Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

न्यूमोनिया प्रतिबंधक लसीचा राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करावा
बालरोग तज्ज्ञ संघटनेची मागणी
दरवर्षी ४ लाख बालके दगावतात
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी
भारतात दरवर्षी ‘न्यूमोनिया’ या आजाराने ४ लाख मुले दगावतात. भारत सरकारने लसीकरण

 

कार्यक्रमात तसेच खाजगी डॉक्टरांनी पी.व्ही.सी. ही लस बालकांना दिली तर न्यूमोनियाने बालके मृत्यूमुखी पडणार नाही, अशी आशा भारतीय बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन शाह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
न्यूमोनिया दोन प्रकारचा असून त्यामुळे मेंदूचा रोग, कानफुटी, रक्ताचा आजार व फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात न्यूमोनिया प्रतिबंधक लसी देण्यात येत नसल्याने ५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना एकदा केव्हा तरी न्यूमोनिया होतो. न्यूमोनियावर पी.व्ही.सी. ही प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. या लसीचे चार डोज देणे आवश्यक आहे. खाजगी डॉक्टरांकडे पालकांनी मागणी केल्यास ती देण्यात येते. एका डोजची किंमत ही ३२०० रुपये आहे. चार डोजचा खर्च १२ ते १३ हजार रुपये येतो. त्यामुळे सामान्य पालक ती विकत घेऊन देऊ शकत नाही. त्यासाठी शासनाने ही लस कमी किंमतीत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही डॉ. शाह यांनी याप्रसंगी केली.
न्यूमोनिया आजाराने दरवर्षी मोठय़ा संख्येने बालकांचा मृत्यू होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या, अशी मागणी संघटनेतर्फे केंद्र शासनाला करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील ७८ विकसनशील देशांना त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात न्यूमोनिया प्रतिबंधक पी.व्ही.सी. लस द्यावी, असा आग्रह केले असल्याचेही डॉ. शाह यांनी लक्ष वेधून या लसींची मागणी वाढल्यास त्याच्या किंमती फारच कमी होईल आणि त्या सर्वसाधारण पालकांच्या आवाक्यात येईल. त्यामुळे खाजगी बालरोग तज्ज्ञांनी लसीकरणासोबतच पी.व्ही.सी.ची लस लावून घेण्याचा बालकांच्या पालकांना आग्रह धरावा, अशी सूचनाही डॉ. शाह यांनी याप्रसंगी केली.
संघटनेचे सचिव रोहित अग्रवाल यांनी एड्स, मलेरिया या आजारापेक्षाही न्यूमोनिया हा आजार भयंकर असल्याचे सांगितले. न्यूमोनिया झालेल्या बालकांना बहुतांश डॉक्टर अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधे देतात. परंतु हा प्रकार चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल जयस्वाल, सचिव डॉ. संदीप मोगरे, पुणे येथील डॉ. शिशिर मोडक प्रश्नमुख्याने उपस्थित होते.