Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पालिकेच्या जकातउत्पन्नात घट : विकास प्रकल्पांवर परिणाम होणार
बंधुराज लोणे, मुंबई, २९ जून

 

महापालिकेच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा असणाऱ्या जकातीच्या उत्पन्नात चालू वर्षांत लक्षणीय घट होत आहे. परिणामी पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट होण्याची चिन्हे असून विकासकामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे एवढय़ा महत्त्वाच्या खात्यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची गरज पालिका प्रशासनाला वाटत नसल्याचेही दिसून आले आहे. महापालिकेच्या महसुलात जकातीचा लक्षणीय वाट आहे. गेल्या वर्षी जागतिक मंदीचे कारण सांगितले जात होते तरीही महापालिकेने ४,५२५ कोटी रुपये जकातीद्वारा वसूल केले होते. या वर्षी म्हणजे २००९-२०१० मध्ये हे उत्पन्न ४,३०० कोटी रुपये इतके अपेक्षित आहे. मात्र दिवसेंदिवस जकातीचे उत्पन्न कमी होत असल्याने प्रशासनापुढील समस्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्याच्या तुलनेत यंदा एप्रिल, मे महिन्यांत उत्पन्न कमी झाले आहे. गेल्या वर्षी ४५५.४७ कोटी रुपये एप्रिल महिन्यात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते तर या वर्षी फक्त ३९५.७८ कोटी रुपये उत्पन्न झाले आहे. उत्पन्नात १३.११ टक्के घट आहे. जकात नाक्यावर वसूल होणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे तर गोदी, विमानतळ, वाडीबंदर, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, ओएनजीसी यांच्याकडून येणाऱ्या जकातीचे उत्पन्नही कमी झाले आहे. ही घट ८.४५ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे जकात वसुलीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्यानंतरही जकात वसुलीत वाढ झालेली नाही. जकात चोरी थांबविण्यासाठी सहा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या विभागाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. जकात नाक्यावर दररोज किमान १२ हजार वाहने येतात. त्यांच्याकडून तात्काळ जकात वसूल व्हावी म्हणून कार्ड पद्धती अंमलात आणण्यात आली आहे. तरीही जकातीचे उत्पन्न कमी होत असल्याने पालिका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. पालिकेतर्फे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जुन्या प्रकल्पांवरही मोठा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र जकातीचे उत्पन्न असेच घटले तर विकास प्रकल्पांवर परिणाम होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.