Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विमान वेळेवर रवाना न झाल्याने प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
नागपूर, २८ जून/प्रतिनिधी

विमान नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरापर्यंत रवाना न झाल्याने, तसेच यासाठी कंपनीकडून

 

उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रवाशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून विमान पुढील प्रवासाला रवाना केले. मात्र, प्रवाशांनी झालेल्या त्रासाबद्दल एअर इंडियाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांची विमानतळ प्रश्नधिकरणाकडे (एएआय) लेखी तक्रार केल्याची माहिती आहे.
आय एक्स २५१ क्रमांकाचे मुंबई- नागपूर- अहमदाबाद- दुबई हे एअर इंडियाच्या विमानाचे सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूरहून हे विमान पुढील प्रवासासाठी अहमदाबादला रवाना होणार होते. नियोजित वेळेनुसार हे विमान साडे अकरा वाजताच्या सुमारास अहमदाबादला रवाना होणे गरजेचे होते. यासाठी प्रवाशांना बोर्डिग पास देण्यात आले होते. तसेच सिक्युरिटी चेकची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशी बोर्डिगची वाट पाहत होते. मात्र, विमान उडण्याची वेळ होऊनही प्रवाशांना विमानात नेण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. याबाबत प्रवाशांनी कंपनीकडे विचारणा केली असता. मात्र, मुसळधार पावसामुळे व्यवस्थित दिसत नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, आणखी किती वेळ लागेल याबाबत कंपनीकडून काहीच सांगण्यात येत नव्हते. यावर काही प्रवाशांनी एअर ट्राफ्रिक कंट्रोलकडे याबाबत विचारणा केली असता, असे कुठलेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. अनेकांनी तिकिटाचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. यावेळी एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, खरे कारण सांगण्यात येत नसल्याने प्रवाशी ऐकून घेण्यास तयार नव्हते.
प्रवाशी तिकिटाचे पैसे परत मागत असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमान तांत्रिक बिघाड झाला असल्याने पुढील प्रवासाकरता विलंब होत असल्याचे सांगितले. यावेळी विमानातील बिघाड तात्पुरता दुरुस्त करण्यात आला आणि दुपारी दीड वाजताच्या सुमारास विमान प्रवाशांना घेऊन परत मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईहून अहमदाबाद आणि दुबईला जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीकडून सतत खरे कारण सांगण्यात टाळाटाळ करण्यात आल्याने प्रवाशांनी याबाबत विमानतळ प्रश्नधिकरणाकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.