Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

बागुलबुवा परीक्षांचा..
परीक्षा म्हटलं की, ‘केजी टू पीजी’पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जणू कापरे भरते! वास्तविक आपण जे ज्ञान-माहिती प्राप्त करतो, त्यावर आधारित मूल्यमापन हे पाहिजेच. फक्त त्याचे स्वरूप सध्याच्या ‘परीक्षां’सारखे झाले की, मग त्याचा बागुलबुवा तयार होतो. शिक्षणव्यवस्थेच्या मानगुटीवर बसलेले परीक्षा नावाचे हे ‘भूत’ दूर करण्याची गरज नक्कीच आहे; परंतु त्याच्याच जोडीला मूल्यमापनाची अभिनव मॉडेल विकसित करणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ पाठांतर-स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा नकोत. त्याऐवजी विद्यार्थ्यांचे र्सवकष व्यक्तिमत्त्व खुलविणाऱ्या चाचण्या तयार करण्याचे खरे आव्हान आहे. केवळ बोर्डाची परीक्षा रद्द करून वा ऐच्छिक ठेवून भागणार नाही. संपूर्ण अध्यापन-अध्ययन पद्धतीची या अनुषंगाने फेरमांडणी करण्याची गरज आहे. कपिल सिब्बल यांनी घेतलेला पुढाकार हे केवळ निमित्तमात्र! तणावमुक्त परीक्षांच्या ध्येयसिद्धीबाबत टाकलेला हा दृष्टिक्षेप..

तणावमुक्त परीक्षा अभियान
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षांत ‘तणावमुक्त परीक्षा अभियान’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तणावाखाली परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे आणि तणावास कारणीभूत असलेले घटक दूर करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी कॉपी करतात. उत्तरपत्रिकेत ‘मला पास करा’ असे लिहतात. अशा मुलांसाठी शिक्षण मंडळाच्या नियमावलीनुसार योग्य ती कारवाई केली जाते. अशा विद्यार्थ्यांना काही वर्षांसाठी परीक्षा देण्यास मज्जाव केला जातो.

आधार द्या मज!
२५ जून रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी ‘झी चोवीस तास’ वृत्त वाहिनीच्या माध्यमातून एस. एस. सी. हेल्पलाईन हा उपक्रम राबविण्यात आला. निकाल जाहीर झाल्यावर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक सुरू होते. पण नापास झालेल्या व अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मानसिकतेचा अनेकांना विसर पडतो. अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी आधार द्यावा या हेतूने अयशस्वी विद्यार्थ्यांच्या काऊन्सिलिंगसाठी सकाळी दहापासून रात्री दहापर्यंत ही हेल्पलाईन अविरत सुरू होती. या वेळात जवळपास ३५० ते ४०० विद्यार्थ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क करून आपल्या भावनांना वाट करून दिली. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालक, विद्यार्थ्यांच्या मित्र-मैत्रिणींनीही या हेल्पलाईनवरून मार्गदर्शन घेतले.

‘लोकरंग’मध्ये..
दहावी बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन आणि भीती यापासून विद्यार्थ्यांना पूर्ण मुक्त करण्यासाठी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे का? तो व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आहे का, विविध बोर्डामधील तफावती दूर करण्यासाठी देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच बोर्डाची परीक्षा घेण्याचा पर्याय हिताचा वाटतो का? सिब्बल यांच्या प्रस्तावामुळे अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे. याबाबत काही शिक्षणतज्ज्ञांची मते येत्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत वाचा आणि मग आपल्याही प्रतिक्रिया कळवा.