Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची, पण निर्णय लवकर व्हावा - शरद पवार
मुंबई, २९ जून / खास प्रतिनिधी

 

आघाडीवरून काँग्रेसचे राज्यातील नेते वेगवेगळे इशारे देत असले तरी काँग्रेसचे नवी दिल्लीतील नेते राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवण्याच्या मताचे आहेत. आघाडी होण्याचे दोन्ही पक्षांच्या फायद्याचे असून, आघाडीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पवारांनी पक्षाच्या मुख्यालयात मुंबईतील पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. तत्पूर्वी पी. ए. संगमा यांच्या नेतृत्वाखालील चार नेत्यांच्या समितीने राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या समितीत प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी आणि तारीक अन्वर या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसबरोबर आघाडीबाबत पवार हे आशावादी होते. आघाडी जवळपास ९९ टक्के निश्चित आहे. आघाडीचे महत्त्व काँग्रेसच्या नेत्यांना पटले आहे. मात्र काँग्रेसची इच्छा नसल्यास स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेसने पुढील १५ दिवसांमध्ये आघाडीबाबतचा निर्णय घेतल्यास पुढील वाटाघाटी करणे सोपे जाईल, असेही मत पवारांनी व्यक्त केले. कारण मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नव्याने जागावाटपाची बोलणी करावी लागणार आहे. काँग्रेसने लवकर प्रतिसाद दिल्यास अधिक योग्य ठरेल, असेही मत पवारांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गोविंदराव आदिक व आर. आर. पाटील हे उपस्थित होते.
काँग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय लवकर व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वबळावर लढायचे असल्यास लवकर निर्णय व्हावा, असा सूर होता. महापालिका व नगरपालिकांमध्ये शिवसेना व भाजपबरोबर आघाडी झाली असल्यास दोन्ही पक्षांनी दोन पाऊले पुढे टाकून ही आघाडी संपुष्टात आणावी, असे आवाहन आर. आर. पाटील यांनी काल केल्याने त्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली आहे. जातीयवादी पक्षांबरोबर आघाडी करू नये, असे विचार मांडणाऱ्या आर. आर. पाटील यांनी गेल्या आठवडय़ात पनवेलमध्ये काय झाले याचा विचार करावा, असा सल्ला काँग्रेसने दिला आहे. कारण तेथे शिवसेना व भाजपच्या मदतीने नगराध्यक्षपद राष्ट्रवादीने पटकावले आहे. आधी राष्ट्रवादीने पुणे पॅटर्न संपुष्टात आणावा, अशी अपेक्षा खासदार सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने विभागवार बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रत्येकी दोन मंत्र्यांची विभागांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. हे मंत्री तेथे जाऊन विभाग पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.