Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

अग्रलेख

‘आत्मगौरव’ सन्मान

 

‘जीवनगौरव’ सन्मान सर्वसाधारणपणे करतात तो एखाद्याच्या यशस्वी व तेजस्वी कारकीर्दीच्या अखेरीस. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या क्षेत्रातून निवृत्त व्हावे, अशी अपेक्षा असते. सोमवारी विधानभवनात त्या व इतर काही पुरस्कार-सन्मानांचा जो सोहळा ऊर्फ ‘महा-फार्स’ झाला, तो पाहिल्यानंतर त्या मानकऱ्यांपैकी कुणीही निवृत्त होण्याची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात येते. त्यामुळे तमाम मराठी जनतेला होत असलेला आनंद लगेचच मावळला आहे. साहजिकच त्या सोहळ्याचे नाव ‘आत्मगौरव’ सन्मान असेच असावयास हवे होते, अशीच प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली आहे. शिवाय त्या सर्व मानकऱ्यांपैकी कुणी, कुठे, कोणती व कधी तेजस्वी कामगिरी केली होती, हे आठवायचा प्रयत्न करूनही कुणालाही स्मरत नव्हते. जर यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमरशेख, ग. दि. माडगूळकर, माधवराव बागल, पंजाबराव देशमुख, गोविंदभाई श्रॉफ, बॅ. नाथ पै, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर या व अशा काही लोकांना ‘मरणोत्तर जीवनगौरव सन्मान’ दिला असता तर त्यात थोडे फार तरी औचित्य दिसले असते. महाराष्ट्र निर्मितीसाठी आणि उभारणीसाठी त्यांचे योगदान आहे. परंतु महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर ज्यांची कर्तबगारी फक्त आमदार-खासदार-मंत्री होण्यापलीकडे फारशी नाही, त्यांनी या निमित्ताने स्वत:चाच गौरव करून घेतला आहे. त्यांच्यापैकी कुणीही आपण नक्की काय तेजस्वी कर्तबगारी केली आणि त्यामुळे आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र कसा पुढे गेला, हे सांगू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपण कसे, काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्राची वा मराठी माणसाची मान अवघ्या देशात अभिमानाने उंचावली, हेही दाखवू शकणार नाही. या मंडळींवर (आपल्या दुर्दैवाने) आत्मचरित्र लिहिण्याचा प्रसंग आलाच आणि त्यांनी ते जरी प्रामाणिकपणे लिहिले, तरी आपण कुणाच्या तंगडय़ा खेचल्या किंवा कुणाच्या तंगडय़ा त्यांच्याच गळ्यात अडकविल्या, कुणाला शह-काटशह दिला, आपले पद व प्रतिष्ठा वापरून किती भूखंडांवर कब्जा केला, साखर कारखाने, बँका, पतपेढय़ा यांचा स्वत:साठी वा कुटुंबासाठी (मुख्यत: संपत्ती जमा करायला) कसा वापर करून घेतला, सत्ता व अधिकार आपल्या कुटुंबाकडेच राहावी म्हणून काय डावपेच केले हेच सर्व लिहावे लागेल. महाराष्ट्र त्या आत्मचरित्रात आला तर ओघानेच व तसा क्वचितच येईल. कारण या सर्वाचा महाराष्ट्राशी असलेला संबंध हा त्यांनी साध्य केलेल्या पदाशी आहे, जनतेशी नाही. यांच्यापैकी कुणीही नवा, क्रांतिकारक, किमान चौकटीबाहेरचा विचार वा कार्यक्रम राज्याला दिला नाही. व्यासंग, वाचन, मनन, चिंतन याबद्दल त्यांच्याकडून कुणी अपेक्षा करीतच नाही. प्रत्यक्ष समाजकार्य, एखादी चळवळ, एखादी संघटना (म्हणजे साखर कारखाना वा ताब्यातील शिक्षणसंस्था नव्हे) यांच्यापैकी कुणी उभी केली, की ज्या संघटनेपासून स्फूर्ती घेऊन देशात अन्यत्र तशा संघटना उभ्या राहिल्या? असा कोणता मूलभूत वा माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला की ज्यामुळे देशात वा किमान महाराष्ट्रात त्याबद्दल चर्चा झाली? अशी किती भाषणे दिली की, ज्यामुळे समाजात एक चैतन्याची, उत्साहाची लाट आली? (विधानसभेत वा लोकसभेत केलेली भाषणे व त्यांचे संकलित ग्रंथ वगळता) जर यापैकी वा तत्सम काहीही केलेले नसेल तर त्यांना ‘जीवनगौरव’ सन्मान, राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने देण्याचे प्रयोजन काय होते? या गौरवासाठी कोण पात्र आहे वा नाही हे ठरविणारी ज्यांची समिती होती त्यांनीच हे ‘आत्मगौरव’ निश्चित केले आणि विरोधी पक्षांना ‘मॅनेज’ करण्यासाठी त्यांनाही सन्मान वाटून टाकले. ते विरोधी पक्षांचे नेतेही तेवढेच निगरगट्ट! त्यांनी निलाजरेपणाने ते सन्मान स्वीकारलेसुद्धा. त्यांच्यापैकी कुणालाही संकोच वाटला नाही. शिवाय त्यांच्याच दर्जाचे (लायकीचे!) असूनही आर. आर. आबा पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, अजितदादा पवार (अगदी पद्मसिंह पाटीलसुद्धा- ज्यांचा उल्लेख आबा व आदींनी ‘आदरणीय नेते’ असा केला होता) राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करून देशाला डझनावारी गोल्ड वा सिल्व्हर मेडल्स मिळवून देणारे सुरेश कलमाडी हे कुणीच त्या गौरवयादीत कसे नव्हते? की हाही पक्षांतर्गत तंगडय़ा खेचायचा प्रकार? शिवसेनेच्या मनोहर जोशी- रामदास कदम यांना आणि भाजपच्या गोपीनाथ मुंडेंना हुशारीने ‘मॅनेज’ करताना त्यांच्याच फळीतले नितीन गडकरी यांना कसे वगळले गेले? शिवाय प्रत्येक सन्मान व पद आपल्याला मिळायलाच हवे, असा हट्ट असणारे रामदास आठवले यांनाही हा जीवनगौरव व सन्मान का दिला गेला नाही? हा आत्मगौरवाचा कंटाळवाणा प्रदीर्घ फार्स सादर करण्यासाठी जितका खर्च केला गेला, त्यापेक्षा कमी खर्चात किमान पाचशे अतिशय गरीब विद्यार्थ्यांना (नुकत्याच १० वी व १२ वीत ८० टक्के वा अधिक मार्क मिळविणाऱ्या) आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करता आली असती. परंतु सत्ताधारी व विरोधी, दोन्ही पक्षातले राजकारणी यांची आता एक घट्ट अशी गट्टी बनली आहे. ‘तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो’, आणि अधूनमधून ‘मी मारल्यासारखे करीन, तू रडल्यासारखे कर’ असा तो तहनामा आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सर्वाचीच जी मिलीभगत आहे ती मुख्यत: एकमेकांचा अफाट भ्रष्टाचार, टगेगिरी आणि गुंडगिरी लपविण्यासाठी आहे. दीपक मानकर असो व अविनाश भोसले, असे अनेकजण या सर्वाच्या बैठका-वर्तुळ-पाटर्य़ामधले भिडू आहेत. म्हणूनच विरोधी पक्षातल्या कुणीही हा ‘आत्मगौरव’ सन्मान नाकारण्याचे साधे नाटकही केले नाही. त्याचप्रमाणे अन्य कुणीही ही यादी कशी ठरली, असा साधा प्रश्नही विचारला नाही. अजून तरी या चार पक्षांच्या अभद्र चौकडीत ‘मनसे’ सामील नाही. कारण त्यांचे आमदार-खासदार कुणीही नाहीत. पण त्यांनीही खबरदारी घेतली नाही व संयम दाखविला नाही तर तेही या ‘मिलीभगत’मध्ये सामील होऊ शकतील. या गौरवाचे निमित्त जर महाराष्ट्राचे ‘सुवर्ण महोत्सवी वर्ष’ हे आहे तर ५० वर्षांत या दिग्गजांनी काय दिवे लावले, हेही जनतेसमोर यायला हवे. कारण याच काळात मुंबई शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुमारे ४० लाख ‘स्लमडॉग्ज्’ आणि चार हजार ‘स्लमलॉर्डस्’ तयार झाले. या स्लमलॉर्डस् आणि माफिया यांना हाताशी धरून मुंबईतील गिरणगावात व इतरत्र गगनभेदी टॉवर्स आणि झगमगणारे मॉल्स उभे राहिले. या टॉवर्समध्ये राहणारे लोक त्यांचे कोटय़वधी रुपये कुठून आणतात आणि देशोधडीला लागलेले लोक कसे जगतात, याकडे सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ‘आपण ग्रामीण नेते आहोत’ असे मान वर करून सांगणाऱ्या या नेत्यांनी ग्रामीण महाराष्ट्र कसा धुळीला मिळविला आहे हे पाहण्यासाठी फार दूर जायची गरज नाही. पवारांच्या पुणे जिल्ह्यात, विलासरावांच्या व मुंडेंच्या मराठवाडय़ात, सुशीलकुमार शिंदेंच्या व विजयसिंहांच्या सोलापुरात, मनोहर जोशींच्या रायगड वा मुंबईत चार-दोन तास फिरले तरी त्या भागातील मागासलेपण, दारिद्रय़, गरीब शेतकरी-आदिवासींची उपेक्षा सहज नजरेस पडेल. अजून राज्यातल्या हजारो गावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जाते आणि कित्येक खेडय़ांतील कुपोषित लहान मुले कोसन्कोस चालत शाळेत जातात. त्याबद्दल या ‘गौरव’वाल्यांना खेद वाटल्याचे कधी दिसलेले नाही. आपल्या हाती सत्ता असूनही फार काही होऊ शकले नाही, याचा पश्चात्तापही त्यांना झाल्याचे दिसत नाही आणि आपण उर्वरित आयुष्य त्या लोकांच्या भल्यासाठी व्यतीत करू अशी (तोंडदेखली!) शपथही कुणी घेतलेली नाही. आविर्भाव आणण्यासाठीसुद्धा परिस्थितीचे भान असावे लागते. ही मंडळी सत्तेच्या, अधिकाराच्या व संपत्तीच्या मग्रुरीत इतकी दंग आहेत की, त्यांना सोहळा व फार्स यातील फरकही कळला नाही.