Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

वांद्रे - वरळी सी लिंकचे आज उदघाटन
मुंबई २९ जून / प्रतिनिधी

 

देशातील पहिला सागरी सेतू, निव्वळ दोन केबल-स्टेडवर उभा राहिलेला वास्तूशिल्पाचा अप्रतिम कलाविष्कार, मुंबईत गेटवे ऑफ इंडियानंतर पाहण्यासारखे दुसरे आधुनिक पर्यटन स्थळ, आणि स्वतंत्रप्राप्तीनंतर भारतीय अभियंत्यांच्या कल्पकतेतून उभी राहिलेली पहिला विलोभनीय सागरी पुल अशा अनेक विशेषणांनी बहुचर्चित असलेल्या मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक सागरी सेतूचे आज दुपारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. त्यानंतर लगेचच मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. एमएसआरडीसीच्या पुढाकराने दहा वर्षांपूर्वी माहीम कॉजवेवरील प्रंचड वाहतूकीला पर्याय म्हणून वांद्रे वरळी सागरी सेतूची मूर्हतमेढ रोवण्यात आली. एक हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येत असून उद्या दुपारी साडेतीन वाजता युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. या प्रकल्पातील हा पहिला टप्पा असून त्यानंतर हाजी अली व नरिमन पॉईन्ट हे दोन टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आठ लेन प्रस्तावित आहेत. मात्र अद्याप काम अर्धवट असून सध्या चार मार्गिका खुल्या करण्यात येणार आहेत. या चार लेनमधील दोन लेन वांद्रेकडून वरळी कडे तर दोन लेन वरळी कडून वांद्रे कडे येण्यासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री विमल मुंदडा व एचएचसी कंपनाचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
मुंबईचा मानबिंदू ठरणाऱ्या या पुलाच्या सुरक्षिततेती संपूर्ण काळजी घेण्यात येत असून तटरक्षक दल व इतर एजन्सीच्या स्पीड बोटींसाठी दोन जेट्टी बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे सहआयुक्त (वाहतूक) संजय बर्वे यांनी सांगितले. या पुलावरुन एका तासात ४ हजार ४०० वाहने जातील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एक्सप्रेस-वे प्रमाणे या पुलावरुन दोन व तीन चाकी वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक वाहनास ५० किमी मर्यादा घालण्यात आली असून या पुलावरुन सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्याचा विचार कुणी करणार असेल तर मात्र ती संधी मिळणार नाही असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गवई यांनी स्पष्ट केले.