Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९


सांगली महापौरपदासाठी महाआघाडीत उभा संघर्ष
सांगली, २९ जून / गणेश जोशी

सांगली महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विकास महाआघाडीची भाकरी भाजणार की करपणार? हे महापौर बदलाच्या प्रक्रियेत लवकरच कळून येणार आहे. त्यावेळीच या विकास महाआघाडीत सहभागी असणाऱ्या सर्व घटक पक्षांचा अजेंडा कळणार असून विकास महाआघाडीचे अस्तित्व जसे स्पष्ट होणार आहे!

फुटीर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर
इचलकरंजी, २९ जून / वार्ताहर
सात फुटीर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय आणखी ३ आठवडे पुढे गेला आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा असा निर्णय सोमवारी उच्च न्यायालयाचे न्या. दिलाल नाजके व न्या. साहिल रामाणी यांनी दिला. या निर्णयामुळे सत्तारूढ काँग्रेस पक्षाला दिलासा मिळाला. तर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास असल्याने ते बदलले गेल्याने विरोधकांतून समाधान व्यक्त केले. उच्च न्यायालयाचा निर्णय व पुढील प्रक्रियेमुळे नगराध्यक्ष निवड महिनाभर पुढे गेली आहे.

पित्ताशयातील खडे काढण्याची सोपी शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर, २९ जून / विशेष प्रतिनिधी

पोटावरच्या भागावर चार किंवा पाच छिद्रे पाडून शस्त्रक्रिया करण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी केवळ बेंबीखाली एक छिद्र पाडून पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉ. एल. के. कुकरेजा यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. मुंबईनंतर पश्चिम महाराष्ट्रात अशा पद्धतीने करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला.

कोंडी फोडण्यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांचा संप- अजय सरपोतदार
८ व ९ ऑगस्टला चित्रपट महामंडळाची सर्वसाधारण सभा व चित्रपट व्यावसायिकांचे संमेलन
सातारा, २९ जून/प्रतिनिधी
गेल्या तीनचार वर्षात मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. त्याचबरोबर निर्मात्यांची अडवणूक व गळचेपी सुरू झाल्याने होत असलेली कोंडी फोडण्यासाठी व निर्मात्यांना सशक्त करण्यासाठी चौदा ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमचा लढा कोणत्याही राजकीय पक्षाला हायजॅक करू दिला जाणार नाही, असा इशारा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी दिला.

निवडणुकीसाठी २४ अर्ज; चार राखीव जागा बिनविरोध
विद्युत नागरी पतसंस्था
सातारा, २९ जून / प्रतिनिधी
येथील विद्युत नागरी पतसंस्थेच्या २६ जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या तेरा जागेसाठी २४ अर्ज दाखल झाले असून, चार आरक्षित जागी प्रत्येकी एकच अर्ज सत्ताधारी गटाकडून आल्याने ते बिनविरोध झाल्यात जमा आहेत.सन २००९ ते २०१४ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माजी वादग्रस्त सल्लागार अ‍ॅड. सतीश कुलकर्णी व त्यांचे बंधू, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष वीज वितरण कंपनीचे निवृत्त प्रशासन अधिकारी जयंत कुलकर्णी यांच्या पॅनेलने सर्वसाधारण ८ जागांसाठी ८ व महिला राखीव जागेसाठी एक अशा मिळून नऊ जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक दुर्बल, इतर मागास व विमुक्त भटक्या जाती राखीव जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने कॉम्रेड दत्ताजी देशमुख पॅनेल फेडरेशनचे पदाधिकारी धनाजीराव फडतरे यांच्या नेतृत्वाखाली उभे करण्यात आले आहे. मंगळवारी ३० जूनला दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी १४ व १५ जुलैची मुदत आहे. मतदान व मतमोजणी २६ जुलै रोजी होणार आहे. कैलास जेबले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी आवाज उठवून आंदोलन छेडल्याने ही पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली असल्याने या निवडणुकीत काय होतेय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

महाबळेश्वर नगराध्यक्षपदी किसनशेठ शिंदे निश्चित
महाबळेश्वर, २९ जून/वार्ताहर

महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदी किसनशेठ शिंदे यांची निवड निश्चित उद्या (मंगळवारी) केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. महाबळेश्वर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीची सध्या प्रक्रिया सुरू असून, अध्यक्षांच्या पदासाठी नगरसेवक किसनशेठ शिंदे, जयवंती जाधव, लक्ष्मण कोंढाळकर व सज्जादभाई वारुणकर या चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज सोमवार दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, तर मंगळवार दि. ३० जून रोजी यासाठीची अधिकृत निवडणूक व घोषणा असा कार्यक्रम जाहीर झाला होता.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत वरील चौघांपैकी सौ. जयवंती जाधव, लक्ष्मण कोंढाळकर व सज्जादभाई वारुणकर या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी केवळ किसनशेठ शिंदे यांचा एकटय़ाचाच अर्ज शिल्लक राहिल्याने त्याची उद्या बिनविरोध निवड होणार हे आज स्पष्ट झाले. दरम्यान उद्या यावर वाईचे प्रश्नंताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी कुमार खैरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे.

दत्त पतसंस्था ठेवीदारांचा हातकणंगलेत ठिय्या
इचलकरंजी, २९ जून / वार्ताहर
शिरोली येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी आज हातकणंगले येथील उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान उपनिबंधक नीलिमा गायकवाड यांनी ठेवीदारांच्या ठेवी तत्काळ परत करण्याच्या दृष्टीने ठोस कृती करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.पुलाची शिरोली येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्था गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. या पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूकही झाली होती. पण त्यांना संचालक मंडळाने स्थगिती आणली आहे.पतसंस्थेकडे असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदार कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने आज हातकणंगले येथील उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. उपनिबंधक नीलिमा गायकवाड यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्विकारले.त्यांनी दत्त पतसंस्थेवर पालक अधिकारी म्हणून ए. पी.खामकर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. खामकर हे पतसंस्थेची वसुली करून ठेवीदारांच्या ठेवी वाटप करतील, असेही उपनिबंधक नीलिमा गायकवाड यांनी या वेळी आंदोलकांसमोर स्पष्ट केले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राजकमल सर्कस सोलापुरात
सोलापूर, २९ जून/प्रतिनिधी

आधुनिक काळात मनोरंजनाची साधने बदलत असली तरी आपल्या जुन्या पारंपरिक मनोरंजनाचा खजिना रिता करण्यासाठी सोलापुरात ‘राजकमल सर्कस’ सुरु झाली आहे. या सर्कशीत शंभरपेक्षा जास्त कलावंत अद्भुत शारीरिक कसरतींसह चित्तथरारक कलेचे अनोखे दर्शन घडवित आहेत.सोलापूरच्या होम मैदानावर दररोज दुपारी १, ४ व सायंकाळी ७ वाजता सुरु असलेल्या राजकमल सर्कशीची स्थापना १९७४ साली झाली. या सर्कशीत रशियात खास प्रशिक्षण घेतलेले शंभर कलावंत आहेत. या कलावंतांच्या सोबत खास प्रशिक्षित जनावरांची कला पाहावयास मिळणार आहे. याबाबतची माहिती सर्कशीचे व्यवस्थापक वल्सराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. स्व. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, एम. जी. रामचंद्रन, अटलबिहारी वाजपेयी आदींनी मुक्तकंठाने गौरविलेली राजकमल सर्कशीचे प्रयोग भारताच्या अनेक भागांसह आखाती देशांत मस्कत, दुबई, आबुधाबी, शारजाह, कतार इत्यादी देशांमध्ये दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय क्रीडा, समाजकल्याण व संस्कृती संवर्धन मंत्रालयाने या राजकमल सर्कशीला गौरविले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘हिलींग हंट’चे उद्या कोल्हापुरात प्रकाशन
कोल्हापूर, २९ जून/विशेष प्रतिनिधी

धकाधकीच्या जीवनामध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठय़ा धक्क्याला सामोरे जात असताना उपचारांची नेमकी माहिती हाती यावी याकरिता कोल्हापुरात रूहानी प्रकाशनाच्या वतीने ‘हिलींग हंट’ या नावाने एक छोटी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन १ जुलै रोजी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती पुस्तिकेचे संपादक आशुतोष बेडेकर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. ताराबाई पार्क येथील चंदवाणी सभागृहात सायंकाळी हा समारंभ होत आहे. युवानेते धनंजय महाडिक यांच्या हस्ते ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. डॉ.सचिन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान प्रश्नयव्हेट हॉस्पिटल आणि नर्सिग होम असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र अभ्यंकर हे भूषविणार आहेत. या पुस्तिकेत आजारांचे वर्गीकरण करून त्यावर उपचार करणारे डॉक्टर, शहराच्या विविध विभागांमध्ये उपलब्ध असणारी उपचारपद्धती, आपत्कालीन स्थितीत पुरवठा करणारे औषध दुकान, रुग्णवाहिका इथंपासून सेवेसाठी सज्ज असणाऱ्या रिक्षाचालकांची विभागवार नावे, त्यांचे दूरध्वनी क्रमांक यांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

‘एचआयव्हीबाधितांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ हवे’
सोलापूर, २९ जून/प्रतिनिधी
एचआयव्हीबाधित व्यक्ती व कुटुंबीयांचे प्रश्न सोडवून त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, एस.टी. बस प्रवास भाडय़ात ७५ टक्के सवलत द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन कर्मयोगी विद्याविकास व सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.एचआयव्हीबाधितांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी शक्य नसेल तर प्रत्येक आर्थिक विकास महामंडळातील ३० टक्के निधी राखून ठेवावा, त्यांना ४ टक्के दराने कर्जपुरवठा करावा, एस. टी. बस प्रवास भाडय़ात ७५ टक्के सवलत मिळावी, सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात एआरटी सेंटरची व्यवस्था स्वतंत्रपणे करावी, अशा मागण्याही संस्थेने केल्या आहेत. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना सादर करताना जगदीश पाटील, रेड रीबन क्लबच्या अध्यक्षा रोहिणी जडे, अॅड. शकील नदाफ, प्रसाद गायकवाड, विजय बोळकोटे आदी उपस्थित होते.

पाटील एम.एड. महाविद्यालयास मान्यता
सांगली, २९ जून/प्रतिनिधी

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील एम.एड. महाविद्यालयास मान्यता मिळाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. भोपाळ येथील एनसीटीई व महाराष्ट्र शासनाने एम.एड. महाविद्यालय सुरू करण्यास गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टला मान्यता दिल्याचे सांगून पृथ्वीराज पाटील म्हणाले की, या महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाने संलग्नता दिली आहे. या शैक्षणिक वर्षाच्या एम.एड. प्रवेशासाठी महाराष्ट्र विनाअनुदान अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोसिएशन पुणे यांच्या वतीने सीईटी परीक्षा घेऊन प्रवेश देण्यात येणार आहेत.

मुलीसह विवाहितेची आत्महत्या; मुलगा बचावला
फलटण, २९ जून / वार्ताहर

झिरपवाडी (ता. फलटण) येथील ३५ वर्षाच्या विवाहितेने आपल्या दोन मुलांसमवेत दि. २८ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत मायलेकीचा अंत झाला तर मुलगा पोहता येत असल्याने वाचला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. झिरपवाडी (ता. फलटण) येथील सौ. माया अनिल कदम यांनी मुलगी कु. मयूरी, मुलगा हर्षद यांच्यासमवेत दि. २९ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास याच गावातील सोमनाथ चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी मारली. या घटनेत मायलेकीचा पोहता येत नसल्याने अंत झाला तर मुलगा हर्षद यास पोहता येत असल्याने तो सुखरूप वाचला व बाहेर आला.
उडी टाकल्यानंतर रात्रभर विहिरीत माय-लेकींचा शोध घेण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. मात्र सकाळी ६ च्या सुमारास विहिरीवरील पाण्यावर मायलेकीचे मृतदेह तरंगताना आढळून आला. नंतर विहिरीतून त्यांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले. या घटनेची खबर हणमंत कदम यांनी फलटण पोलिसात दिली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नसले, तरी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

परिचरांच्या ५० जागांसाठी सांगलीत नऊ हजार अर्ज
सांगली, २९ जून / प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषदेच्या परिचर भरती अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी ५० जागांसाठी सुमारे नऊ हजार अर्ज आले. जिल्हा परिषदमध्ये इच्छुकांच्या प्रचंड गर्दीत अनेकांनी बाकडय़ांची आपटाआपटी करून गोंधळ माजविला. गर्दी आवरणे प्रशासनाला शक्य न झाल्याने पोलीस फौजफाटा मागविण्यात आला. जिल्हा परिषदेकडे ५० परिचर (शिपाई) भरती करावयाची आहे. या ५० जागांसाठी कालपर्यंत चार हजार ३०० अर्ज आले होते, तर आज शेवटच्या दिवशी सुमारे पाच हजार अर्ज भरले गेले. केवळ ५० जागांसाठी इतक्या प्रचंड संख्येने अर्ज आल्याने जिल्हा परिषद प्रशासनास गर्दी आवरणे मुश्किल होऊन बसले होते. सामान्य प्रशासन विभागात अर्ज स्वीकारणे सुरू होते. दरम्यान, गर्दी आवरेनाशी झाल्यावर जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात अर्ज स्वीकारणे सुरू केले. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा संख्येने आलेल्या लोकांनी जिल्हा परिषद परिसर खचाखच भरून गेला होता. ज्यांचे अर्ज भरायला विलंब होत होता. त्यांनी अर्ज लवकर घ्या, अशी मागणी करीत गोंधळ करायला सुरुवात केली. हा गोंधळ इतका वाढला की त्यातील काहींनी बसायच्या बाकडय़ांची आपटाआपट केली. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. जिल्हा परिषदेत झालेल्या गोंधळाची चर्चा रात्री उशिरापर्यंत चालू होती.

दहावी व बारावीनंतर शिक्षणाच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन
सोलापूर, २९ जून/प्रतिनिधी

दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात आणि त्यासाठी अभ्यासक्रमाचे पैलू समजावेत यासाठी सोलापुरात ‘जाई-जुई विचार मंचा’च्या वतीने पार्क स्टेडिअममधील मुळे पॅव्हेलियननध्ये रविवारी मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले होते. या उपक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे उद््घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाई-जुई विचार मंचच्या संस्थापिका-अध्यक्षा कु. प्रणिती शिंदे यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. उच्च शिक्षणाबाबत विद्यार्थी व पालकांना माहिती अपुरी असते. त्यांना अनेक उपयुक्त अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळत नाही म्हणूनच आपण हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ११ व १२ जुलै रोजी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर ‘जॉब मेला’चे आयोजन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘ग्रामीण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी’
सांगली, २९ जून/प्रतिनिधी

तालुका, तसेच जिल्हा समित्यांवर काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना यापुढील काळात मोठय़ा संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी दिले. ते तासगाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तासगाव येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस सोमेश्वर बाळगडे, राहुल खंजिरे, कमलाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष नंदकुमार शेळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, विश्वजित कदम, राष्ट्रीय सरचिटणीस किरण रेड्डी, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील, विजय पाटील, शिवाजी मोहिते, बाळासाहेब पवार, दिलीप पाटील-सावर्डेकर, स्वप्नील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राशिवडेमध्ये उभारणार दीड कोटींचे वीज उपकेंद्र
राधानगरी, २९ जून / वार्ताहर

राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रूक येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे व दीड कोटी रुपये खर्चाचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. या केंद्राची पायाखुदाई महावितरणचे अधीक्षक अभियंता के.बी.झंजे यांच्या हस्ते झाले. राशिवडे हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी वीज उपकेंद्र उभारावे ही मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित होती. या परिसरातील बहुतेक गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरीवर्ग अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. सातत्याने केल्या जाणाऱ्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आता याठिकाणी ३३/११ केव्ही क्षमतेचे व दीड कोटी रुपये खर्चाचे केंद्र मंजूर झाले आहे. या उपकेंद्राचा पायाखुदाई समारंभ झंजे यांच्या व सरपंच बी.एन.गोंगाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झंजे यांनी या उपकेंद्रामुळे शेतीला चोवीस तास वीज पुरवठा होणार असून योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. तसेच हे केंद्र जलदगतीने उभारून कार्यान्वित केले जाईल असे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य गजानन बिल्ले, उपसरपंच डॉ.जयसिंग पाटील, ग्रामपंचायतीसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.