Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मतदारयाद्यांचा घोळ मिटवण्याचा प्रयत्न -महेंद्र जोशी
सेवादलाचे कार्यकर्ते घरोघरी संपर्क साधणार
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात

 

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सेवादलचे कार्यकर्ते घरोघरी संपर्क करून मतदार यादीकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक महेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक बांधणी, वेगवेगळ्या योजनांची माहिती आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने राज्यात विविध ठिकाणी सेवादल पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेशमध्ये सेवादल कार्यकर्त्यांच्या बैठकी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले असून आज विदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये सेवादलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे देशभरात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सेवादलतर्फे केले जाते. सेवादल कार्यकर्त्यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत स्थान दिले जात नाही, असा आरोप केला जात असेल तर तो चुकीचा आहे.
जो कार्यकर्ता सक्षम आणि काम करणारा असेल त्या कार्यकर्त्यांची पक्षात दखल घेतली जाते. सेवादलचे अनेक पदाधिकारी आज खासदार आणि आमदार आहेत. आगामी विधानसभा, महापालिका, नगरपालिका आदी निवडणुकीमध्ये सेवादलमध्ये काम करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार आहेत. सेवादलच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल तर पक्षातंर्गत दूर केला जातो. पक्षाची काही ध्येयधोरणे असतात त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नसल्याचे जोशी म्हणाले. पक्षात अनुशासन असले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांंना तशी ताकीद दिली जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत आमची लढाई ही सांप्रदायिक शक्तीविरुद्ध आहे. जाती धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या भारतीय जनता पक्ष- शिवसेना या पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही. देशात किंवा राज्यात काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकते हे लोकाना माहीत असल्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य वाढले, आहे असेही जोशी म्हणाले.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार की नाही याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याबाबत काही विधाने करणे चुकीचे आहे. ‘एकला चलो रे’ची भूमिका काही पक्षाचे ज्येष्ठ नेते करीत असतील तर ते त्यांचे स्वतचे मत असू शकते, असेही जोशी म्हणाले. या बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात येत असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संबंधित विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला छोटेबाबू राय, शशिकांत थोरात, कृष्णकुमार पांडे, रामगोविंद खोब्रागडे उपस्थित होते.