Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

युद्धपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आणखी एका जलाशयाची गरज
विशेष प्रतिनिधी
पुणे, २८ जून

पावसाच्या अनियमितपणामुळे उद्भवणाऱ्या युद्धपरिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेने किमान काही महिन्यांचा पाणीसाठा होईल, असा जलाशय बांधण्याची योजना हाती घेण्याची गरज तीव्रपणे भासू लागली आहे. तसेच प्रक्रियायुक्त सांडपाणी शेतीला देण्याची योजना रखडल्याने खडकवासला प्रकल्पातील आणखी पाणी पिण्यासाठी राखून ठेवता आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मान्सूनचे आगमन कधी लांबते तर कधी तो वेळेवर येऊनही नंतर मोठी विश्रांती घेतो.

पार्किंग अ‍ॅलॉट करण्यावर बिल्डर ठाम; विकता येत नसल्याचा कायदेतज्ज्ञांचा पुनरुच्चार
पार्किंगविषयीचे धोरण नव्याने ठरविण्याची गरज ‘लोकसत्ता’ मधील चर्चासत्रात व्यक्त
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील (हाउसिंग सोसायटी) पार्किंग बिल्डरला विकता तर येत नाहीच, पण अ‍ॅलॉट करण्याशीही त्याचा संबंध येत नाही, या मताचा जोरदार पुनरुच्चार कायदेतज्ज्ञांनी केला. तर पार्किंग न विकल्यास ते तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा स्वाभाविकपणे सर्व सदनिकाधारकांवरच टाकावा लागेल, असे स्पष्ट करून पार्किंगच्या जागेवरून सोसायटीमध्ये निर्माण होणारे वाद टाळण्यासाठीच बिल्डर मंडळी पार्किंग अ‍ॅलॉट करतात, असा प्रतिवाद बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने करण्यात आला.

‘प्रतिबंधात्मक कारवाईचे पोलिसांचे अधिकार काढून घ्या’
उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
फौजदारी आचारसंहिता कायद्यातील प्रकरण आठमधील कलम १०६ ते ११६ पर्यंतच्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अधिकाराचा शहर आणि ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याकडून हे अधिकार काढून घ्यावेत किंवा न्यायाधीश किंवा महसुली अधिकाऱ्यांकडे हे अधिकार द्यावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

पिंपरीत नवीन गावांचा विकास आराखडा आठवडय़ात मंजूर होणार -आयुक्त आशिष शर्मा
अविनाश चिलेकर
पिंपरी, २८ जून

पिंपरी-चिंचवड शहरात बारा वर्षांपूर्वी समाविष्ट केलेल्या नवीन १८ गावांच्या विकास आराखडय़ाला येत्या सात-आठ दिवसांत राज्य सरकारची मंजुरी मिळेल, अशी माहिती महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी शनिवारी येथे दिली. दरम्यान, या आराखडय़ातील सर्व आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी जो ११० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तो आता तब्बल १५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अगदी धक्कादायक प्रकार म्हणजे आरक्षणातील बहुतेक जमिनी अतिक्रमणे करून हडपण्यात आल्या आहेत.

आरोग्य सेवा कार्यालयाच्या स्थलांतराच्या हालचाली
कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
आरोग्य खात्यात महत्त्वाची पदे असणाऱ्या आरोग्य सेवा आणि मलेरिया या दोन विभागांसाठी पूर्वीची स्वतंत्र पदे रद्द करून त्यासाठीच एकच अधिकारी नियुक्त करण्यात आल्याने मध्यवर्ती इमारतीतील (सेंट्रल बिल्डिंग) येथील आरोग्य सेवेच्या कार्यालयाचे विश्रांतवाडीला स्थलांतर करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून या कार्यालयाचे स्थलांतर होऊ नये, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी जोर धरला आहे.

डॉ. शैलेश देशपांडे यांचे दुबईत व्याख्यान
कर्करोगावरील होमिओपॅथी उपचार
पिंपरी,२८ जून / प्रतिनिधी
संयुक्त अरब अमिरातच्या आरोग्य मंत्रालयाने दुबई येथील अलबरहा हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील होमिओपॅथी उपचार या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात शहरातील होमिपॅथीतज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांचे नुकतेच व्याख्यान झाले. भारतातून निमंत्रित करण्यात आलेले ते एकमेव व्याख्याते होते.

कुख्यात गुंड फिरोझ बंगाली याचा मृत्यू
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
कोंढव्यातील कुख्यात गुंड फिरोज बंगाली (वय ४०) याचा आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. बंगाली हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. बंगालीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे आढळून आल्यावर त्याला गुरुवारी पहाटे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.बंगाली याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यामध्ये बंगाली याच्या मृत्यूप्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली. कोंढवा, डेक्कन, समर्थ, लष्कर, खडक आणि वानवडी पोलीस ठाण्यामध्ये बंगाली याच्यावर ३१ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. बंगालीच्या टोळीमध्ये वीसपेक्षा अधिकजण काम करीत.

तरुणावर वार करून बॅगेसह रोकड पळविली
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
तलवारीने हातावर आणि पायावर वार करून तरूणाकडील बॅगेसह रोकड अज्ञात चोरटय़ांनी हिसकावून चोरून नेली. मुंढवा गावामध्ये भाजी मंडई परिसरात काल रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. चोरीला गेलेल्या बॅगमध्ये किती रोकड होती हे निष्पन्न होऊ शकले नाही.कृष्णधवल कालरा (वय २१, रा. मोनालीलेन पॅलेस, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी याबाबत हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल केला. बॅगमध्ये किती रोकड होती याबाबत पोलिसांना माहिती मिळू शकली नाही.

रोटरी साऊथतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर
पुणे, २८ जून/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या वतीने १ जुलै रोजी कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लबतर्फे मोठय़ा प्रमाणात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हे शिबिर सकाळी ९ ते १ या वेळेत होईल. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करुन रक्तदान चळवळ पुढे नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ साऊथचे नियोजित अध्यक्ष सुधीर वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केले.रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून, यासाठी युवकांमध्ये जागृती निर्माण होऊन जास्तीत जास्त रक्तसंकलन व्हावे हा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रक्तसंकलनासाठी सुप्रसिद्ध जनकल्याण रक्तपेढी यासाठी तांत्रिक साहाय्य पुरविणार आहे.

कचरा व्यवस्थापनावर आज परिसंवाद
पुणे, २८ जून/प्रतिनिधी
ग्रीन एनर्जी मिशन संस्थेच्या वतीने २९ जून रोजी ‘कचरा व्यवस्थापन आणि खासगी क्षेत्राची जबाबदारी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रीन एनर्जी संस्थेच्या अध्यक्षा शर्मिली ओसवाल यांनी याबाबत माहिती दिली. हरित पुणे बनविण्यासाठी विविध संस्था, शालेय संस्था, पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
या चर्चासत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षा व्हल्सा नायर सिंग पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले, तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. या वेळी कंपनीचे प्रकल्प अधिकारी दिलीप मेहता उपस्थित होते.

साखळी चोरणाऱ्या तीन तरुणांना अटक
पुणे, २८ जून / प्रतिनिधी
वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरून नेणाऱ्या तिघा तरुणांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. चतु:शंृगी, सांगवी, कोथरूड, स्वारगेट, खडक, वानवडी, येरवडा या भागांमध्ये ही टोळी सक्रिय होती. सोन्याच्या साखळ्या चोरीस गेल्या असतील, तर नागरिकांनी फरासखाना पोलीस ठाण्यात २४४५२२५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. अजय हरिसिंग ठाकुर (वय २४), निलेश प्रदीप उबाळे (वय २२) आणि सनी प्रभाकर शिंदे (वय २२, रा. शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोफत आरोग्यसुविधांसाठी मनसेचे आंदोलन
पुणे, २८ जून/प्रतिनिधी
बोपोडी येथील नागरिकांना सह्य़ाद्री हॉस्पिटलमधील सुविधा मोफत मिळाव्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हॉस्पिटलमध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मनसेचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनकर्ते हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी तेथील कामगार व अधिकारी हॉस्पिटलला कुलूप लावून पळून गेल्यामुळे मनसेने या पळपुटेपणाचा धिक्कार केला आहे. या वेळी, जितेंद्र कांबळे, शिवाजी बांगर, अविराज हुगे, विकास शिंदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

करंदीकरांच्या छंदाचे आता अमेरिकेत प्रदर्शन
पुणे, २८ जून/प्रतिनिधी

पुण्यातील विलास करंदीकर हे आपल्या छंदाचे प्रदर्शन आता अमेरिकेत मांडणार आहेत. अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन येत्या दोन ते पाच जुलै दरम्यान भरविण्यात येणार आहे. करंदीकरांना भातुकलीच्या खेळातील दुर्मिळ वस्तू जमविण्याचा छंद असून हा छंद ते अमेरिकेत होणाऱ्या प्रदर्शनात मांडणार आहेत. प्रदर्शन मांडण्यासाठी ते अमेरिकेत जात असून अशा प्रकारे छंदाचे प्रदर्शन करणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहेत.

आळंदी व्यवसाय परवाना तपासणी मोहीम तीव्र
आळंदी, २८ जून/वार्ताहर
आळंदी नगरपालिका हद्दीतील व्यावसायिकांचे व्यवसाय परवाना तपासणी, नूतनीकरण सव्‍‌र्हेक्षणासाठी परवाना तपसाणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित वंजेरी यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे शहरात सव्‍‌र्हेचे काम व्यवसाय परवाना वसुली अभिकर्त्यांचे वतीने करण्यात येत आहे. शहरात अनेक व्यावसायिकांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता परस्पर व्यवसाय सुरू केले असल्याने व्यवसाय परवाना तपासणी विशेष मोहिमेंतर्गत सव्‍‌र्हेक्षण करण्यात येत आहे. ज्या व्यावसायिकांनी परवाना घेतला नसेल त्यांनी तत्काळ व्यवसाय परवाना घेण्याचे तसेच ज्यांचे व्यवसाय परवाना मुदत संपलेली आहे, त्यांनी नूतनीकरणासाठी प्रस्ताव अभिकर्त्यांचे माध्यमातून दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळ्याचे नगराध्यक्ष जांभळे यांची भाजपातून हकालपट्टी
लोणावळा, २८ जून/वार्ताहर

भारतीय जनता पार्टी व युतीच्या उमेदवाराविरोधी बंडखोरी करून निवडून आलेले लोणावळा नगरपरिषदचे नगराध्यक्ष सोमनाथ जांभळे यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्र पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे यांनी प्रसिद्ध केले आहे. मावळ तालुका भाजपच्या देहूरोड येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार दिगंबर भेगडे, माजी अध्यक्ष केशवराव वाडेकर, माजी आमदार रुपलेखा ढोरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, तालुका सरचिटणीस रामदास गाडे, किरण राक्षे, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव, दादा धुमाळ, सुमित्रा जाधव, शिवाजीराव टाकवे आदी उपस्थित होते.