Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

परिचारिकांसाठी लवकरच सुधारित पदोन्नती धोरण
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

परिचारिकांसाठी सुधारित पदोन्नती धोरण लागू करणारा अध्यादेश लवकरच काढू, असे आश्वासन

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
परिचारिकांसाठी पदोन्नती धोरण लागू करावे, गणवेश धुलाई भत्त्यात वाढ, अप्रशिक्षित पुरुष कर्मचाऱ्यांच्या पर्यवेक्षणाची पद्धत रद्द करावी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेच्या योजनेत सुधारणा करावी, कॅशबुक लिहिण्यासाठी प्रशिक्षण व त्यासाठी दोन हजार रुपये मानधन द्यावे, कंत्राटी नेमणुका रद्द करून त्यांना सेवेत कायम करावे, अंशकालीन महिला परिचरांना मासिक तीन हजार रुपये वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानात संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. याचर्चेत परिचारिकांसाठी सुधारित पदोन्नती धोरण लागू करणारा अध्यादेश लवकरच काढू, याबरोबरच अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच याच मागण्यांच्या तपशीलवार चर्चेसाठी ३१ जुलैला मुंबई येथे संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिष्टमंडळात संघटनेच्या सरचिटणीस प्रज्ञा जाधव, कार्याध्यक्षा अमिता पाटील, उपाध्यक्षा शोभा खैरनार, डी.टी. साळवे, दीपिका भांगरे, कुसूम परळे, सरला काकडे, मुक्ता जोशी, नंदा क्षीरसागर यांचा समावेश होता.