Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

भाग्यदा लक्ष्मी भारम्मा..
भारतरत्न भीमसेन जोशी यांना २००८ मध्ये सदर सर्वोच्च बहुमान मिळाल्यानंतर त्यांचे आजपर्यंतचे एचएमव्ही-सारेगामा या कंपनीकडे जे ध्वनिमुद्रण होते त्यावर २००९ च्या सुरुवातीला प्रत्येकी दोन सीडींचा चार संचांचा संग्रह माय म्युझिक- द सारेगामा इयर्स या नावाने बाजारात आला आहे. आता याच मालिकेतील पुढचे तीन संग्रह एचएमव्हीकडून सादर झाले असून पंडितजींना ही पुन्हा फार मोठा मानवंदना आहे. भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान ज्यांच्या वाटय़ाला आला ती सर्व मंडळी थोर

 

आहेतच, पण शास्त्रीय संगीतासाठी जीवन वाहिलेल्या या ऋषीला हा सन्मान मिळणे हे खरेच मोठय़ा भाग्याचे होते. शास्त्रीय संगीतात कार्यरत असलेल्या पं. रवीशंकर यांना हा सन्मान मिळालेला आहे. लतादीदींनाही तो प्राप्त झाला. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीतील एक ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक म्हणून भीमसेनना हा पुरस्कार मिळणे हे खरेच आजपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीचा अनुपम गौरव म्हणावा लागेल. माय म्युझिक-द सारेगामा इयर्स या मालिकेतील पाचवा, सहावा आणि सातवा संच बाजारात आला असून
पं. भीमसेन जोशी ही काय चीज आहे हे पुन्हा त्यातून प्रतीत होतेच. सहाव्या व सातव्या संग्रहात त्यांनी मराठीत व कन्नड भाषेत गायलेली भजने आहेत तसेच शेवटच्या अल्बममध्ये चार पारंपरिक ख्याल गाऊन आपले गुरु पं. सवाई गंधर्व यांना व गुरुचे गुरू आणि किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान यांनाही त्यांनी मानवंदना दिली आहे. राग जोगियामधील ‘पिया मिलन की आस’ आणि भैरवीमधील ‘जमुना के तीर’ ही ठुमरी गाऊन ते अब्दुल करीम खान यांनाही तितक्याच उत्कटपणे आदरांजली वाहतात. या दोन्ही चीजा एकेकाळी खास अब्दुल करीम खान यांच्या गायकीच्या म्हणून ओळखल्या जायच्या.. त्यामुळे त्या ऐकताना खूपच मजा येते. पं. सवाई गंधर्व यांना मानवंदना देताना त्यांनी राग मिया मल्हारमधील पारंपरिक ‘मोहम्मद शहा रंगीले’ आणि बहार रागातील ‘कलिया संग्’ा या दोन चीजा गायिल्या आहेत. त्यापैकी ‘मोहम्मद शहा रंगीले’ या ख्यालामुळे त्या काळात पं. सवाई गंधर्व यांचा मोठा मानसन्मान झाला होता. ते उत्तरेत अगर दक्षिणेत कोठेही गात असताना या ‘मोहम्मद शहा रंगीले’ची शिफारस आवर्जून व्हायची. पं. भीमसेन जोशी यांनी संगीताच्या अभ्यासासाठी सारा भारत पायी तुडवला होता. प्रत्येक घराण्याचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. पण शेवटी कुंदगोळमधील सवाई गंधर्व यांच्या घरी राहून हे सर्व राग ते शिकले आणि नंतर प्रत्येक मैफल कशी जिंकायची याचे ज्ञानही अर्चित केले.
पाचव्या संग्रहातील पहिल्या सीडीत त्यांनी १९९१ मध्ये नेहरू सेंटर येथे गायिलेल्या एका मैफलीचे ध्वनिमुद्रण आहे. त्यामध्ये राग जौनपुरी, पटदीप आणि जोगिया हे तीन राग साकारले आहेत. पैकी राग जौनपुरी हा सकाळी गायिला जाणारा राग असून त्यामध्ये मध्यलयीत पायल के झनकार ही चीज त्यांनी आळवली आहे. पटदीप या दुपारच्या वेळेत गायल्या जाणाऱ्या रागात त्यांनी ‘धन धन भाग’ आणि ‘पियाँ नही आये’ हे दोन ख्याल गायले आहेत. राग जोगियामध्ये त्यांनी ‘हरी के भेद ना पाया’ ही चीज आळवली असून ती किराणा घराण्याची पारंपरिक खास रचना समजली जाते. राग भैरवीप्रमाणेच जोगियाचे सूरही अत्यंत आर्त असून श्रोत्यांला श्रवणानंद देतानाच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे ही पहिली सीडी ऐकताना बहार येते. दुसऱ्या सीडीमध्ये राग यमन कल्याण, शंकरा आणि शेवट अर्थातच भैरवीचा समावेश आहे. अर्थात हे तीनही राग त्यांनी एचएमव्हीसाठी १९९४ मध्ये गायलेले आहेत. यमन कल्याण या सायंकाळी गायल्या जाणाऱ्या रागात ‘दायी पियाँ बिन कैसे तरोग’े हा ख्याल ते आळवतात. भगवान शंकराशी संबंधित शंकरामध्ये कल ना परे ही तशी लोकप्रिय असलेली रचना ते गाऊन जातात. ‘बोली ना बोल हमसे पिया’ ही शेवटची भैरवीही तितकीच बहारदार आहे. सहाव्या संग्रहात भीमसेन यांची हिंदी, मराठी व कन्नड भाषेतील भजने आहेत. पैकी कन्नड भजनांना दासवाणी तर मराठी भजनांना संतवाणी असे नाव देण्यात आले आहे. राम श्याम गुणगान हा एचएमव्हीचा हिंदीमधील संग्रह एकेकाळी खूप गाजला होता. हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांच्या काव्यांना श्रीनिवास खळे यांनी चाली रचल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा अभंगवाणी तुकयाची हा लतादीदींबरोबर केलेला संग्रहही मराठीत नाव कमावून होता. याच प्रभू रामचंद्रांच्या भजनाबरोबर या संग्रहात कृष्णभक्तीपर चार भजनेही आहेत. दोन्हींमध्ये लतादीदींचा खास आवाज ऐकायला मिळेल. दासवाणीमध्ये संत पुरंदरदास यांचे ‘भाग्यदा लक्ष्मी भारम्मा’ हे अत्यंत गाजलेले भजन ऐकायला मिळते. संत पुरंदरदास यांची ही रचना कर्नाटकात एवढी प्रसिद्ध आहे की कन्नड भूमीतील पहाट या भजनानेच चालू होते असे म्हणतात.
या भजनाचे एक अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे. खरे तर जी संत मंडळी ईश्वरभक्तीमध्ये रममाण असतात त्यांना कनक कांचनाचा कोणताही मोह नसतो. पैसा हातात घ्यायलाही ते तयार नसतात. पण संत पुरंदरदास यांचे विशेष म्हणजे त्यांनी लक्ष्मी सारख्या देवतेला आमंत्रित करून जीवन सुखी करण्याचे आवाहन केले आहे. ‘भाग्यदा लक्ष्मी भारम्मा’ या भजनाचे हेच अलौकिकत्व मानावे लागेल. खरे तर नंतर हे भजन पुढे येशुदास यांनीही गायले. त्यांच्या आवाजातही ते लोकप्रिय झाले. पण ५० च्या दशकात भीमसेननी साकारलेले हे खास भजन आज कर्नाटक मातीच्या मर्मबंधातील ठेव म्हणून ओळखले जाते. त्यानंतर त्यांची एकूण पाच लोकप्रिय कन्नड भजने कानी पडतात. मराठीत संतवाणीमध्ये नामाचा गजर, गर्जे भीमतीर, विठ्ठल गीती गावा, माझे माहेर पंढरी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा ही सारी भजने आहेत. पैकी विठ्ठल गीती गावा हे भजन सोडल्यास बाकी सर्व भक्तीगीते संगीतकार राम फाटक यांची आहेत. नागपूरमध्ये देहावसान झालेले राम फाटक हे खरे तर मोठे संगीतकार..पण म्हणावे तेवढे चीज त्यांचे या मराठी भूमीत झाले नाही. कारण जेव्हा भीमसेन मराठीतील ही भक्तीगीते गातात तेव्हा रसिकांना ती त्यांनी रचलेली अशी वाटतात. पण यातील बहुतांश सर्व रचना राम फाटक यांच्या होत्या..भीमसेननी रचलेल्या दोन रचनांचा आढावा शेवटच्या संग्रहात आहे, आणि ती दोन नाटय़पदे रामदास कामत यांनी गायलेली आहेत.
सातव्या आणि या मालिकेतील शेवटच्या संग्रहात भीमसेन हे हिंदी चित्रसृष्टीत गायक म्हणून कसे वावरले याचा आढावा घेण्यात आला आहे. संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीचा बसंतबहार हा एक बहारदार चित्रपट..त्यात मन्ना डे यांच्यासह भीमसेन यांनी केतकी गुलाब जुही ही जुगलबंदी साकारली होती. ती प्रथमच कानी पडते. बिरबल माय ब्रदर या इंग्रजी चित्रपटात त्यांनी पं. जसराज यांच्या जोडीने गायिलेली रंग रलिया करात या जुगलबंदीचाही या संग्रहात समावेश आहे. धन्य ते गायनी कळा या नाटकातील पदे कसुमाग्रज यांची होती व त्यांना भीमसेन यांनी चाली लावलेल्या होत्या दान करी रे गुरुधन अति पावन आणि हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे या दोन रचना रामदास कामत यांच्या पहाडी ढंगात ऐकायला मिळतात. कन्नड संगीत रंगभूमीवर त्यांनी गायलेल्या पाच पदांचा आढावाही घेण्यात आला आहे. शेवटी सवाई गंधर्व आणि अब्दुल करीम खान यांना श्रध्दांजली आहे. रसिकांनी हे तीनही शेवटचे संग्रह अभ्यासण्याजोगे झाले आहेत.

रम्य ही स्वर्गाहूनी लंका
मराठी चित्रपटांमध्ये भीमसेन जोशी यांनी जी गाणी गायली त्याचा परामर्श सदर संग्रहात घेण्यात आला आहे. स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांत संगीतकार वसंत देसाई यांच्या गाजलेल्या रम्य ही स्वर्गाहूनी लंका या गाण्याने संग्रहाची सुरुवात होते. गुळाचा गणपतीमधील पु. ल. देशपांडे यांचे इंद्रायणी काठी देहाची आळंदी या संग्रहाची मजा वाढवते. पतिव्रता या चित्रपटात शास्त्रीय गायिका लक्ष्मी शंकर यांच्यासमवेत गायलेली ऐरी माई आज शुभ मंगल गाओ आणि पिया बिन नही आवत चैन या ठुमऱ्या दिसतात आणि आशा भोसलेबरोबर रसिका गाऊ कोणते गीत हे गाणेही ऐकायला मिळते. ही सर्व गाणी त्यांनी संगीतकार राम कदम यांच्यासाठी गायली होती. राम कदम यांच्याबरोबर त्यांनी केलेला असाच आणखी एक मराठी चित्रपट म्हणजे भोळीभाबडी..टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग हे त्यातील एक बहारदार भजन..ते त्यांनी वसंतराव देशपांडे यांच्या साथीने गायले आहे. याच चित्रपटात हिरो असलेल्या अरुण सरनाईक याची अ‍ॅन्टी हिरोची व्यक्तिरेखा होती व अभिनेत्री भावनाही आपल्या भूमिकेत भाव खाऊन गेली होती. कारण सुरुवातीला हे भजन झाल्यानंतर भोळीभाबडी या चित्रपटाची कथा वेगळ्याच वळणावर येते. ही सीडीही रसिकांनी जरूर ऐकण्याजोगी.
satpat2007@rediffmail.com