Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

व्यक्तिवेध

खाजगी उद्योग-व्यवसायात महत्वाच्या पदांवर असणाऱ्यांनी शासन-प्रशासनाची गरज ध्यानी घेऊन काही काळापुरता आपला उद्योग-व्यवसाय बाजूला सारावा, प्रशासनातील महत्वाची पदे स्वीकारावीत आणि आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला करून द्यावा ही अमेरिकन सरकारने रुजवलेली एक अभिनंदनीय प्रथा. पण त्याहीपेक्षा अभिनंदनीय गोष्ट अशी की उगवत्या पिढीतील अभ्यासू, गुणवंत व नेतृत्वक्षम तरुणांनाही अशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, देशासाठी एखादे तरी वर्ष द्यावे असा विचार त्यांच्या मनात यावा, व्हाइट

 

हाऊसमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांना मिळावी, शासन-प्रशासनातील खाचाखोचा त्यांना कळाव्यात आणि आयुष्याच्या उत्तरार्धातही अशा संधी चालून आल्याच तर त्यासाठी सज्ज रहावे या हेतूने व्हाइट हाऊसने सुरू केलेली व्हाइट हाऊस फेलो नावाची प्रथा. लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी असताना १९६४ साली ही प्रथा सुरू झाली आणि त्यानंतरच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने, मग तो रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅट, ती पुढे सुरूही ठेवली. गेल्या ४५ वर्षांत असे सहाशेहून अधिक फेलो व्हाइट हाऊसमध्ये नेमले गेले व त्यातल्या अनेकांनी पुढे प्रत्यक्ष अमेरिकन संसदेत वा राज्याराज्यांच्या सिनेटमध्ये कामही केले. पुढे अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी (संरक्षणमंत्री) बनलेले कॉलिन पॉवेल, ट्रॅव्हलॉसिटीचे सीइओ मिशेल पेलुसो, डल्लासचे मेयर टॉम लेपर्ट अशांचा त्यात अंतर्भाव होता. २००९-२०१० सालासाठीचे असे १५ फेलो नुकतेच निवडण्यात आले. सुमारे हजारेक नावांमधून १०८ जणांच्या नावांचा विचार यावर्षी करण्यात आला होता. शेवटच्या फेरीत ३० नाव२ निवडण्यात आली व त्यातून अनीषसह अन्य १४ जणांची या पदासाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या १०८ जणांमध्ये जवळपास आठ भारतीय असावेत असा तर्क त्या उमेदवारांच्या नावांची छाननी करून काढण्यात आला आहे. व्हर्जिनियातील अर्लिग्टनच्या कोमल बजाज स्मिथ, शिकागोचे सुदीप के. बोस, बोस्टनचे श्रीकांत के. चगुतुरू, कॅलिफोर्नियातील वेस्टलेक व्हिलेजचे अमर ए. देसाई, मॅसेच्युसेटसमधील ब्रुकलिनचे मनीष के. सेठी, न्यू यॉर्कमधील ब्रॉन्क्सचे मिनेश शाह, आणि फिलाडेल्फियाचे राज एम. शाह यांचा त्यात समावेश होता. अंतिम निवड झालेले डॉ. अनीष महाजन हे त्यापैकीच एक. अवघे ३४ वर्षे वयाचे महाजन यांनी पब्लिक पॉलिसी विषयात ब्राऊन विद्यापीठातून बी.ए. आणि एम.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर उक्लामधून (युनिव्हर्सिटी ऑफ सिटी ऑफ लॉस एंजेलिस) हेल्थ सव्‍‌र्हिसेसमध्ये एम. एस. केले. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून इंटरनॅशनल हेल्थमध्ये त्यांनी एम.पी.एच.ही पुरे केले. इंटर्न आणि हेल्थ सव्‍‌र्हिस रिसर्चर म्हणून न्यूयॉर्क राज्यातील पॉकेप्सीमध्ये काम करीत असताना रॉबर्ट वुड जॉन्सन क्लिनिकल स्कॉलरशिप त्यांना मिळाली. काही काळ फोर्ड फौंडेशन आणि रॅँड कॉर्पोरेशनचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. एचआयव्ही आणि एडस या विषयात त्यांनी अनेक अभ्यास निबंध वाचले, हे दोन्ही रोग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर जनजागृतीही केली. अमेरिकन सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच जगाला भेडसावत असलेल्या व अमेरिकेला त्याकामी पुढाकार घेऊन कराव्या लागत असलेल्या कामासाठी त्यांची नियुक्ती केली आहे, हे निश्चित. याआधी भारतीय वंशाच्या डॉ. संजय गुप्ता यांची अशीच निवड झाली होती. डॉ. गुप्ता सध्या सीएनएनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहात असतात हे येथे उल्लेखनीय. डॉ. महाजन यांची निवड ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी व्हाइट हाऊसच्या वतीने केली. या पदावर काम करणारे सर्वच गुणवंत नुसतेच आपले ज्ञान व अनुभव या पदामागे उभे करीत नाहीत तर आपल्या कार्यशैलीची सारी ताकद आपल्या समाजबांधवांबरोबरच व्हाइट हाऊसच्या चार भिंतीपलीकडील गरजवंतांमागेही उभी करतात हा मिशेल ओबामा यांनी व्यक्त केलेला विश्वास बराच बोलका आहे. ओबामांच्या प्रशासनात भारतीय वंशाच्या अनेक तरुण-तरुणींना मानाची पदे मिळत आहेत, मिळालीही आहेत. महाजनांचे नाव त्यावर कळसाध्याय चढविणारे ठरावे.