Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

भाग्यदा लक्ष्मी भारम्मा..
भारतरत्न भीमसेन जोशी यांना २००८ मध्ये सदर सर्वोच्च बहुमान मिळाल्यानंतर त्यांचे आजपर्यंतचे एचएमव्ही-सारेगामा या कंपनीकडे जे ध्वनिमुद्रण होते त्यावर २००९ च्या सुरुवातीला प्रत्येकी दोन सीडींचा चार संचांचा संग्रह माय म्युझिक- द सारेगामा इयर्स या नावाने बाजारात आला आहे. आता याच मालिकेतील पुढचे तीन संग्रह एचएमव्हीकडून सादर झाले असून पंडितजींना ही पुन्हा फार मोठा मानवंदना आहे. भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान ज्यांच्या वाटय़ाला आला ती सर्व मंडळी थोर आहेतच, पण शास्त्रीय संगीतासाठी जीवन वाहिलेल्या या ऋषीला हा सन्मान मिळणे हे खरेच मोठय़ा भाग्याचे होते.

‘कलर्स’ची घोडदौड
कलर्स वाहिनीचा पदार्पणातच ‘बिग बॉस २’ मुळे बोलबाला निर्माण झाला होता. त्यानंतरही ‘बालिकावधू’ सारख्या कार्यक्रमांमुळेही कलर्सचा टीआरपी वाढला. आता आणखी नवीन कार्यक्रम कलर्स वाहिनीवरून दाखविण्यात येणार आहेत. ‘इंडिया हॅज गॉट टॅलेण्ट’, ‘छोटे मियाँ’ पर्व दुसरे आणि ‘महावीर हनुमान’ असे हे तीन कार्यक्रम जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापासून सुरू होत आहेत. वीकेण्डच्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये हे कार्यक्रम दाखविण्यात येतील. लहान मुलांनी सादर केलेले विनोद आणि त्यांचा अभिनय पाहणे प्रेक्षकांना खूपच आवडते हे लक्षात घेऊनच ‘छोटे मियाँ’ चे दुसरे पर्व आणि पौराणिक कथानक म्हणजे प्रेक्षकसंख्या मोठी हे लक्षात घेऊन ‘महावीर हनुमान’ ही मालिका दर रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत दाखविण्यात येणार आहे. एकंदरीत विविध टीव्ही वाहिन्यांशी तीव्र स्पर्धा असूनही कलर्सची घोडदौड वेगाने सुरू आहे.

छोटय़ा पडद्यावर सोहा
‘रंग दे बसंती’मधील सोनियाच्या व्यक्तिरेखेमुळे गाजलेली सोहा अली खान ही शर्मिला टागोरची मुलगी आता १२-१३ चित्रपट केल्यानंतर लगेचच छोटय़ा पडद्यावर अवतरणार आहे. हो, पण मालिकेतील ‘लीड रोल’मध्ये ती दिसणार नाही तर चक्क एका रिअ‍ॅलिटी शोची सूत्रसंचालक म्हणून काम करतेय सोमवारपासूनच स्टार प्लसवर सुरू झालेल्या ‘गोदरेज खेलो जितो जीयो’ या गेम शोचे ती सूत्रसंचालन करणार आहे. मॉल संस्कृती आता मुंबईकरांमध्ये चांगलीच रूजली आहे. ब्रॅण्डेड वस्तु, कपडे वापरण्याकडे लोकांचा अधिक कल आहे हे लक्षात घेऊन गोदरेजने स्टार प्लसवर हा पहिलाच लाईफस्टाईल गेम शो आणला आहे. विशेष म्हणजे सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस स्टार प्लसवर संध्याकाळी ७ वाजता तर स्टार वन वाहिनीवर संध्याकाळी ८ ते ८.३० आणि त्याशिवाय स्टार उत्सव चॅनलवरूनही रात्री १० वाजता दाखविण्यात येत आहे. गोदरेजची उत्पादने खरेदी करूनही ग्राहकांना स्पर्धक म्हणून या गेम शोमध्ये सहभागी होता येईल. वैशिष्टय़ म्हणजे यात जिंकणाऱ्या स्पर्धकाला गोदरेज प्रॉपटीज या कंपनीकडून बक्षीस म्हणून घर देण्यात येणार आहे. अर्थातच हे ग्रॅण्ड पारितोषिक आहे.

पं. हरिप्रसाद चौरसिया
हळूहळू अंतिम भागाकडे सरकणारा आणि उत्तरोत्तर अधिकच रंगणाऱ्या झी मराठीवरच्या सा रे ग म प कार्यक्रमाच्या आज, मंगळवारी रात्री दाखविण्यात येणाऱ्या भागात सुप्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे ‘आजचे आवाज’ ऐकून स्पर्धकांना संगीतातील महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याबरोबरच त्यांचे बासरीवादनही रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

एनडीटीव्ही इमॅजिनवर ‘मीरा’
पौराणिक कथांवर मालिका करण्यात सागर पिक्चर्सचा हात कुणी धरू शकत नाही. एनडीटीव्ही इमॅजिनवर लवकरच कृष्णभक्त मीराबाईवर नवीन मालिका सागर पिक्चर्स आणणार आहे. आशिका भाटिया मीरा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. मीराची कथा माहीत असली तरी एक प्रकारचे वलय तिच्याभोवती आहे, तिच्याविषयी लोकांमध्ये कुतूहल आहे.

मुंबई मेगा फ्लड
२६ जुलै २००५ ही तारीख आणि त्या दिवशीच्या अंगवार शहारे आणणाऱ्या घटना मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. त्या दिवशी झालेल्या पावसाचे रौद्ररूप पाहिल्यापासून मुंबईकरांना पावसाची धास्तीच वाटू लागली आहे. अतिपावसामुळे वीज गायब झाली, मोबाइल संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आणि परिणामी घरी वाट पाहणाऱ्या सुहृदांची घालमेल वाढली. कोण कुठे अडकले तर कोण कुठे, शहरातल्या मुख्य रस्त्यांवरही आठ-आठ फूट पाणी पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. कुणी अंधेरीहून ठाण्याला पायी गेले तर अनेकजण मोटारींमध्ये, बसमध्ये, लोकलमध्ये दोन दिवस अडकून पडले. या आठवणी पुन्हा जागृत होण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबईची जी दैना २६ जुलैला झाली त्याचा वेध घेणारा माहितीपट ‘मुंबई मेगा फ्लड’ आज, मंगळवारी नॅशनल जिऑग्राफिक चॅनलवर रात्री ९ वाजता दाखविण्यात येणार आहे.