Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

विकासकामे वेळेत होणे महत्त्वाचे- राष्ट्रपती
मुंबई, २९ जून/प्रतिनिधी

 

वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगामध्ये लोकांच्या वाढत्या अपेक्षांची योग्यप्रकारे पूर्ती कशी करता येईल, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. लोक प्रगतीसाठी आतूर झालेले आहेत आणि म्हणून विकासकामांची वेळेवर पूर्तता होणे अतिशय महत्वाचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना चार खडे बोल सुनावले.
वांद्रे-वरळी या तब्बल १५ वर्षे रखडलेल्या प्रकल्पाचे उद्या उद्घाटन होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर राज्यातील रखडलेले ऊर्जा, पाटबंधारे प्रकल्प, औद्योगिक प्रगतीचा मंदावलेला वेग या संदर्भात राष्ट्रपतींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्याचे मानले जात आहे.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण तसेच ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज : जीवन आणि कार्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी राज्यपाल एस. सी. जमीर अध्यक्षस्थानी होते. शिवपुतळा साकारणारे शिल्पकार यशवंत सावंत तसेच शाहू महाराजांचे चरित्रग्रंथकार जयसिंगराव पवार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.राष्ट्रपती पाटील म्हणाल्या की, विधिमंडळ सदस्य म्हणून प्रभावीपणे काम करताना जनतेपुढील समस्यांच्या विधायक आणि कालबद्ध निवारणासाठी सदस्यांनी विधिमंडळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा कार्यक्षमतेने प्रामाणिकपणे आणि समर्पित वृत्तीने उपयोग करण्याची गरज आहे. आपली संसदीय लोकशाही काळाशी टक्कर देत समर्थपणे उभी आहे. तसेच लोकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. आता तर भारताच्या जनतेने एका महिलेला राष्ट्रपतीपदावर आरूढ होण्याचा बहुमान दिला. हे भारतीय वैचारिक प्रगल्भतेचे प्रतीक आहे. विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र उगमस्थान आहे, लोकांच्या आशाआकांक्षांचे प्रतिक आहे. येथे जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व करावयास पाठविलेले आहे. त्यांचे आम्ही ऋणी असले पाहिजे. उच्चस्तरीय वाटाघाटींची जी परंपरा आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केली आहे ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असलेला सर्वधर्मसमभावाचा दृष्टिकोन, संकटसमयी जीव धोक्यात घालण्याची धाडसी वृत्ती, स्त्रियांबाबतचा शिवाजी महाराजांचा उदार दृष्टिकोन, कवी, विद्वान यांना छत्रपतींनी दिलेला राजाश्रय याबाबतचे दाखले देऊन राष्ट्रपती पाटील म्हणाल्या की, शिवाजी महाराज हे सदासर्वकाळ चैतन्याने रसरसलेले प्रेरणास्थान आहे. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक प्रबोधनाच्या बाबतीत महात्मा फुले यांचे खरे वारसदार होते, असेही त्या म्हणाल्या.
उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कार विजेते
उत्कृष्ट संसदपटू- गिरीश बापट, चंद्रकांत छाजेड, सचिन अहिर, वर्षां गायकवाड, डॉ. रामचंद्र साळे, शंभूराजे देसाई, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, गुरुनाथ कुलकर्णी, संजय दत्त, पांडुरंग फुंडकर, उल्हास पवार, अरुण गुजराथी. उत्कृष्ट भाषण- राजेंद्र दर्डा, शशिकांत शिंदे, भाई जगताप, बशीर पटेल, नरसय्या आडाम, सुधाकर परिचारक, गजानन कीर्तिकर, फौजिया खान, विलास अवचट, मुझफ्फर हुसैन, डॉ. नीलम गोऱ्हे, मंदा म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी, रामनाथ मोते, कपिल पाटील, मधू चव्हाण, उषा दराडे, पाशा पटेल.