Leading International Marathi News Daily

सोमवार, २९ जून २००९

विविध

पाकिस्तानातील हिंदूंना ६० लाख रु. ‘जिझिया’ कर भरण्याचा तालिबानींचा फतवा!
इस्लामाबाद, २८ जून/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील बटाग्राम जिल्ह्णाातील हिंदूंनी ६० लाख रु. ‘जिझिया’ कर भरावा, असा फतवा स्वत:ला तालिबानांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने काढला आहे. बटाग्राम जिल्ह्णात राहणाऱ्या प्रकाश नावाच्या हिंदू डॉक्टरला दूरध्वनीवरून ही धमकी देण्यात आली.

मायकेल जॅक्सनच्या पार्थिवाचे पुन्हा विच्छेदन
लॉस एंजेलिस, २८ जून/पीटीआय

पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचे कोरोनर कार्यालयातर्फे करण्यात आलेले शवविच्छेदन त्याच्या कुटुंबीयांना योग्य वाटले नाही कारण त्यात कुठलाही निष्कर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे आता खासगी रोगनिदानतज्ज्ञाच्या मदतीने त्याच्या पार्थिवाची पुन्हा शवविच्छेदन करून तपासणी झाली.

माओवाद्यांच्या हिंसाचाराला सत्ताधारी माकपचे दुर्लक्ष कारणीभूत-ए. बी. बर्धन
नवी दिल्ली, २८ जून/ पी.टी.आय.

माओवाद्यांचा लालगढमधील हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालमधीस मार्क्‍सवादी कम्युनिस्ट सरकारला धारेवर धरत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. वर्धन यांनी माकपच्या सरकारने सर्वसामान्यांकडे विशेष करून आदिवासींसाठी काही न केल्याचा व त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

मान्सूनच्या विलंबामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम
नवी दिल्ली, २८ जून/पीटीआय
मान्सूनच्या विलंबामुळे कृषी उत्पादनात घट झाली तर देशाच्या आर्थिक वाढीवर लक्षणीय परिणाम होईल. पण तो घातक स्वरूपाचा मात्र नसेल, असे मुडीजने म्हटले आहे.
मुडी इकॉनॉमी डॉट कॉमचे अर्थतज्ज्ञ शेरमान चॅन यांनी सांगितले की, मान्सूनचा पाऊस नीट झाला नाही तर त्याचा आíथक वाढीवर परिणाम झाल्याशिवाय राहाणार नाही. हा परिणाम लक्षणीय असेल, पण घातक मात्र नसेल. भारतातील कृषी उद्योग पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात घट झाली तर ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नातही घट होईल. ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा २० टक्के असतो. सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक पन्नास टक्क्यांहून अधिक असतो. कृषी उत्पादन घटले तर काही व्यवसायांचे किंवा कुटुंबांचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे उद्योगातील गुंतवणुकीवरही परिणाम होईल. सेवा क्षेत्रावरही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होईल. त्यामुळे चलनवाढ होण्याचाही धोका आहे.

उष्म्याने त्रस्त दिल्लीकरांना पावसाने दिलासा
नवी दिल्ली, २८ जून/ पी.टी.आय.

राजधानी दिल्लीत आज दुपारी सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने उन्हाळ्याने त्रस्त दिल्लीकरांना थंडगार केले. मात्र सदर पाऊस मोसमी नसून अजून काही दिवस दिल्लीकरांना पावसाची वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. परंतु पावसामुळे १० अंश सेल्सियसने दिल्लीचे तापमान घसरल्याने ४०.८ अंश सेल्सियस वरून ३१ सेल्सियस इतके नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून कडकडीत उन्हाने तापलेले वातावरण आल्हाददायक बनले आहे. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसात काल रूजू झाला असून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, प. बंगाल, सिक्कीम येथील भागात येत्या तीन-चार दिवसांत दाखल होईल.

ऑस्ट्रेलियामध्ये दोघा भारतीयांवर हल्ला
मेलबर्न, २८ जून /पी.टी.आय.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, ताज्या घटनेत रविवारी सिडनी येथे दोन भारतीय तरुणांवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. रविवारी सकाळी सिडनीमध्ये छोटय़ाशा भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले, या हाणामारीमध्ये दोन तरुणांवर ‘बियर’च्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला, अशी माहिती ‘न्यू साऊथ वेल्स’च्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी आधी या तरुणांची ओळख अथवा राष्ट्रीयत्त्व उघड केले नव्हते. मात्र येथील वृत्तवाहिन्यांनी हल्ला झालेले तरुण हे भारतीय असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला. या प्रकरणी दोघा हल्लेखोरांना पकडण्यात आले आहे. हे दोन्ही हल्लेखोर पीकहर्स्ट आणि हर्स्टव्हिल या भागात राहणारे असून त्यांचे वय अनुक्रमे १६व १७ आहे. दरम्यान, हल्ला झालेल्या भारतीय व्यक्तींना सिडनी येथील रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.

सत्यम घोटाळा : उच्चाधिकार समितीचा अहवाल ९ जुलैला
कोलकाता, २८ जून / पी.टी.आय.

सत्यम कॉम्प्युटर्समधील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स् ऑफ इंडियाने (आयसीएआय) नेमलेली उच्चाधिकार समिती आपला अहवाल ९ जुलै रोजी सादर करणार आहे, अशी माहिती आयसीएआयचे अध्यक्ष यू. पी. अगरवाल यांनी दिली.

चेन्नई विमानतळावरील सुरक्षा वाढविली
चेन्नई, २८ जून / पी.टी.आय.

भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यावरून ब्युरो ऑफ सिव्हील अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)ने देशभरातील सर्व विमानतळावर दक्षता घेण्याची सूचना केली आहे. यानंतर चेन्नईमध्येही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. सौदी अरेबियातील जेद्दाह येथील सौदी एअरलाईन्सच्या कार्यालयाला वारंवार ही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे काल त्यांनी याची माहिती बीसीएएसलाही कळविली. त्यानंतर याबाबत भारतातील सर्व विमानतळांना ही सूचना देण्यात आली, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.