Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘जीवनगौरव’ लाभला तरी..
नाही रिटायर होणार नाथा!
मुंबई, २९ जून/प्रतिनिधी

 

काळ्याकुळकुळीत केसांच्या, हिरव्यागार, सदाबहार मनाच्या विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्रातील नेत्यांना आज चक्क ‘जीवनगौरव’ पुरस्काराने आज गौरविण्यात आले. विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर व विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख या ‘यजमानां’नीही वजनदार रूपेरी मानचिन्हे पटकावली. शरद पवार, मनोहर जोशी या राजकारणातील सर्वार्थाने ‘नॉटआऊट बॅटस्मन’ जीवनगौरवप्राप्तांच्या यादीतील समावेश अपेक्षेप्रमाणेच होता. या यादीतील अपवादात्मक दोघे जण होते ते गणपतराव आणि बी. टी. देशमुख .
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात आयोजित समारंभात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते १४ जणांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या यादीवर नजर टाकली तर हा ‘स्वत स्वतच्या आनंदाकरिता स्वहस्ते घडवून आणलेला पुरस्कार सोहळा’, असेच त्याचे स्वरूप होते.
आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांचेच जीवन गौरवास पात्र ठरणारे असेल तर या यादीतून माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पत्ता कुणी कापला, माजी विधानसभा अध्यक्ष व कार्यक्रमाला उपस्थित मधुकरराव चौधरी यांचा तसेच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा या जीवनगौरवाकरिता पात्र उमेदवारांच्या यादीत समावेश कसा झाला नाही, अशी चर्चाही विधिमंडळ परिसरात सुरू होती. विधिमंडळात मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वरचेवर रणकंदन माजत असताना संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांना ‘उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री’ असा पुरस्कार देण्यात आला तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. इंदापूरहून आलेल्या लेझीम पथकाने शासकीय कार्यक्रमात फडकविलेल्या भगव्या ध्वजावर हर्षवर्धन पाटील यांचे छायाचित्र होते त्याबद्दलही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. केवळ लातूरबद्दल बोलू नका तर महाराष्ट्राबद्दल बोला, ही शरद पवार यांनी एकेकाळी दिलेली टीप किती फायदेशीर ठरली हे विलासराव देशमुख यांनी यावेळी दिलखुलासपणे कबूल केले व विधिमंडळातील कारकीर्दीचा टप्पा ओलांडून संसदीय कामकाजाचा टप्पा गाठल्याबद्दल हा जीवनगौरव असावा, असा अन्वयार्थ देशमुख यांनी काढला. जीवनगौरव दिला तरी आम्ही रिटायर होणार नाही, असे तर सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरच करून टाकले. राजकारणातून संपण्याकरिता नव्हे तर महाराष्ट्राच्या हिताकरिता यापुढेही काम करण्याकरिता पुरस्कार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. नवीन पिढीच्या हाती सूत्रे सोपवून आपली पदे रिक्त करण्याचा संकेत आपण या जीवनगौरव पुरस्कारातून घेतल्याचे शरद पवार यांनी कबूल केले. मात्र या यादीवर नजर टाकली तर काहींवर मी घेतला तसा अर्थ घेतल्याने अन्याय होईल, असे सांगत पवार यांनीही यादीतील नावे जीवनगौरव पुरस्कारयोग्य नसल्याचे मान्य केले. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी याचाच अप्रत्यक्ष उल्लेख करीत पाच टर्म विधानसभेची सदस्य राहून मला जीवनगौरव पुरस्कारापासून का डावलले ते कळत नाही, असा उपहासात्मक प्रश्न केला. अभिनेत्री रेखाने ‘जीवनगौरव’ या शब्दाला वार्धक्य चिकटल्याने एका शासकीय पुरस्काराचे ‘प्रतिभा गौरव’ असे नामकरण करायला लावले असतानाही काळ्याकुळकुळीत केसांच्या आड लपलेल्या डोक्यात अन् हिरव्यागार, सदाबहार मनात प्रकाश कसा पडला नाही, असा सवाल विधिमंडळ वर्तुळात केला जात होता.