Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

.. तर उच्च शिक्षणातील बदल आधीच घडले असते!
नीरज पंडित, मुंबई, २९ जून

 

उच्च शिक्षणातील बदलांसंदर्भात अहवाल देणाऱ्या प्रा. यशपाल समितीने सुचविलेल्या शिफारशींची याआधीच अंमलबजावणी करणाऱ्या ‘वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिटय़ूट’ (व्हीजेटीआय) या महाविद्यालयाला विनाकारण चौकशीच्या फेऱ्यांत अडकावे लागले आहे. या बदलांकडे जुन्याच चष्म्यातून पाहणाऱ्या काही शिक्षणतज्ज्ञांमुळेच ही नामुश्की ओढवल्याची चर्चा आहे.
प्रा. यशपाल यांनी केंद्र सरकारला अहवाल सादर केल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमे आणि विशेषत: मंत्र्यांनी या अहवालाचे जोरदार स्वागत केले. शिक्षणाचा दर्जा वाढविणाऱ्या या अहवालाची अमलबजावणी केली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली. व्हीजेटीआय महाविद्यालयाने या अहवालातील अनेक तरतुंदींची यापूर्वीच अंमलबजावणी केल्यामुळे उच्च शिक्षणात या महाविद्यालयाने आयआयटीशी बरोबरी केली आहे. त्याचे कौतुक करण्याऐवजी या महाविद्यालयालाच शासनाच्या आणि विद्यापीठाच्या दोन वेगवेगळ्या समितीच्या प्रश्नोत्तरांना सामोरे जावे लागले आहे.
२००४ मध्ये व्हीजेटीआय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर या शिक्षण संस्थेतील शिक्षण पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. या संस्थेने जगभरातील उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आणि देशातील आयआयटींमध्ये सुरू असलेल्या शिक्षण पद्धतींची अमंलबजावणी केली. यामुळे अनेक जुन्या विचारांना छेद गेला. नव्या शिक्षण पद्धतीनुसार संस्थेने ‘अ‍ॅब्सोलेट मार्किंग’ पद्धतीच्या ऐवजी ‘रिलेटिव्ह ग्रेडिंग’ पद्धत सुरू केली. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत लिहिलेल्या पेपरपुरते मार्क देणे बंद केले, तर विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील प्रगतीनुसार त्यांना टक्क्यांमध्ये ग्रेडिंग देणे सुरू केले. या टक्क्यांच्या आधारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावण्यात येतो. शिवाय नवीन पद्धतीनुसार शिक्षकांना त्यांच्या कामाची नोंदवही तयार करणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे शिक्षकाने केलेल्या कामाची नोंद होऊ लागली. शिवाय विद्यार्थ्यांकडून प्रत्येक शिक्षकाच्या संदर्भातील एक प्रश्नावली भरून घेण्यास सुरुवात केली. याद्वारे शिक्षक किती नव्या प्रकारे शिकवितात हे समोर येण्यास सुरुवात झाली. या सर्व प्रमुख बदलांचा फायदा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीच होत असल्याचे संस्थेचे संचालक नारायण खेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. भविष्यातील गरज लक्षात घेता हे बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. हे बदल झाल्यानंतर त्याला काही लोकांकडून विरोध होणे साहजिकच होते. कारण बदल पचविणे कठीण असते. यामुळे संस्थेविरुद्ध बरीच ओरड झाली. याचा परिणाम म्हणजे संस्थेला शासनाच्या जे. बी. जोशी समितीला तर विद्यापीठातील तज्ज्ञांच्या एका समितीच्या चौकशीला सामारे जावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्या महाविद्यालयात अवलंबिलेली शिक्षण पद्धती गेली दोनहून अधिक दशके देशातील आयआयटींमध्ये सुरू आहे, त्यातच काही बदल करून नवी पद्धत आम्ही अमलात आणली, अशी माहिती त्यांनी दिली. आगामी काळात अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे असे प्रा. यशपाल समितीच्या अहवालातही नमूद केले आहे, असेही खेडकर यांनी सांगितले. या बदलांबरोबर गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेच्या शिक्षणाचा दर्जा अधिक वाढला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२००६-०७ या शैक्षणिक वर्षांपासून संस्थेत पूर्णवेळ पी.एचडी. च्या अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे तर विद्यार्थ्यांना सद्यस्थितीचे भान यावे यासाठी दर आठवडय़ाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्याने ठेवण्यात येतात. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला वाव देण्यासाठी संस्थेने इन्होवेशन अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह सेलची स्थापना केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सुचणाऱ्या विविध कल्पना लिहून द्यायच्या असतात. विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही प्रकल्पांची निवड शिक्षक करतात व त्यावर काम करण्यास सुरुवात होते. याचा मुख्य फायदा असा की, चार वर्षांच्या अभ्यासक्रम कालावधीत काही विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पाचे स्वामित्त्व हक्क देखील मिळू शकत़े, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अनिल काकोडकर यांचा सत्कार
अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि व्हीजेटीआय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिल काकोडकर यांचा विशेष सत्कार १ जुलै रोजी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. काकोडकर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक नारायण खेडकर यांनी दिली.