Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारा जिल्हा बँकेची तिजोरी फोडणारे दोघे अटकेत
नागपूर, २८ जून / प्रतिनिधी

भंडारा येथील जिल्हा सहकारी बँकेची तिजोरी फोडून पाच लाखाची रक्कम चोरणाऱ्यांपैकी दोघांना

 

पाचपावली पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.
अंसार अहमद खान शमीउल्ला खान (रा़ वनदेवीनगर झोपडपट्टी) व विजय हरिदास गडपाल (रा़ पंचशीलनगर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब देवलकर, हवालदार अशोक पांडे, शिपाई मंगेश देशमुख, चंद्रशेखर फिसके, राजेश दुबे, राजेश धोपटे काल रात्री गस्त घालत असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून त्यांनी अंसार व विजयला अटक केली. भंडारा जिल्हा सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरने फोडून त्यांनी ५ लाख २ हजार ६२५ रुपये लांबवले. यात सहभागी आरोपी राजेश दिना सहारे (रा़ परसवाडा, ता. तिरोडा) हा सध्या खुनाच्या गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असून त्या घटनेच्या वेळी तो पॅरोलवर होता. आणखी एका आरोपीचे नाव त्याने सांगितल़े अंसार व विजय या दोघांनी चोरीच्या रकमेतून एक भूखंड, दोन ऑटो रिक्षा व घराकरिता विदर्भ प्रिमीयर बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याचे पोलिसांना सांगितले. या दोघांना भंडारा पोलिसांच्या हवाली करण्यात आल़े
अटक
नवी कोरी पल्सर मोटारसायकल हिसकून पळून गेलेल्या एका आरोपीला वाडी पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. निरज चंद्रकांत भुयार (रा़ रामनगर, अमरावती) हा त्याच्या मित्रासह नवीन नंबर असलेल्या पल्सर मोटारसायकलने अमरावतीला जात होता. अमरावती मार्गावरील सत्कार बिअर बारसमोर, पानठेल्यावर काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते दोघे थांबले होते. तेथे आलेल्या एका तरुणाने त्यांच्याजवळून दुचाकीची किल्ली हिसकली आणि दुचाकी घेऊन पळून गेला. त्या दोघांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वाडी पोलिसांनी शोध घेऊन आरोपी राजेश गौतम तलवारे (रा. आंबेडकरनगर) मध्यरात्री अटक केली.