Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

यशच्या हत्येचा तपास घोंघावतोय अनिल शहा कुटुंबियांभोवतीच
डोंबिवली, २९ जून /प्रतिनिधी

 

यश शहा याच्या हत्ये प्रकरणातील धागा अजून पोलिसांना मिळालेला नाही. पोलीस या या प्रकरणाने चक्रावून गेले आहेत. या हत्येची सर्व सूत्रे पुन्हा अनिल शहा यांच्या कुटुंबियांभोवती फिरत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परिचित व्यक्तींचेच हे काम आहे आणि तो सुगावा लावण्याच्या मागावर आहोत, असे पोलीस सांगत आहेत.
दरम्यान, सोमवारी दुपारी राज ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला ठाकरे यांनी दुपारी शहा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी वैशाली दरेकर, दीपिका पेडणेकर उपस्थित होत्या. शर्मिला ठाकरे यांनी दरेकर व पेडणेकर यांना ‘आपण या प्रकरणात स्वस्थ बसू नका. उद्या पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचे काय झाले म्हणून पोलिसांवर सतत दबाव टाका, त्यांच्या पाठीमागे लागा तरच या प्रकरणाचे धागेदोरे मिळणार आहेत,’ असे सांगितले.
आज सकाळी यश शिक्षण घेत असलेल्या शाळेत त्याला आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांना, त्याच्या मित्रांना अश्रू आवरणे अशक्य झाले. या प्रकरणाचा तपास लागला पाहिजे, अशी मते यावेळी व्यक्त करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, यशला खंडणीखोरांनी ताब्यात घेतल्यापासून आम्ही अनिल शहा, यशशी निगडित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे, पण एकही जण या प्रकरणात बोलण्यास तयार नाही. काही तरी घडल्याशिवाय एवढा प्रकार होणार नाही, त्यामुळे यशचे वडील जरी या प्रकरणात आता बोलत नसले, तरी त्यांनी कोणतीही भीती मनात न ठेवता उघडपणे बोलणे आवश्यक आहे.
या प्रकरणाबाबत अन्य कोणाला माहिती असेल तर त्यांनी शहरातील जाणकार माणसाला सोबत घेऊन पोलिसांना स्वतंत्रपणे याची माहिती देणे आवश्यक आहे. पोलीस पोलिसांच्या बाजूने तपास करत आहेत, पण शेवटी तपासाचा धागा सापडणे महत्त्वाचे आहे. तो मिळाला की क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, असे सूत्राने सांगितले. शहा कुटुंबियांशी निगडित सर्वाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे तपासाची सर्व सूत्रे पुन्हा अनिल शहा यांच्याकडे सरकत आहेत. त्यांनी काही तरी बोलणे आवश्यक आहे, असे सूत्राने सांगितले.
पोलीस सूत्राने सांगितले की, यशचे अपहरण झाल्यानंतर जे मोबाइलवर त्याने बोलणे केले आहे, ते गुजराथी भाषेतून केले आहे. म्हणजे त्याच्या सोबतीला असणारे हेही तीच भाषा बोलत असावेत. यशचे अपहरण झाल्यानंतर भावनेच्या भरात यशचा शोध घेण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यात आला, त्यामुळे या प्रकरणाचा खूप बोलबाला झाला. तसेच, जागोजागी यशचा शोध चालू असल्याचे चित्र अपहरणकर्त्यांना दिसत असावे किंवा ते अनिल शहा यांच्या मित्र, नातेवाईकांना ओळखत असावेत. त्यामुळे ते एका जागी थांबले नाहीत.