Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

जलस्वराज्य योजनेत सहा कोटींचा घोळ!
हिंगोली जिल्ह्य़ातील ४१ गावांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा

तुकाराम झाडे
हिंगोली, २९ जून
जलस्वराज्य योजनेतील पाणीपुरवठय़ाच्या कामांची कागदोपत्री असलेली नोंद आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये तब्बल ५ कोटी ९३ लाख रुपयांची तफावत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील ४१ गावांमधील या योजनेच्या पाणीपुरवठा सभापतींना प्रशासनाने नोटिसा दिल्याची माहिती आज मिळाली.

पर्जन्यास्त्र
चिंब झाली पावसाने भोवती रानेवने
वर्षती येथे सखीची पावसाळी लोचने
हा जळाचा पाट दावी थाट विजेचा असा
आसवांचा पूर येथे अंतराचा आरसा
ना. घ. देशपांडय़ांची विरहिणी सखी पावसाळी ऋतूतला विरह असह्य़ झाल्यामुळे घरी अश्रुपात करते आहे, तर कालिदासाच्या विरहिणीचं वर्णन असं येतं -

करणचे यश आणि करंटे परभणीकर!
आसाराम लोमटे
परभणी, २९ जून

‘पिकते तिथे विकत नाही’ या नेहमी वापरल्या जाणाऱ्या म्हणीचा प्रत्यय मात्र नुकताच आला. माध्यमिक शालान्त परीक्षेत औरंगाबाद विभागातून सर्वप्रथम आलेल्या करण राजगोपाल कालाणी याने आपल्या निर्विवाद यशाची मोहर उमटविली. तथापि शैक्षणिक वर्तुळात आणि सर्व स्तरात त्याचे जे कौतुक व्हायला हवे होते ते झाले नाही. गुणवंतांचा गौरव करण्यात परभणीकरांनी करंटेपणाच दाखविला!

विजयअण्णा बोराडे यांना देशमुख कृषिरत्न पुरस्कार
आसाराम लोमटे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
औरंगाबाद, २९ जून/खास प्रतिनिधी
कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार व उद्यान पंडित पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार शेतीतज्ज्ञ विजयअण्णा संपतराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ‘लोकसत्ता’चे परभणीचे वार्ताहर आसाराम मारोतराव लोमटे यांना जाहीर झाला. नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात बुधवारी (दि. १ जुलै) या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

जिल्हा बँकेत शेतकऱ्याचा विष घेण्याचा प्रयत्न
पीककर्ज देण्यास टाळाटाळ
औरंगाबाद, २९ जून/प्रतिनिधी
आपल्याला मुद्दाम पीककर्ज देण्यात येत नसल्याची तक्रार करीत सुलतानपूर येथील शेतकरी तेजराव दांडगे यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिकलठाणा येथील शाखेतच आज विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने नातेवाइकांनी त्यांना अडविले. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रवासी जीप उलटून नांदेडजवळ १२ जखमी
नांदेड, २९ जून/वार्ताहर

भरधाव जाणारी काळीपिवळी जीप उलटून झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले. जखमींपैकी आठजणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड-नरसी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी जीप (क्र. एमएच-२६-बी-८५८३) नांदेडहून नरसीकडे जात होती. सुमारे १४ ते १५ प्रवासी घेऊन भरधाव वेगात जाणारी ही जीप कृष्णूरजवळ एक चाक निखळल्याने उलटली. या अपघातात १२ जण जखमी झाले असून त्यातील आठजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदास कांबळे, (रा. खैरगाव), योगेश कांबळे (रा. गोणार), राजू स्वामी (रा. मिनकी), साईनाथ संगनवार (रा. कुंभारगाव), रमेश शिवराम (रा. येसगी), कबीर आखणे (रा. हंगरगा), जीपचालक नामदेव चव्हाण (रा. वसंतनगर), विजयराव चोंडे (रा. कोकलेगाव), दादाराव चिंचोले (रा. दरेगाव), श्रीहरी शिंदे (रा. कहाळा), धनराज हनवते (रा. हंगरगा) आणि गणपत कांबळे (रा. मोकासदरा) अशी जखमींची नावे आहेत.

सोळा लाखांचा अपहार
भोकर, २९ जून/वार्ताहर

तालुक्यातील मातूळ येथे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत चौघांनी किसान पतपत्रांच्या रकमेत १५ लाख ८६ हजार ५१० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. भोकर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. ‘संगणक आयडी’चा गैरवापर करून या रकमा स्वत:च्या खात्यात जमा केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. हा प्रकार १ नोव्हेंबर २००० ते १५ एप्रिल २००९ या कालावधीत झाला. तेव्हाचा शाखाधिकारी विठ्ठल गाडेकर, अरुण सावरीकर, रोखपाल गोल्ला श्रीनिवासलू, शिपाई अशोक नागोबा सोनकांबळे यांनी अपहार केल्याची फिर्याद शाखाधिकारी शिवकुमार श्रीनिवास आयर यांनी दिली.

आरोपींच्या नार्को चाचणीस परवानगी
औरंगाबाद, २९ जून/खास प्रतिनिधी

मानसी देशपांडे हिचा खून केल्याच्या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी जावेदखान हबीबखान ऊर्फ टिंगऱ्या आणि राम बोडखे यांची नार्को चाचणी घेण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. बडे यांनी आज परवानगी दिली.जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव बोरसे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात टिंगऱ्या आणि राम बोडखे यांची नार्को चाचणी घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करणारा अर्ज दिला. या अर्जावर आज श्री. बडे यांच्यासमोर सुनावणी झाली. या आरोपींनी मानसीचा खून का केला, या खुनाचे रहस्य काय, या खुनाचा उद्देश काय याचा उलगडा होत नाही म्हणून आरोपींची नार्को चाचणी आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकील एस. जे. काजी यांनी केला. न्यायालयाने या दोन्ही आरोपींची नार्को चाचणी घेण्यास मंजुरी दिली. या नार्को चाचणीतून जावेदखानने बलात्कार केला होता की नाही हे समोर येणार आहे. मानसी देशपांडेचा १२ जूनला निर्घृण खून करण्यात आला. दहा दिवसांनंतर पोलिसांनी जावेदखान हबीबखान, राम बोडखे, प्रदीप चंडालिया यांना अटक केली.

विशेष पोलीस महानिरीक्षक यादव हिंगोली दौऱ्यावर
हिंगोली, २९ जून/वार्ताहर

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव पाच दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी बाळापूर, कळमनुरी, सेनगाव, औंढा पोलीस ठाण्याची पाहणी केली. बाळापूर पोलिसांच्या परिश्रमातून उभारलेल्या मुलांसाठीच्या आनंदबागचे उद्घाटनही त्यांनी केले. शनिवारी हिंगोलीत पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस परेडची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत भरविण्यात आलेल्या पोलीस दरबारात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी श्री. यादव यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने बदल्यांच्या विषयावर चांगलीच चर्चा झाली. बदली होऊन कार्यमुक्त केले जात नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी बोलावून दाखवताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांस तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. रविवारी श्री. यादव यांनी सेनगाव व औंढा पोलीस ठाण्याला भेट दिली. ३० जूनपर्यंत यादव हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

जालन्यात शिवसेनेचा मेळावा
जालना, २९ जून/वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी येथे जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. शिवसेना सचिव अनिल देसाई या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी खासदार जयसिंग गायकवाड, आमदार सुरेश जेथलिया, खासदार गणेश दुधगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी चोथे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जालना शहरप्रमुख राजेश राऊत, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे, परतूरच्या नगराध्यक्षा करीमाबी सौदागर, नगराध्यक्ष भारती भगत या वेळी उपस्थित होत्या.

लातूर बाजार समिती सभापतीपदी माडे
लातूर, २९ जून/वार्ताहर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वाल्मिक मुदन्ना माडे, तर उपाध्यक्षपदी रावसाहेब हणमंतराव लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची बैठक उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होऊन बाजार समितीच्या सभापतीपदी बामणी येथील वाल्मिक माडे तर उपसभापतीपदी बोरवटी येथील रावसाहेब लकडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे कामकाज उपविभागीय अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, वैजनाथ शिंदे, विक्रमसिंह चौहान आदी उपस्थित होते.

उधारी मागितल्याबद्दल दुकानदारास मारहाण
व्यापाऱ्यांचे आंदोलन
औसा, २९ जून/वार्ताहर

उधारीचे पैसे मागितल्यावरून सायकल दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तालुक्यातील किल्लारी येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळून लातूर-उमरगा राज्य मार्गावर दीड तास ‘रास्ता रोको’ केला.किल्लारी बाजारपेठत तात्याराव मोहिते यांचे सायकलचे दुकान आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मुलगा देविदास मोहिते याने शिवाजी आडे (रा. तळणी तांडा) यांच्याकडे दीड वर्षांपूर्वीचे उधारीचे पैसे मागितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर काही वेळाने आडे आणि त्याचे नातेवाईक आदी २० जणांनी सायकल दुकानात घुसून देविदास व त्यांच्या नातेवाईकांना काठी, पट्टय़ाने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिले. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर व्यापारी संघटनांनी याच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद केली आणि ग्रामस्थांसह लातूर-उमरगा महामार्गावर किल्लारी पाटी येथे दीड तास ‘रास्ता रोको’ केला. यावेळी सरपंच रावसाहेब भोसले, व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर ‘रास्ता रोको’ मागे घेतला.

पुंडलिक राऊत स्मृतिस्तभांचे उद्घाटन
औरंगाबाद, २९ जून /प्रतिनिधी
पुंडलिकनगरचे शिल्पकार, ज्येष्ठ शिवसैनिक स्व. पुंडलिक राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण रविवारी सायंकाळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. महानगरपालिकेच्या वतीने हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. १८ ऑगस्ट १९८० रोजी राऊत यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या वसाहतीला स्व. राऊत यांचे नाव देण्यात आले होते.या वेळी महापौर विजया रहाटकर, श्रीमती वत्सलाबाई राऊत, माजी महापौर डॉ. भागवत कराड, सभागृहनेते गजानन बारवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजपचे शहराध्यक्ष अतुल सावे, माजी सभागृहनेते संतोष खेंडके, आसाराम तळेकर आदी उपस्थित होते.

महिला महाविद्यालयात स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग
औरंगाबाद, २९ जून/प्रतिनिधी

विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच स्वयंरोजगाराची संधी प्राप्त व्हावी या हेतूने इं. भा. पाठक महिला महाविद्यालयात १५ जुलैपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहेत.महाविद्यालयाच्या प्राचार्या राजकुमारी गडकर यांनी पत्र परिषदेत प्रशिक्षण वर्गाविषयी माहिती दिली. ग्रशिक्षणादरम्यान नीतिमूल्याचे मार्गदर्शन करण्यात येईल.चारित्र्यसंवर्धन, कुटुंबातील नातेसंबंध टिकविण्याचे मार्गदर्शन वर्ग, संभाषण कौशल्याचेही अभ्यास घेतले जातील. सध्या महाविद्यालयात अकराशे विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याचे प्राचार्या राजकुमारी गडकर यांनी सांगितले. प्रशिक्षण वर्ग विद्यार्थिनींना भावी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत प्राध्यापिका शाकुंतल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी स्वप्नजा देशपांडे उपस्थित होत्या.

आरोग्य विभागासाठी आता भरती मंडळ
जालना, २९ जून/वार्ताहर
आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य विभाग स्वत:चे कर्मचारी भरती मंडळ स्थापन करणार आहे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. जालना तालुक्यातील विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शिंगणे बोलत होते. आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या वेतनश्रेणीत सुधारणा व्हावी यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जालना जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले की, या आरोग्य केंद्रांची इमारत व अन्य कामांसाठी येत्या तीन-चार महिन्यांत जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करवून देण्यात येईल. आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एन. डोळस, आमदार अरविंद चव्हाण आदींची भाषणे झाली.

धारूर तहसीलदार कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्यांविनाच चालू
तहसीलदार व नायब तहसीलदार रजेवर
धारूर, २९ जून/वार्ताहर

तहसीलदार व एक नायब तहसीलदार आजापणाच्या रजेवर गेले असून अधिकाऱ्यांविनाच कार्यालयाचा कारभार चालू आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत.तहसीलदार अनिता भालेराव १५ दिवसांपूर्वी रजेवर गेल्या. त्यांचा कार्यभार नायब तहसीलदार यू. बी. कांबळे यांच्याकडे देण्यात आला. शैक्षणिक वर्षांची सुरुवात होताच श्री. कांबळेही आजारपणाच्या रजेवर गेले. एक नायब तहसीलदार आहेत. त्यांनाही कार्यालयीन बैठकांना अंबाजोगाई व बीड येथे जावे लागत असल्याने अनेक वेळा अधिकाऱ्यांविनाच तहसील कार्यालय चालू असते.शैक्षणिक कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी केजचे तहसीलदार राहुल जाधव यांच्याकडे तहसीलदारपदाचा कार्यभार देण्याचे आदेश देण्यात आला. त्यांनी अद्यापि कार्यभार स्वीकारलेला नाही. चार कारकुनांपैकी तीनच उपस्थित असतात. तीन पेशकारांची पदे असून नियमित उपस्थिती दोघांचीच असल्याने नागरिकांनाही कार्यालयात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बीड,२९ जून/वार्ताहर
पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत असताना भारतीय शिक्षण हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सावरकर शैक्षणिक संकुलातून केले असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
बीड येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे स्थानिक कार्यवाह गोविंदप्रशाद बार्शीकर, गुलाबचंद लोढा, प्रभूसिंग पवार, प्राचार्य डॉ. अ. द. पत्की, मुख्याध्यापक पांडव आदी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, की समाज, शिक्षक, आई, वडील यांच्याविषयी आदरभाव निर्माण करणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हे ‘भाशिप्र’चे वैशिष्टय़ आहे. सध्या अशा संस्थांची समाजाला गरज आहे. याच कार्यक्रमामध्ये दहावी, बारावी व वरिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘कौस्तुभ’ अंकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अ. द. पत्की यांनी केले.

आषाढी महोत्सवाला नांदेडमध्ये प्रारंभ
नांदेड, २९ जून/वार्ताहर
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित आषाढी महोत्सवाला आज पांडुरंग दिंडीने प्रारंभ झाला.आय. टी. आय. परिसरातील म. फुले पुतळ्यापासून सायंकाळी ६ वाजता पांडुरंग दिंडी निघाली. यात अभिनेते मिलिंद गुणाजी, भावगीत गायक अरुण दाते, शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेररूकर, परभणीचे राजू कापसे, लातूरचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांनी सहभाग नोंदविला. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहापर्यंत निघालेल्या या दिंडीत उंट, घोडे यासह भजनी मंडळ, शाळकरी मुलांचे लेझिम पथक, झांजपथक सहभागी झाले होते. याप्रसंगी शाळकरी मुलांनी विविध वेशभूषा करून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत नागरिकांची मने जिंकली. तरुणांनीही तलवार, लाठी, भाला यांसारख्या शस्त्रांनी चित्तथरारक कवायती केल्या. शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच सर्वसामान्य नागरिक दिंडीत सहभागी झाले होते.

इंदोरीकर यांचे उद्या कीर्तन
गेवराई, २९ जून/वार्ताहर

वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिन या निमित्त बुधवारी (दि. १ जुलै) सायंकाळी ७ वाजता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य गोपीनाथ घुले यांनी दिली.