Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

व्यापार - उद्योग

‘अलिबाबा डॉट कॉम’चे १० लाखांहून अधिक एसएमई सदस्य
व्यापार प्रतिनिधी: अलिबाबा डॉट कॉम या जगातील सर्वात मोठय़ा बी टु बी (बिझनेस टु बिझनेस) ई-कॉमर्स कंपनीने आपली भारतातील सदस्य संख्या १० लाखांहून अधिक झाल्याची घोषणा केली आहे. दर महिन्यास ४० हजार भारतीय लघु व मध्यम उद्योग अलिबाबा डॉट कॉमच्या जागतिक ऑनलाईन मार्केट प्लेस (www.alibaba.com) चे सभासद होत आहेत. त्यामुळे गतवर्षी मे २००८ मध्ये पाच लाख असलेली सभासद संख्या यंदा ३१ मे २००९ रोजी दुप्पट म्हणजेच १० लाख झाली आहे. अलिबाबा डॉट कॉमच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या स्तरावर भारतीय एसएमईंची संख्या एकूण नोंदणीकृत सदस्यांच्या १२ टक्के झाली आहे. यामुळे अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेला देश ठरला आहे.
मानम एक्स्पोर्टचे संजीव गोगना हे अलिबाबा डॉट कॉमचे भारतातील १० लाखावे सदस्य ठरले आहेत. त्यामुळे एका विशेष कार्यक्रमात अलिबाबा डॉट कॉमचे संस्थापक व अध्यक्ष जॅक मा आणि अलिबाबा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वेई यांच्या हस्ते गोगना यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

स्थानीय बाजारपेठा हेच मफतलाल समूहाचे आगामी लक्ष्य

 

व्यापार प्रतिनिधी: मफतलाल इंडस्ट्रिज लिमिटेड या अरविंद मफतलाल समूहातील कंपनीने आपला ‘मेफ्रेन’ हा साडी ब्रँड पुन्हा बाजारात आणला आहे. शिफॉन, जॉर्जट, स्पन आदी विविध प्रकारातील साडय़ा मफतलालने बाजारात आणल्या आहेत. लहान शहरातील पारंपरिक महिला ग्राहक मफतलालच्या साडय़ा पसंत करतात. या साडय़ा छपाई आणि दर्जा या श्रेणीत उपलब्ध असून त्यांची किमत ३०० रुपये ते ५५० रुपयांच्या दरम्यान आहे.
मफतलालने आपला बेड फॅशनमधील प्रसिद्ध ‘ड्रिम्झ’ हा नोंदणीकृत ब्रँडही पुन्हा बाजारात आणला आहे. या ब्रँडमधील बेड फॅशन पॉलिएस्टरकॉटन फॅब्रिक्स आणि कॉटन फॅब्रिक्स या प्रकारात उपलब्ध असून बेड सेटची किंमत ३९५ रु. ते ६०० रु.च्या दरम्यान आहे.
मफतलालतर्फे पॉपलिन्स, रूबिया, यार्न डाईड शर्टिग, प्लेन शर्टिग, बॉटम वेअर, सूटिंग्ज, शाळांचे गणवेश, कंपनी गणवेश आदी विविध दर्जाचे प्रकार उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्या १०० वर्षांपासून मफतलाल हा समूह शंभर टक्के सुती आणि पॉलिएस्टर सुती धवल वस्त्रांच्या बाजारपेठेत आघाडीवर आहे. मफतलाल प्रत्येक महिन्याला १२ लाख मीटर धवल वस्त्रांची निर्मिती करते. मफतलाल फॅब्रिक्सने आता लॉन्स, कॅम्ब्रिक, पॉलिन्स आणि डॉबीज असे धवल कलेक्शनमधील विविध अनोखे प्रकार बाजारात उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर धोतर आणि रूबिया या पारंपरिक उत्पादनांवरही मफतलाल मोठय़ा प्रमाणावर लक्ष केंद्रित करून आहे. कंपनीच्या महाराजा आणि रिअल डायमंड यांसारख्या आघाडीच्या धोतर ब्रँडला ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. लवकरच एथनिक वेअर बाजारपेठेत प्रवेश करण्याचा मफतलालचा विचार आहे. मफतलाल इंडस्ट्रीज लि.च्या विकली आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्री. रघुनाथ एम. बी. यांनी माहिती देताना सांगितले की, मफतलाल समूह आपल्या निम घाऊक वितरक आणि किरकोळ वितरण वाहिन्यांच्या जाळ्यात वाढ करून स्थानिक बाजारपेठेतील विक्री बळकट करण्यावर भर देणार आहे. सध्या मफतलाल यांच्याकडे ३०० निम घाऊक वितरक देशभरात असून, त्यांची संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मफतलालची देशभरात ६००० किरकोळ विक्री केंद्रे असून, १९२ रिटेल शोरूम्स आहेत. रिटेल शोरूमची संख्या पाच वर्षांत ५०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
मफतलालच्या वतीने जूनअखेरपासून ते ऑगस्ट २००९ अखेपर्यंत तयार कपडे मेळावा, प्रदर्शन आणि अनेक परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘फ्लाय दुबई’च्या सेवांचे भारतात पदार्पण
व्यापार प्रतिनिधी: दुबईची पहिली किफायतशीर विमानसेवा ‘फ्लाय दुबई’ने आपल्या आगामी विस्तार नियोजनात भारतातील तीन वेगवेगळ्या गंतव्य ठिकाणांची निवड घोषित केली आहे. फ्लायदुबईच्या सेवांचे भारतातील पदार्पण हे येत्या १३ जुलैला भारताच्या उत्तरेला असलेल्या लखनौ या शहरातून घेतल्या जाणाऱ्या विमानोड्डाणाने होणार आहे. त्या पाठोपाठ कोइम्बतूर येथून १४ जुलैला, तिसरे उड्डाण हे २३ जुलै रोजी उत्तर-पश्चिमेकडील चंदीगढ या शहरातून होऊ घातले आहे. या तिन्ही ठिकाणांहून त्यानंतर थेट संयुक्त अरब अमिरातीसाठी नियमित उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत.
संयुक्त अरब अमिरातीसाठी अधिक सोयीस्कर, थेट आणि किफायतशीर भाडय़ाच्या थेट सेवेच्या उपलब्धतेतून येथे व्यापार अथवा पर्यटनासाठी येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना आता अधिक पर्याय उपलब्ध होतील. सध्याच्या घडीला संयुक्त अरब अमिरातीत अल्पखर्चिक विमानसेवेचा एकूण विमान प्रवासातील ह्स्सिा अवघा दोन ते पाच टक्के इतका आहे. त्यामुळे लो कॉस्ट विमानसेवेच्या बाजारपेठच्या वृद्धीला येथे बराच वाव असल्याचे मत फ्लायदुबईचे सीईओ गाइथ अल् गाइथ यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केले. या सेवेसाठी तिकीटांचे बुकिंग www.flydubai.com या वेबसाइटवरून किंवा फ्लायदुबईच्या कॉल सेंटरवर क्रमांक 1 860 266 3366 फोन करून अथवा कंपनीच्या ट्रॅव्हल पार्टनर्सद्वारे करता येईल.

एअर अरेबिया व शारजा चॅरिटी इंटरनॅशनल यांच्या सहयोगातून केरळमध्ये नवीन शाळा
व्यापार प्रतिनिधी: मध्य पूर्व व उत्तर आफ्रिकेतील सर्वात पहिली व सर्वात मोठी किफायतशीर दरात चालविली जाणारी अर्थात लो-कॉस्ट विमान कंपनी एअर अरेबियाने शारजा चॅरिटी इंटरनॅशनलच्या सहयोगाने भारतातील केरळ राज्यातील त्रिस्सूर जिल्ह्य़ात नवीन चॅरिटी क्लाऊड स्कूल या नवीन शाळेचे उद्घाटन केल्याची घोषणा केली आहे.
एअर अरेबियाच्या चॅरिटी क्लाऊड प्रकल्पांतर्गत या शाळेची उभारणी करण्यात आली आहे. एअर अरेबियाच्या ऑन-बोर्ड पॅसेंजर्सनी मदतीच्या स्वरूपात दिलेल्या रकमेतून चॅरिटी क्लाऊड प्रकल्प चालविला जातो. केरळमधील ही शाळा हा एअर अरेबियाचा भारतातील पहिला कम्युनिटी स्कूल प्रकल्प आहे. २००९ सालच्या एअर अरेबियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कार्यक्रमाच्या धोरणांनुसार हा प्रकल्प चालविला जात आहे. समाजातील वंचित स्तरातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करवून देण्याच्या उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे.
२००५ साली एअर अरेबियाने शारजा चॅरिटी इंटरनॅशनलच्या सहयोगाने चॅरिटी क्लाऊड प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

‘इटर्नो’तर्फे मोबाईलवर ‘न्यूज हंट’ सेवा
व्यापार प्रतिनिधी: नावीन्यपूर्ण ग्राहक उपयोगी मोबाईल संकल्पना सादर करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या इटर्नो इन्फोटेक प्रा. लि.ने आपली ‘न्यूज हंट’ सेवा सादर केली आहे. या नवीन सेवेमुळे ग्राहकांना इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांतील लोकप्रिय वर्तमानपत्रे आपल्या मोबाईल फोनवर वाचता येणार आहेत. नुकतीच रेडीफ डॉट कॉम इंडिया लि.ने इन्फोटेक प्रा. लि. मध्ये गुंतवणूक केली आहे. या नवीन न्यूज हंट सेवेच्या माध्यमातून मोबाईलधारकांना त्यांच्या जी.पी.आर.एस. समर्थित मोबाईल फोनवर इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमधील लोकप्रिय वर्तमानपत्रे वाचता येणार असून प्रादेशिक भाषांच्या फाँटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मोबाईलवरदेखील ती वाचता येऊ शकतील. यामध्ये दैनिक जागरण, दैनिक भास्कर, सकाळ, मल्याळम मनोरमा, मातृभूमी, दिन मल्हार, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या १५ लोकप्रिय इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांची वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच न्यूज हंट अ‍ॅप्लिकेशनमध्ये वाचकांसाठी वर्तमानपत्रांच्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आवृत्त्यासुद्धा उपलब्ध असतील व त्याद्वारे त्यांना छोटय़ा जाहिराती, करमणूक, भविष्य यांसारख्या सदरांचा आनंददेखील घेता येईल.
ग्राहकांसाठी त्यांच्या मोबाईलवर खूप लोकप्रिय वर्तमानपत्रे वाचण्याची ही नवीन सुविधा सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या सेवेचा फायदा ५०० हून अधिक लोकप्रिय मोबाईल हँडसेटवर घेता येणार असल्याचे इटर्नोचे संस्थापक व संचालक उमेश कुलकर्णी या वेळी बोलताना म्हणाले.
‘न्यूज हंट’ सेवा आपल्या जी.पी.आर.एस. समर्थित मोबाईल फोनवर सुरू करण्यासाठी ग्राहकांना 'ँ४ल्ल३' असा एसएमएस ५७३३३ या नंबरवर पाठवून मोफत डाऊनलोड लिंक एसएमएसद्वारे मिळविता येईल किंवा मोबाईल फोन ब्राऊजरद्वारे http//newshunt.com या संकेतस्थळावर जाऊन ही सेवा सुरू करता येईल.

‘आयएपीएमओ’तर्फे बांधकाम व्यावसायिकांसाठी कार्यशाळा
व्यापार प्रतिनिधी: प्लंबिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षित, प्रमाणित अशा कामगारांची कमतरता यामुळे भारतीय नागरिकांना बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. दरवर्षी सुमारे ७.५ टक्के लोक पाणी आणि सॅनिटेशनच्या कारणांमुळे दगावतात. डिझाईन आणि इन्स्टॉलेशनच्या मानकांवर आधारित प्लंबिंगच्या योग्य प्रशिक्षणाचा अभाव हे यामागचे प्रमुख कारण आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लंबिंग अ‍ॅण्ड मेकॅनिकल इंजिनीयर्स (आयएपीएमओ) ही संस्था इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) च्या सहयोगाने या त्रुटी दूर करण्यासाठी कार्य करत आहे.
आयएपीएमओने आपल्या जागृती अभियानांतर्गत मुंबईमध्ये आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकांसाठी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये भाग घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये हिरानंदानी कन्स्ट्रक्शन्स, लोखंडवाला कन्स्ट्रक्शन्स आणि मिराज कन्स्ट्रक्शन्स यांचाही समावेश होता. ट्रेन दि ट्रेनर या नामांतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये बांधकाम व्यावसायिक कंपन्यांच्या वरिष्ठ बांधकाम प्रबंधकांना बांधकाम क्षेत्रामध्ये समान प्लंबिंग मानकांचे आणि कोडस्चे महत्त्व आणि आवश्यकता यांविषयी सांगितले. या कार्यशाळेमध्ये आलेले प्रबंधक या गोष्टींचे महत्त्व प्रकल्प अभियंता आणि नियोजकांना सांगून त्यांनाही समान प्लंबिंग मानके आणि कोडस् वापरण्यास प्रवृत्त करतील. आयएपीएमओ आणि आयपीए यांनी संयुक्तरीत्या युनिफॉर्म प्लंबिंग कोड- इंडिया (वढउ-क) हे भारतीय बांधकाम क्षेत्रासाठी विशेष असे प्लंबिंग प्रॅक्टिस कोड फेब्रुवारी, २००८ मध्ये तयार केले आहे.

व्यापार संक्षिप्त
फिनोलेक्स इंडस्ट्रीजला ३३ कोटींचा तिमाही निव्वळ नफा

व्यापार प्रतिनिधी: फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.ने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या तिमाहीत रु. ४२२.८७ कोटींची विक्री केली असून, रु. ३३.०४ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची विक्री रु. ५००.९९ कोटी होती. त्यातुलनेत यंदा विक्री काहीशी घटली असली तरी गेल्या वर्षीच्या रु. १.२१ कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी कंपनीचा परिचालनात्मक नफा रु. १३९.१० कोटी इतका आहे, जो गत आर्थिक वर्षांच्या तुलनेत ५२ टक्के वाढला आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात अनपेक्षित घट झाल्यामुळे कंपनीच्या मार्जिनवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक वर्षांत कंपनीला रु. ३७.८९ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. आधीच्या आर्थिक वर्ष २००७-०८ मध्ये कंपनीने रु. ७१.१९ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने आपली पीव्हीसी पाइप्सची उत्पादन क्षमता प्रति वर्षी ९७२०० टनांवरून १४०,००० टनांवर नेण्याची योजना आखली आहे. ही वाढीव क्षमता चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.
एसजीएम डायमंड मान्सून फेस्टिव्हल
व्यापार प्रतिनिधी: पावसाच्या आगमनाबरोबरच पुढे येणाऱ्या श्रावणमासाची आणि सणासुदीची चाहूल व उत्कंठा वाढू लागते. सणासुदीतील ग्राहकांचा खरेदीचा कल हेरून एस.जी.एम. ज्वेलर्स, दादर यांनी हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर विशेष भेटवस्तू देणारी ‘एस.जी.एम. डायमंड मान्सून फेस्टिव्हल’ या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार रु. ५००० ते रु. १०,००० पर्यंतच्या हिऱ्यांच्या दागिने खरेदीवर एक हँडबॅग मोफत देण्यात येणार आहे. १०,००० ते २०,००० रुपयांच्या खरेदीवर गोल्ड प्लेटेड मनगटी घडय़ाळ, तर २० हजार रुपयांच्या वरील खरेदीवर मोत्यांच्या नेकलेसचा सेट मोफत देण्यात येणार आहे.
‘मेट्रोपोलिस’चे आरोग्य तपासणी शिबीर
व्यापार प्रतिनिधी : भारतातील आघाडीची डायग्नोस्टिक्स सेंटर्सची बहुराष्ट्रीय शृंखला असलेल्या मेट्रोपोलीस हेल्थ सव्‍‌र्हिसेसच्या वतीने पितृदिनाच्या निमित्ताने पुरुषांसाठी विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन भारतभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये केलेले आहे. या विशेष आरोग्य तपासणी शिबिरात पुरुषांकरिता विशेष सवलतीच्या दरांमध्ये आरोग्य तपासणी करता येईल आणि हे शिबीर २० जून ते १० जुलै २००९ दरम्यान सुरू असेल. मेट्रोपोलीस दोन आठवडय़ांहून अधिक काळ मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, बंगळूर, चेन्नई, कोईम्बतूर, केरळ, दिल्ली व कोलकाता या शहरांतील आपल्या केंद्रातून ही सेवा देऊ करणार आहे. या पॅकेजेसचे दर शहरांनुसार वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत. मुंबईत १४ मेट्रोपोलिस हेल्थ सव्‍‌र्हिसेस केंद्रांतून ही सेवा मिळणार आहे. तुमच्या जवळच्या केंद्राविषयी जाणून घेण्याकरिता मेट्रोपोलिस हेल्थ सव्‍‌र्हिसेसला ९१-९९८७८५८३२८ या क्रमांकावर साधता येईल.
सचिन ट्रॅव्हल्सचा मान्सून धमाका
व्यापार प्रतिनिधी: आघाडीचे सहल आयोजक ‘सचिन ट्रॅव्हल्स’च्या मान्सून धमाक्याने पावसाच्या आगमनासह दमदार हजेरी लावली आहे. जुलै ते सप्टेंबर २००९ कालावधीतील या मान्सून धमाक्यात दक्षिण पूर्व आशिया व भारतातल्या सहलींसाठी सवलतींची बरसात केली जाणार आहे. या मान्सून धमाक्यात दक्षिण पूर्व आशियाच्या वेगवेगळ्या सहा पर्यायांवर २०,००० रुपयांपर्यंत डिस्काऊंट उपलब्ध असून, भारतातल्या अनेक सहली केवळ ११,१११ रुपयांत करता येणे शक्य होणार आहे. या सर्व सहलींसाठी सहलीचे दिवस, उत्तम हॉटेल्स, एसी बसेस, रुचकर भारतीय भोजन, स्थलदर्शन आणि सचिन स्पेशल सव्‍‌र्हिसेस यात कोणतीही काटछाट नसूनही सहलखर्चात मात्र लक्षणीय कपात केलेली आहे. ‘या किंमतीत अशा सहली अन्य कुठेही मिळणार नाहीत,’ असा दावा सचिन ट्रॅव्हल्सने केला आहे. सचिन ट्रॅव्हल्सच्या कुठल्याही कार्यालयात किंवा २४२३१०१० या क्रमांकावर या संबंधीचा अन्य तपशील कळू शकेल.
बिर्ला सन लाइफच्या बेसिक इंडस्ट्रीज फंड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडचे लाभांश
व्यापार प्रतिनिधी: बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या इक्विटी गटातील दोन प्रमुख योजनांनी उत्तम आर्थिक कामगिरी बजावल्यामुळे या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार बिर्ला सन लाइफ बेसिक इंडस्ट्रीज फंड योजनेत लाभांश पर्याय स्वीकारलेल्या गुंतवणूकदारांसाठी बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने ५० टक्के लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख २३ जून २००९ अशी निश्चित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बिर्ला सन लाइफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड प्लान-ए योजनेत लाभांश पर्याय स्वीकारलेल्या गुंतवणूकदारांसाठीसुद्धा १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. या लाभांशासाठीसुद्धा २३ जून २००९ हीच रेकॉर्ड तारीख होती.
‘एलजी’ प्लाझ्मा पॉवरहाऊस
व्यापार प्रतिनिधी: एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने ६०० एचझेड सब-फिल्ड ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी असलेला सिंगल लेयर सोफिस्टिकेशन पीक्यू ७० एचडी प्लाझ्मा टीव्ही दाखल केला आहे. ‘अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, ब्यूटीफुली हिडन’ हे कंपनीचे ब्रीद असलेल्या स्लीक आणि सोफिस्टिकेटेड फ्रेमलेस पीक्यू ७०च्या चित्राचा दर्जा अप्रतिम आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स ही प्लाझ्मा टीव्ही क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून २००८ साली कोरियातील एकूण प्लाझ्मा विक्रीपैकी ५० टक्के, भारतात ४४ टक्के हिस्सा मिळवून कंपनीने यामध्ये सातत्याने आपले अग्रेसर स्थान राखले आहे. दर्जेदार चित्र आणि आकर्षक डिझाईनइतकेच वाढत्या इंधन किमती आणि पर्यावरणही महत्त्वाचे आहे, असे एलजीईआयएलचे व्यवस्थापकीय संचालक मून बी. शिन यांनी सांगितले.
सनड्रॉपचा गोल्ड लाइट
व्यापार प्रतिनिधी: अमेरिकेतील कॉन अ‍ॅग्रा फूड्सची संलग्न कंपनी असलेल्या अ‍ॅग्रो टेक फूड्स लिमिटेडने सनड्रॉप गोल्ड लाइट हा सनड्रॉप खाद्यतेलाचा नवा प्रकार बाजारात सादर केला आहे. सनड्रॉप तेल मालिकेतील गोल्ड लाइट हा नवा प्रकार चवदार रिफाइंड वनस्पती तेलापासून बनवलेला आहे. याची किंमत ७५ रुपये आहे, असे कंपनीचे अध्यक्ष सचिन गोपाल यांनी सांगितले. गोल्ड लाइटमध्ये मक्यापासून काढलेले तेल (४० टक्के) आणि सूर्यफुलापासून काढलेले तेल (६० टक्के) यांचे मिश्रण आहे. इतर खाद्यतेलांच्या मानाने गोल्ड लाइट जास्त आरोग्यकारक आहे. या तेलातले संपृक्त स्निग्धांशाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खाणाऱ्याच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते, असा कंपनीचा दावा आहे.