Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

आयुक्त फाटक यांच्या मनमानीने महापौरांचाही अपमान !
मुंबई, २९ जून/ खास प्रतिनिधी

 

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी किती प्रश्न विचारावेत, येथपासून कोणत्या प्रकारचे प्रश्न असावेत याबाबत ‘आचारसंहिता’ लागू करणाऱ्या आणि ही आचारसंहिता ज्यांना मान्य असेल त्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असा हुकूमनामा जारी करणाऱ्या महापालिका आयुक्त जयराज फाटक यांचा महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्यासह पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र निषेध केला आहे. महापौरांनी हा आदेश रद्द करण्याबाबत केलेली विनंती फेटाळून आयुक्तांनी महापौरांचा अपमान केल्याची भावना सेना-भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. तोंडी विनंती फेटाळल्यामुळे लेखी पत्र लिहून अन्याय्य आदेश मागे घेण्याचे निर्देश महापौरांनी आज आयुक्तांना दिले.
महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पत्रकारांच्या आचारसंहितेबाबत आयुक्तांनी काढलेल्या आदेशासंदर्भात आज गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या विषयावर आपण बोलणार नाही तसेच हा विषय गटनेत्यांच्या बैठकीचा होऊ शकत नाही, अशी भूमिका आयुक्त जयराज फाटक यांनी घेतल्यामुळे गटनेत्यांची बैठक रद्द करण्याची वेळ आल्याचे दस्तुरखुद्द महापौरांनीच सांगितले. याबाबत सभागृहनेते सुनील प्रभू तसेच माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा महापौरांचा अपमान असल्याचे सांगितले. धोरणात्मक निर्णय हे महापौरांनी जाहीर करावे, अशी प्रथा असताना आयुक्त फाटक अथवा अतिरिक्त आयुक्त वेळोवेळी परस्पर असे निर्णय जाहीर करून महापौरांचा अपमान करत आले आहेत, असे सांगून सुनील प्रभू म्हणाले की, पत्रकारांचा गळा घोटणारा आदेश आयुक्तांनी तात्काळ रद्द केला पाहिजे. महापौर शुभा राऊळ यांनी आयुक्तांना त्यांचे परिपत्रक मागे घेण्याबाबत पत्र पाठविले आहे. पत्रकारांनी कोणते प्रश्न विचारावे, कशाप्रकारे विचारावे हे आयुक्तांनी शिकविण्यापेक्षा मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा बंदोबस्त करण्याची काळजी घ्यावी असा टोला, भाजप गटनेते आशिष शेलार यांनी लगावला. नगरी प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा गळा घोटण्याचे काम हे आयुक्त करत असून हे जयराज आहेत की ‘भयराज’ आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाल्याचे शेलार म्हणाले.
बेहरामपाडय़ातील आगीसंदर्भात व तेथील अनधिकृत बांधकामाची जबाबदारी कोणाची, किती फुटांच्या अनधिकृत झोपडय़ा तेथे आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावरून आयुक्तांनी पत्रकारांनी कसे वागावे याबाबतचे आदेश जारी केले आहेत. बेहरामपाडय़ातील अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणाची व त्याला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई करणार याचे उत्तर न देता पत्रकारांचा आवाज दाबणारा आदेश काढायचा हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी सांगितले. पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून आयुक्तांचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान पत्रकारांचा अपमान करणारे परिपत्रक मागे घेईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय पालिकेतील सर्व पत्रकारांनी घेतला आहे.