Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

क्रीडा

आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये बेदी, गावसकर, कपिलचा समावेश
रणजीतसिंह, दुलिपसिंह, सी. के. नायडू, र्मचट, हजारे यांचा विसर
मुंबई, २८ जून / क्री. प्र.
भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार व सलामीवीर सुनील गावसकर व माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव या तीन क्रिकेटपटूंची नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या ५५ खेळाडूंचा समावेश असलेल्या हॉल ऑफ फेम यादीत समाविष्ट केली आहेत. महान क्रिकेटपटूंच्या यादीत आयसीसीने कोलिन काऊड्री यांचा समावेश करण्याचे ठरविले आहे, पण अद्याप ते औपचारिकपणे जाहीर केलेले नाही. या ५५ खेळाडूंमध्ये २२ इंग्लिश, ११ ऑस्ट्रेलियन, १३ वेस्ट इंडिज तर भारत, पाकिस्तानमधील प्रत्येकी ३ तर दक्षिण आफ्रिकेतील दोन आणि न्यूझीलंडमधील एका क्रिकेटपटूचा समावेश आहे.

मानसिक थकव्याने पराभव - सायना
हैदराबाद, २८ जून / पीटीआय

सायना नेहवालने इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्याकडून मलेशियन ग्रां प्रि स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा बाळगल्या जात होत्या पण ती या स्पर्धेत विजेतेपद पटकावू शकली नाही. या पराभवाला मानसिक थकवा हे कारण असल्याचे तिने म्हटले आहे. इंडोनेशियन ओपन जिंकून इतिहास घडविल्यानंतर सायनाचा आत्मविश्वास उंचावला होता. पण चीनची झिन वांग या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिचे स्वप्न भंगले.

मायकेल वॉनचा निवृत्तीचा निर्णय लवकरच
लंडन, २८ जून / पीटीआय

अ‍ॅशेस मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलेला आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याचे ब्रिटिश मिडियाचे वृत्त आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी ३४ वर्षीय वॉनने निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले आहे.

आता कसोटी सामन्यासाठी सज्ज - सईद अजमल
कराची, २८ जून/पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रभावी कामगिरी नोंदविल्यानंतर फिरकी गोलंदाज सईद अजमल आता कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. टेस्ट कॅप मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या अजमलला श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. दहा एकदिवसीय सामन्यांमध्ये अजमलच्या नावावर आठ, तर आठ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १३ विकेट्स जमा आहेत.

नेमबाजी : तेजस्विनी मुळेला तीन सुवर्ण व दोन रौप्य;
महाराष्ट्राची चमक

औरंगाबाद, २८ जून /खास प्रतिनिधी

पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडापीठात झालेल्या दहाव्या कुमार सुरेंद्रसिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची नेमबाज तेजस्विनी मुळे हिने चमकदार कामगिरी नोंदविली आहे. या स्पर्धेत तेजस्विनीने तीन सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ५० मीटर स्पोर्ट रायफल थ्री पोझिशन या नेमबाजी प्रकारात तेजस्विनीने आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरूर (रेल्वे), तेजस्विनी सावंत (महाराष्ट्र) या दोन मान्यवर नेमबाजांना मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले.

‘मैं शराबी नही’
मेलबर्न, २८ जून / वृत्तसंस्था

‘‘मी काही मद्यपि नाही.. मी कधी कधी घेतो..’’ मद्यपानामुळे ज्याची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे, त्या अ‍ॅंड्रय़ू सायमंड्सचे हे वक्तव्य आहे. ‘नाइन नेटवर्क’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, की ‘‘मला मद्यपि म्हणण्याएवढी मी मद्य कधीच घेत नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी मद्य घेतो. जेव्हा मी भरपूर मद्य घ्यायचो त्याचा मला अभिमान वाटत नाही. भरपूर मद्य घेतल्यानंतर माझ्या हातून संघशिस्तीचा भंग झालेला आहे.’’ एका सामन्यावेळी तो मद्य घेऊनच मैदानात आला होता. त्याच्या अशा वर्तनामुळे त्याचे समुपदेशन चालू होते. समुपदेशनामुळे तो ‘सुधारला’ आहे, असेही सांगण्यात येत होते. मात्र नुकत्याच संपलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेवेळी मद्यपानामुळेच तो अडचणीत सापडला. त्याची ऑस्ट्रेलिया संघातून हकालपट्टी करण्यात येऊन त्याला मायदेशी पाठविण्यात आले.

भारतीय महिला चॅम्पियन्स चॅलेंज वन हॉकी स्पर्धेसाठी पात्र
कझान, २८ जून / पीटीआय
भारतीय महिला हॉकी संघाने आज अंतिम लढतीत बेल्जियमचा ६-३ गोलने धुव्वा उडवला आणि पहिल्या चॅम्पियन्स चॅलेंज दोन हॉकी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवत चॅम्पियन्स चॅलेंज ‘वन’ हॉकी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या विजेतेपदासह भारतीय महिला संघाने २०१२ मध्ये होणाऱ्या महिला चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत प्रवेश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली. २०११ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स चॅलेंज ‘वन’ स्पर्धेतील विजेता संघ त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी पात्र ठरेल. आज झालेल्या अंतिम लढतीत राणी रामपालने (१७, ३८, ४४ आणि ५४ वा मिनिट) चार गोल नोंदवत भारताच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. अनुभवी साबा अंजूम (२०वा मिनिट) आणि चंचन देवी (४९ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत तिला योग्य साथ दिली. बेल्जियमतर्फे कर्णधार व्हलेरी व्हेरमीश्च (४० व ५२ वा मिनिट) आणि जील बूम (५५ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणारी भारताची राणी रामपाल उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. भारताची कर्णधार सुरिंदर कौर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली.

भारतीय फलंदाजांची हाराकिरी;रवी रामपॉलचे चार बळी
किंग्स्टन, २८ जून / वृत्तसंस्था

भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण धोनीला तो निर्णय चुकीचा असल्याचे फलंदाजांनी दाखवून दिले. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकाविणारा कार्तिक टेलरच्या गोलंदाजीवर चकला व यष्टीपाठी झेलीत झाला. गंभीर व रोहित शर्मा यांनी मात्र बाहेरचे चेंडू स्पर्श करण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.
त्यामुळे आपोआपच युवराज व धोनी यांच्यावर दडपण आले. तरीही युवराजने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना ५ चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. मात्र त्याची ही खेळी त्यानंतर संपुष्टात आली. युवराज परतल्यावर पुन्हा एकदा आपले सहकारी दुसऱ्या टोकाला पॅव्हेलियनचा रस्ता लगबगीने धरत असल्याची पाहण्याची वेळ धोनीवर आली. त्यामुळे भारतीय संघ शतकाचा उंबरठाही ओलांडणार नाही, असा अंदाज कुणीही बांधला असता. विंडीजचे गोलंदाजही गाफिल राहिले. मग मात्र आर. पी. सिंगने धोनीला समर्थपणे साथ देत शतकी भागीदारी करून विंडीजच्या बेसावधपणाचा पुरेपूर फायदा उठविला. विंडीजचा वेगवान गोलंदाज रवी रामपॉल भलताच चमकला. त्याने ३७ धावांत ४ बळी तर ड्वेन ब्राव्होने २६ धावांत ३ बळी घेत भारताच्या डावाला मोठे खिंडार पाडले. जेरोम टेलरनेही दोन महत्त्वाचे बळी टिपले.

बडोदा क्रिकेट संघटनेवर अमिन पॅनेलचा ध्वज
बडोदा, २८ जून / पीटीआय
बडोदा क्रिकेट संघटनेच्या आज झालेल्या निवडणुकीत चिरायू अमिन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने वरचष्मा राखला. स्वत: अमिन यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तसेच त्यांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी दोन उपाध्यक्ष, दोन संयुक्त सचिव व खजिनदार अशी पदेही आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळविले. नारायण साटम व सेसिल विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला. समरजीतसिंह रणजीसिंह गायकवाड व संजय पटेल हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले तर माजी रणजीपटू साटम यांची मात्र मोठय़ा फरकाने हार झाली. स्नेहल पारीख व सचिन दळवी यांची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली. सेसिल विल्यम्स यांना मात्र पराभव सहन करावा लागला. भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी सचिव जयवंत लेले यांना या निवडणुकीत भाग घेता आला नाही. ते संघटनेचे सदस्य म्हणून अपात्र ठरले. निवडणुकीआधी त्यांनी अमिन पॅनेलशी चर्चा करून स्वत:ला पात्र ठरविण्यासाठी प्रयत्न केले पण ते यशस्वी ठरले नाहीत.

तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवासन
चेन्नई, २८ जून / पीटीआय

एन. श्रीनिवासन व के. एस. विश्वनाथन यांची तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व सचिव या पदांवर एकमताने निवड झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव असलेले श्रीनिवासन हे आठव्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. विश्वनाथन यांची ही तिसरी टर्म आहे. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत एम. ए. चिदंबरम स्टेडियम पाडून नव्याने अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले व ४५ हजार प्रेक्षकक्षमता असलेले स्टेडियम उभारण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला. पूर्वी या स्टेडियमची क्षमता ३६ हजार एवढी होती. या नव्या स्टेडियमसाठी १७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

डॅरेन ब्राव्हो म्हणजे जणू लारा - गेलचे कौतुकोद्गार
किंग्स्टन, २८ जून / पीटीआय

डॅरेन ब्राव्हो हा जगविख्यात फलंदाज ब्रायन लाराचेच प्रतिरुप असल्याचे वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याने म्हटले आहे. ब्राव्हो हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याच्या शैलीमुळे लाराच मैदानावर असल्याचा भास होतो. डावखुऱ्या ब्राव्होला फलंदाजी करताना पाहणे एक चांगला अनुभव असतो, असे गेल याने सांगितले. योगायोगाने लारा हाच ब्राव्होचा आदर्श. आपल्या आयडॉल प्रमाणे फलंदाजीचे तंत्र ब्राव्होने आत्मसात केले आहे. याखेरीज स्वत:मधील क्षमतांचा शोध घेत त्या वाढविण्यासाठी ब्राव्हो सदैव धडपडत असतो. सबीना पार्क येथे झालेल्या सामन्यात ब्राव्हो याने १६ चेंडूत १९ धावा केल्या होत्या. पहिल्याच सामन्यात तो सराईतासारखा खेळत होता. हा अनुभव त्याला पुढील सामन्यांमध्ये निश्चितच कामास येईल. ड्रेसिंग रुमध्येही तो निराश कधीच नसतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही ब्राव्होची स्तुती केली आहे. अवघ्या २० वर्षांच्या या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे. भविष्यात त्याची प्रचिती साऱ्यांना येईलच.