Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

९०:१० वरील निकाल लांबण्याची चिन्हे सरकारच्या खुलाशाने सुनावणीस कलाटणी
सरकारच्या खुलाशाने सुनावणीस कलाटणी
मुंबई, २९ जून/प्रतिनिधी
इयत्ता ११ वीच्या प्रवेशांमध्ये ‘एसएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के जागा राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेऊन आजच्या दिवसाच्या अखेरीस निकाल देण्याचा शब्द मुंबई उच्च न्यायालयाने पाळला नाही. मात्र अगदी शेवटच्या १५ मिनिटांत न्यायमूर्तीनी विचारलेल्या एका प्रश्नावर राज्य सरकारने केलेल्या खुलाशाने दिवसभर झालेल्या सुनावणीस वेगळीच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत.

६९ तालुक्यांत पावसाची पाठ
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी

विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागाला पावसाने थोडासा दिलासा दिला असला तरी पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि औरंगाबादकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. पुणे, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील तब्बल ६९ तालुक्यांत पावसाचा एक थेंबही अद्याप पडलेला नाही, तर ८१ तालुक्यांत एक ते पंधरा मिलिमीटर पाऊस झाल्याने ते कोरडेच राहिले आहेत. धरणांच्या जलसाठय़ाची स्थितीही केवळ दहा टक्के पाणीसाठा राहिल्याने बिकट झाली आहे.

आयुक्त फाटक यांच्या मनमानीने महापौरांचाही अपमान !
मुंबई, २९ जून/ खास प्रतिनिधी

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी किती प्रश्न विचारावेत, येथपासून कोणत्या प्रकारचे प्रश्न असावेत याबाबत ‘आचारसंहिता’ लागू करणाऱ्या आणि ही आचारसंहिता ज्यांना मान्य असेल त्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असा हुकूमनामा जारी करणाऱ्या महापालिका आयुक्त जयराज फाटक यांचा महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्यासह पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र निषेध केला आहे. महापौरांनी हा आदेश रद्द करण्याबाबत केलेली विनंती फेटाळून आयुक्तांनी महापौरांचा अपमान केल्याची भावना सेना-भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केली.

‘जीवनगौरव’ लाभला तरी..
नाही रिटायर होणार नाथा!
मुंबई, २९ जून/प्रतिनिधी
काळ्याकुळकुळीत केसांच्या, हिरव्यागार, सदाबहार मनाच्या विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्रातील नेत्यांना आज चक्क ‘जीवनगौरव’ पुरस्काराने आज गौरविण्यात आले. विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर व विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख या ‘यजमानां’नीही वजनदार रूपेरी मानचिन्हे पटकावली. (अग्रलेख :‘आत्मगौरव’ सन्मान)

प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीसाठीचा सहा हजार विद्यार्थ्यांना लाभ
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील सहा हजार ३०४ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांना सुमारे १५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील ‘सेंटर फॉर टॅलेंट सर्च अ‍ॅण्ड एक्सलन्स’ या संस्थेतर्फे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेचे मानद संचालक जी. सी. कुलकर्णी यांनी निकालाचा तपशील जाहीर केला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व गुजरातमधील ८३ हजार ६६१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी एक हजार ४८ विद्यार्थी, जिल्हास्तरीयसाठी एक हजार ३८१, उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी ९७८, तर तालुकास्तरीय पारितोषिकांसाठी दोन हजार ८९७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. www.mtsexam.org या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी आठवीच्या विभागात रायगड जिल्ह्य़ातील न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ प्रशालेचा देवांग दीनानाथ पालव हा २५० पैकी १९८ गुण मिळवून पहिला आला आहे. शहर विभागामध्ये औरंगाबादमधील सेंट लॉरेन्स प्रशालेचा आनंद अनिल पाठक २१७ गुणांनी पहिला आला. नववीच्या ग्रामीण विभागात ठाणे जिल्ह्य़ातील कळव्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचा प्रतीक प्रमोद फेगडे हा २०० पैकी १५१ गुण मिळवून पहिला आला. शहर विभागामध्ये पुण्याच्या सेंट जोसेफची संस्कृती अतुल ढवळे ही १५८ गुण पटकावून पहिली आली.

तलावक्षेत्रात पाऊस नाही!
पाणीकपात सुरूच राहणार
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या फक्त २० दिवस पुरेल एवढाच पाण्याचा साठा शिल्लक आहे आहे. त्यामुळे पाणीकपात सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मान्सूनचे आगमन मुंबईत झाले असले तरी तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावांची पातळी खालावली आहे. मध्यंतरी जलविभागाने पाण्याच्या साठय़ाचा आढावा घेतला होता. त्यानुसार येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी तलावांत असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या दोन तीन दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली असली तरी तलावांच्या पाणलोटक्षेत्रात मात्र पावसाने दडी मारली आहे. येत्या १५ दिवसांत या क्षेत्रात पाऊस न झाल्यास तलावांतील राखीव साठा वापरावा लागेल, असे जल विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबतीत पालिकेचे मुख्य जलअभियंता एस. एस. कोर्लेकर यांनी सांगितले की, सध्या पाणीसाठय़ाची स्थिती चिंताजनक आहे. मात्र पुन्हा या आठवडय़ात आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही कोर्लेकर यांनी केले आहे.

ओव्हरहेड वायर तुटून एक ठार
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

सांताक्रूझ स्थानकाजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर चारजण किरकोळ जखमी झाले. त्यात एका महिलेचा समावेश आहे. वायर तुटून लोकलवर पडत असल्याचे लक्षात येताच टपावर बसलेल्या प्रवाशांनी चालत्या लोकलमधून उडय़ा घेतल्या. दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून या घटनेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र रेल्वे आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते एस. एस. गुप्ता यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. चर्चगेटला येणारी जलदगती लोकल सांताक्रुझ स्थानकानजीक पोहोचली असतानाच अचानक ओव्हरहेड वायर तुटून लोकलवर पडली. या वायरमुळे लोकलमध्ये दरवाज्यामध्ये उभा असलेला असिफ अली आशिक अली (२४) जागीच ठार झाला, तर लोकलच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी भीतीमुळे लोकलवरून उडय़ा घेतल्या.

शायनीची डीएनए चाचणी पॉझिटिव्ह
मुंबई, २९ जून / प्रतिनिधी

मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शायनी आहुजा याच्या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्याविरुद्ध आणखी एक सबळ पुरावा पोलिसांना मिळाला आहे. शायनीची डीएनए चाचणी सकारात्मक आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. यापूर्वीच पीडित मोलकरणीवर बलात्कार झाल्याचे तिच्या वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. याशिवाय घटनेच्यावेळी शायनीने मद्यपान किंवा अमलीपदार्थाचे सेवन केले नसल्याचे तसेच त्याच्या उजव्या हातावर ओरबाडल्याच्या खुणाही आढळून आल्याचे त्याच्या वैद्यकीय चाचणीतून निष्पन्न झाले होते. आता त्याची डीएनए चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रकरणात पोलिसांची बाजू मजबूत झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी