Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

राज्य

‘मध्यमवर्गाने गरीब व उपेक्षित वर्गाचा जगण्याचाच हक्क नाकारला’
पुणे, २८ जून/प्रतिनिधी

जागतिकीकरण आणि उदारीकरणातून झालेल्या प्रगतीचे लाभार्थी असलेल्या मध्यमवर्गाने गरीब व उपेक्षित वर्गाचा जगण्याचाच हक्क नाकारला आहे. त्यामुळे ‘माओवादा’ला सुपीक जमीन तयार झाली आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आज येथे केले. मूल्याधिष्ठित राजकारणाच्या नावाखाली राजकीय खोटारडेपणा खपवून घेतला जात असून, राजकीय पक्षांसह मध्यमवर्गानेही राजकीय व आर्थिक धोरणांवर विचार करणे आता सोडून दिले आहे, अशी चिंता त्यांनी या वेळी व्यक्त केली.

हरिनामाच्या गजरात अकलूजला रंगला तुकोबांचा गोल रिंगण सोहळा
अकलूज, २८ जून/कैलास ढोले
पुण्य फळले बहुत दिवसा।
भाग्य उदयाचा ठसा।
झालो सन्मुख तो कैसा।
संत चरण पावलो।

अकलूजच्या तांबडय़ा मातीत आज संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचा भक्तीरसाचा गोल रिंगण सोहळा हरिनामाच्या गजरात उत्साहात रंगला यावेळी वारकऱ्यांबरोबर ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. उभे पालखीचे पहिले उभे रिंगण माळीनगर येथे होणार आहे. संत तुकोबांच्या पालखी दर्शनाने धन्य झाले.

नद्या जोड प्रकल्पाचे सर्वेक्षण; खान्देश पॅकेजमधून १० कोटी रूपये देण्याची मागणी
नाशिक, २८ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय नद्या जोड प्रकल्पातंर्गत सव्‍‌र्हेक्षणासाठी लवकरच जाहीर होणाऱ्या खान्देश पॅकेजमध्ये १० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांनी निवेदनाव्दारे केली आहे. खान्देशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांसह नाशिक जिल्ह्य़ातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा व मालेगाव तालुक्यांचा समावेश होतो.

विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण
माळशिरस, २८ जून/वार्ताहर
राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून उद्या (सोमवारी) विधानभवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राजकारण व समाजकारणात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो.

शहाबाज, शहापूर, पोयनाड पट्टा औद्योगिक क्षेत्र करण्याची फाईल थांबविण्याचे काम केले
आमदार मधुकर ठाकूर यांचा दावा
अलिबाग, २८ जून / प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचा सगळा कारभारच ढोंगीपणाचा आह़े शहाबाज, शहापूर, पोयनाड हा विभाग औद्योगिकपट्टा म्हणून जाहीर करावा, असा अर्ज पीएनपी कंपनीने शासनाकडे केला होता़ मला हा प्रकार कळल्यावर मी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव
देशमुख यांची तत्काळ भेट घेऊन माझे पत्र देऊन ती फाईल थांबविली आह़े

ठेवीदारांचा मुंबई येथे मोर्चा
नाशिक, २८ जून / प्रतिनिधी

राज्यातील डबघाईस आलेल्या नागरी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांना ठेवी परत मिळावेत या मागणीसाठी येथील नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीतर्फे एक जुलै रोजी ‘ठेवीदारांचा बिऱ्हाड मोर्चा ’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानावर काढण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले. समितीतर्फे टास्क फोर्सच्या नियमित बैठका घ्या, सर्व संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, चौकशी संदर्भातील सहकार मंत्र्यांचे चुकीचे स्थगिती आदेश मागे घ्या, ठेवीदारांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करा, सर्व दोषी संचालक मंडळे बरखास्त करा, प्रशासक मंडळात ठेवीदारांचा प्रतिनिधी घ्या, दोषी बडय़ा कर्जदारांवर कारवाई करा, संचालक मंडळात ठेवीदारांचे ५० टक्के प्रतिनिधी घ्या आणि लेखापरीक्षण शासकीय परीक्षकांद्वारे करा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सर्व ठेवीदारांनी एक जुलैस सकाळी अकरा वाजता जमावे, अशी माहिती समितीचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड , श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी दिली.

सिन्नरजवळील अपघातात तीन ठार
नाशिक, २८ जून / प्रतिनिधी

इंडिका आणि खासगी आराम बस यांच्यामध्ये शनिवारी मध्यरात्री घोटी-शिर्डी रस्त्यावर झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील तीन जण जागीच ठार तर एक जखमी झाला. अपघात प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास सिन्नरकडे इंडिका कार येत असताना शिर्डीहून मुंबईकडे जात असलेल्या एका खासगी आराम बसला हरसूल गावाजवळ धडक बसली. बसमधील बहुतेक जण झोपेत असतानाच हा अपघात झाल्याने अनेकांना क्षणभर काय झाले ते कळले नाही. धडक बसताच झालेल्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कारमधील संपत सुभाष शिंदे, संतोष सुभाष शिंदे हे दोघे भाऊ व त्यांचा मामेभाऊ ज्ञानेश्वर वाजे हे तिघे जागीच ठार झाले. शिंदे बंधू सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे रहिवासी होते. तिघे जण ऐन पंचविशीतील होते. शिवाजी पाटील (टेंबुरवाडी) हे जखमी झाले. अपघातात आराम बसचे फारसे नुकसान झाले नाही.

‘ग्रंथराज दासबोध’ पारायण सप्ताहास कर्जतमध्ये प्रारंभ
कर्जत, २८ जून/वार्ताहर

श्री क्षेत्र सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथराज दासबोध पारायण सप्ताहाचे आयोजन येथील सप्रे यांच्या निवासस्थानी असलेल्या ‘श्रीधर कुटी’मध्ये करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. सध्या ग्रंथराज दासबोध पारायण सप्ताह सुरू झाला आहे. ३० जूनपर्यंत हा सप्ताह सुरू असेल. प्रारंभी समर्थभक्त कल्याण हरी ठाकूरदेसाई तसेच वसंत जोशी, मालतीबाई साने, श्रीकांत सप्रे आणि कर्जतच्या माजी नगराध्यक्षा वनिता म्हसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समर्थभक्त अशोक कुळकर्णी यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविकही केले. यानिमित्ताने या ठिकाणी दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसात या कालावधीत ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी (सुमंत) यांची कीर्तने होणार आहेत. समर्थभक्त बाकरेबुवा रामदासी हे सामूहिक दासबोध पारायणाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत प्रज्ज्वल उडाणशिवे तालुक्यात सर्वप्रथम
देवरुख, २८ जून/वार्ताहर

देवरुखातील अरुंधती पाध्ये इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थी प्रज्ज्वल उडाणशिवे याने महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. प्रज्ञाशोध परीक्षेत प्रज्ज्वलला १४५ गुण मिळाले. तसेच राज्य गुणवत्तायादीत त्याने २२८वा क्रमांक मिळवला. इंग्रजी माध्यम शाळेत शिकताना प्रज्ज्वलने मिळवलेल्या या यशाचे शहरातून विशेष कौतुक होत असून, इयत्ता चौथीमध्येही प्रज्ज्वलने शिष्यवृत्ती मिळवली होती. त्याला वाचनाची प्रचंड आवड असून इतक्या लहान वयात त्याने सुमारे ४०० पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. या यशाबद्दल प्रज्ज्वलचे पाध्ये इंग्रजी माध्यम शाळेचे संस्थापक सदानंद भागवत व मुख्याध्यापिका सौ. दीपाली मांगले यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

महाड रोटरी अध्यक्षपदी अमोल शहा यांची निवड
महाड, २८ जून/वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ महाड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पदग्रहण समारंभ येथील बी.एस.बुटाला सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असता, याप्रसंगी पुढील वर्षांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन अध्यक्षपदी अमोल शहा यांची एकमताने निवड करण्यात आली. रोटरी महाडचे मावळते अध्यक्ष परेश शेट यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाडचे नगराध्यक्ष संदीप जाधव, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजीराव गुरव विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना संदीप जाधव त्यांनी रोटरीच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल संस्थेच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे पुढील वर्ष हे रौप्य महात्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय संपूर्ण राज्यामध्ये नावारूपाला येईल, यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.