Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण व संशोधन संस्था स्थापन करण्याची मागणी
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

मध्यभारतात सिकलसेल आजाराचा अत्याधिक प्रभाव आहे. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने

 

उपचाराच्या दृष्टीने देशातील सर्वच भागातील नागरिकांना येथे येणे सोयीचे होते. त्यामुळे नागपुरात राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण व संशोधन संस्था स्थापन करावी, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
सिकलसेल नियंत्रणासाठी योजना आयोगाने सहा मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यामध्ये सिकलसेल व रक्तदोषासंबंधी सेवा देण्यासाठी स्वस्त प्रकारच्या इलेक्ट्रोफोरेसीस पद्धतीचा शोध लावणे, समाजातील सिकलसेल वाहक सिकलसेल रुग्ण यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांचे सर्वेक्षण करणे, सिकलसेल रुग्णांची नियमित तपासणी करणे, रुग्णाला रक्त संक्रमण आणि वेदनाशमन आदी कार्यासाठी एक दिवसीय सुविधा केंद्र सुरू करणे, विवाहापूर्वी समुपदेशन व त्यासाठी साहित्य वितरित करणे, उपलब्ध माहिती व संशोधन या आधारावर वैद्यकीय उपचारांचा शोध घेणे, याचा मार्गदर्शक तत्त्वामध्ये समावेश आहे.
या संस्थेसाठी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येथे राष्ट्रीय संस्था स्थापन केल्यास या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम होऊ शकते, ही बाबही मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. मुकुल वासनिक यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके, नीळकंठ पांडे, संजीव गजभिये आदींचा समावेश होता.