Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

६९ तालुक्यांत पावसाची पाठ
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी

 

विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागाला पावसाने थोडासा दिलासा दिला असला तरी पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि औरंगाबादकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. पुणे, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील तब्बल ६९ तालुक्यांत पावसाचा एक थेंबही अद्याप पडलेला नाही, तर ८१ तालुक्यांत एक ते पंधरा मिलिमीटर पाऊस झाल्याने ते कोरडेच राहिले आहेत. धरणांच्या जलसाठय़ाची स्थितीही केवळ दहा टक्के पाणीसाठा राहिल्याने बिकट झाली आहे.
पावसाचे आगमन यंदा जून उलटत आला तरी लांबले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडय़ात थोडी हजेरी लावून पाऊस पुन्हा गडप झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, तसेच औरंगाबादमध्ये मात्र पावसाने वक्रदृष्टी दाखविली आहे. औरंगाबाद विभागामधील नऊ तालुक्यांत पावसाचा थेंबही पडला नाही. १३ तालुक्यांत एक ते पंधरा मिमी पाऊस पडला. लातूर विभागातील १६ तालुक्यांत शून्य पाऊस पडला आहे. १२ तालुक्यांत पावसाचा फक्त शिडकावा झाला आहे. नाशिक विभागाची पावसाची स्थितीही विदारक म्हणावी लागेल. या विभागातील सात तालुक्यांत अजिबात पाऊस पडलेला नाही, तर ११ तालुक्यांत हलका पाऊस पडून ते कोरडेच राहिले आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व लातूर विभागातील तब्बल १५० तालुके पावसाअभावी कोरडे आहेत.
दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रांकडेही पावसाने पाठ फिरविली आहे. सूर्या धामणी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, दिना, बेंबळा, काटेपूर्णा, हातनूर, तिसगाव, मांजरा, पेनगंगा, नांद, पुजारीटोला, कालीसरार, धोमबलकवडी, राधानगरी, गुंजवणी, नीरा-देवघर, पिंपळगावजोगे, टेमघर, उजनी, घोड या २१ धरणांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

आणखी चार दिवस पावसाचा जोर वाढणार नाही
कोकणासह राज्याच्या काही भागांत आज पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्याचा जोर पुन्हा कमी झाला असून, येत्या चार दिवसांत तरी त्यात विशेष वाढ होण्याची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आले.