Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या आदेशाला बगल ; डीसीआरआयच्या कार्यालयात बदल
नागपूर, २८ जून/ प्रतिनिधी

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) अश्वनी कपूर यांच्या आदेशाला बगल देत वरिष्ठ

 

विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मनोज गांगेय यांनी विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला नागपूर रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्रावर स्थानांतरित करण्याचे आदेश काढले आहेत.
१५ मे २००७ च्या आदेशात डीआरएम यांनी विभागीय मुख्य आरक्षण निरीक्षक जोसेफ एक्का यांच्या जागेवर नागपूर रेल्वे स्थानकावरील मुख्य आरक्षण अधीक्षक सुषमा मेंदीरत्ता यांची बदली केली होती. ही बदली मेंदीरत्ता यांच्याविरुद्ध लेखी तक्रार मिळाल्यानंतर करण्यात आली होती. त्यानंतर मेंदीरत्ता यांना चार्जशीट (एसएफ ११) देण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अश्वनी कपूर यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपत आला. एकीकडे कपूर यांचा निरोप समारंभ सुरू असताना दुसरीकडे अनेक गंभीर आरोप असलेल्या मेंदीरत्ता यांना एसडीसीएम गांगेय यांनी विभागीय कार्यालयातून मुख्य आरक्षण अधीक्षकांच्या कार्यालयात बदलीचे आदेश काढले आहेत.
विभागीय व्यवस्थापक अश्वनी कपूर यांना मेंदीरत्ताविरुद्ध एक लेखी तक्रार प्रश्नप्त झाली होती. त्यानुसार सुषमा मेंदीरत्ताची मुलगी पुनम मेंदीरत्ता ही पृथा मार्केटिग सव्‍‌र्हिसेस या कंपनीची सदस्य होती. मुलीला लाभ पोहोचविण्यासाठी या कंपनीचे सदस्य व्हावे म्हणून मेंदीरत्ता त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर दबाब आणत होत्या. तसेच, हवे तेव्हा कोणत्याही शहराकरिता ‘कन्फर्म रिझव्‍‌र्हेशन’ देण्याच्या हमीवर सुमारे शंभर लोकांना या कंपनीचे सदस्य केले गेले, अशी तक्रार होती. १ जून २००२ ते २२ ऑगस्ट २००७ या कालावधीत अनेक रेल्वे कर्मचारी पृथा मार्केटिंग सव्‍‌र्हिसेस सदस्य झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मेंदीरत्ता यांना चार्जशीट देण्यात आली आणि रेल्वेच्या कल्याण अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली. याशिवाय, मुख्य आरक्षण अधीक्षक म्हणून कार्यरत असताना मेंदीरत्ता यांच्या घरी रिझव्‍‌र्हेशनचे फार्म भरून दिले जात होते. चौकशीत त्यांच्या घरी ‘रिझव्‍‌र्हेशन फार्म’ मिळाले, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. गेले दीड वर्षात नागपूर विभागात रेल्वे तिकीट घोटाळा तसेच, रिफन्ड घोटाळा झाला. विभागीय मुख्य आरक्षण निरीक्षक (डीसीआरआय) म्हणून त्यांचे काम सुमार आहे. असे असताना त्यांना ‘व्हीआयपी मुव्हमेन्ट’ बघण्यासाठी आरक्षण कार्यालयात स्थानांतरित करण्यात आल्याने रेल्वे वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणतात, डीसीआरआय सुषमा मेंदीरत्ता यांना विभागीय कार्यालयात काही काम नव्हते. (‘सिटिंग आयडल’) त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात पाठविण्यात आले. त्यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी झाली परंतु, ही चौकशी आपण येथे नसताना झाली. त्याबाबत पुरेशी माहिती नाही. यानंतर मेंदीरत्ता यांच्याविरुद्ध कोणती तक्रार आल्यास नोकरीतून कमी करण्यात येईल, असे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मनोज गांगेय यांनी सांगितले.