Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

८० वर्षांचा रॉक स्टार..
प्रतिनिधी

 

सुनीता संचेती.. चारचौघांसारखी तिचीही रंगीबेरंगी स्वप्ने होती. पण वयाच्या १६ व्या वर्षी मज्जारज्जूचा विकार जडला आणि त्यानंतर स्वप्ने साकारणे तर राहू द्या; साधे सामान्यांसारखे जगणेही मोठे आव्हान होऊन तिच्यासमोर उभे ठाकले. दीपा मलिक.. विविध क्रीडाप्रकारांत २५ सुवर्णपदके, २ लिम्का रेकॉर्डस्, दीपाची क्रीडाक्षेत्रातील कारकीर्द वयाच्या ३६ व्या वर्षी सुरू झाली, आणि त्याला कारण ठरला तिच्या मज्जारज्जूचा विकार.. या विकारामुळे दीपाचे जीवन आमूलाग्र बदलले. नारायण धारप काका.. वय वर्षे ८०. वयाच्या ३० व्या वर्षी अपघाताने त्यांच्या मज्जारज्जूवर आघात केला. त्यानंतर ते व्हीलचेअरवर आहेत, तरीही त्यांच्या वयाच्या धडधाकट मनुष्याइतकेच किंवा कदाचित त्याहून जास्त समाधानी आयुष्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. म्हणूनच त्यांना ‘निना फाउण्डेशन’च्या वतीने ‘रॉक स्टार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले!
दीपा, सुनीता, धारप काका यांच्यासारख्या सुमारे तीन लाख व्यक्ती भारतात आहेत. मज्जारज्जू निकामी झाल्याने त्यांना अपंगत्व आले आहे. मात्र, त्यांना चारचौघांसारखे सार्वजनिक जीवन जगता यावे, अशी व्यवस्था अपवादानेच आढळते. त्यांच्या समस्यांना, गरजांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘निना फाउण्डेशन’ या संस्थेने यंदा पहिल्या ‘स्पायनल इंजुरी अवेअरनेस डे’चे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने मज्जारज्जूच्या विकाराने अपंगत्व आलेल्या विविध वयाच्या व्यक्ति आपापल्या आप्तस्वकियांसह नुकत्याच माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमध्ये एकत्र आल्या होत्या. या मंडळींनी विविध कार्यक्रम सादर केले; तसेच आपापले अनुभव उपस्थितांना कथन केले. त्यानंतर ८० वर्षीय धारप काकांना पहिला ‘रॉक स्टार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपले कुटुंबीय आणि त्यांचा भक्कम पाठिंबा हे आपल्या यशाचे शिल्पकार असल्याची भावना धारप काकांनी या वेळी व्यक्त केली.
मज्जारज्जूच्या विकारामुळे अपंगत्व आलेल्यांना मदत करणे, या प्रकारच्या अपंगत्वाविषयी जनजागृती करणे या हेतूने प्रा. केतना मेहता यांनी २००१ मध्ये ‘निना फाउण्डेशन’ची स्थापना केली. २५ जून २००९ रोजी संस्थेतर्फे पहिला ‘स्पायनल इंजुरी अवेअरनेस डे’ पार पडला. या विषयी त्या म्हणाल्या, ‘‘मज्जारज्जूवरील आघातामुळे अपंगत्व आलेल्या तीन लाखांहून अधिक व्यक्ती भारतात आहेत. अपघात, साहसी क्रीडाप्रकार, मणक्याचे विकार आदी विविध कारणांमुळे या संख्येत दरवर्षी जवळपास २० हजारांची भर पडते. अशांचे आयुष्य पुन्हा मार्गस्थ करण्यासाठी योग्य पुनर्वसन हाच उपाय आहे. त्यामुळे अद्ययावत अशी पुनवर्सन केंद्रे भारतात आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये असणे, ही आज निकड आहे.’’ कार्यक्रमातील सहभागी सुनीता संचेती हिने या विकारग्रस्तांसाठी सामान्य सार्वजनिक जीवन जगणे कठीण असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमांमध्ये व्हीलचेअर, अपंगांसाठी खास स्वच्छतागृहे आदी लहान-लहान परंतु, अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास आम्हाला बऱ्याच अंशी सामान्यांसारखे सार्वजनिक जीवन जगता येईल, अशी अपेक्षा सुनीताने व्यक्त केली.
या उपक्रमाला मॉडेल जेसिका मेहर-रामपाल हिची ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर म्हणून, तसेच राज्याचे शिक्षण मुख्य सचिव जे. एस. सहारिया, लेखिका बच्छी करकरिआ आणि दावर कॉलेजच्या मुख्याध्यापिका पुरन दावर यांची उपस्थिती लाभली. ‘स्पायनल कॉर्ड इंजुरी’विषयक अधिक माहितीसाठी संपर्क : निना फाउण्डेशन ०२२- २४०९४३१९, २४०७१९५२.