर एक्सप्रेस ही पहिलीच गाडी होती. त्यामुळे या गाडीत परीक्षार्थीनी एकच गर्दी केली. जनरल बोगी गच्च भरल्यानंतर ते स्लिपर क्लासच्या आरक्षित बोगींकडे वळले. तेथे त्यांनी धक्काबुक्की करत प्रवेश मिळवला. आज परीक्षा देऊन परतणाऱ्या उमेदवारांकडे स्पिलर क्लासचे तिकीट होते परंतु, ते कन्फर्म नव्हते. तरीही त्यांनी आरक्षित बोगीत प्रवेश केला. बोगीमध्ये गर्दी झाल्यामुळे अन्य प्रवासी संतापले, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली.
परीक्षार्थीच्या गोंधळामुळे किंवा अन्य कारणाने कोणतीही गाडी विलंबाने सोडण्यात आली नाही, असे मध्य रेल्वेचे विभागीय जनसंपर्क अधिकारी सुहास लोहकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आजच्या परीक्षेकरिता सुमारे ८० अधिकारी, ३०० कर्मचारी कामास लावले होते. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने १०६ आर.पी.एफ.चे जवान आणि सुमारे ४०० स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले होते. परीक्षा शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. ११ हजार ९४३ उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेला ४७ हजार ७० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तीनही टप्प्यात झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ३५ हजार उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती तर, ३२ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली, अशी माहिती द.पू.मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी सूर्यप्रकाश यांनी दिली.