Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रवास हा नक्षत्राचा
आठवणींची शिदोरी आणि लोकसंगीताची मैफल
प्रतिनिधी

 

लोकशाहीर विठ्ठल उमप वय वष्रे ७९ आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण (माई) वय वष्रे ७७.. महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा अभिजात आणि समृद्ध वारसा जपणारी दिग्गज मंडळी.. शुक्रवारी ‘प्रवास हा नक्षत्राचा’ या कार्यक्रमानिमित्त शिवाजी नाटय़मंदिरात एक सुमधुर मैफल रंगली.. आणि एकमेकांच्या साक्षीने लोकसंगीताच्या अवकाशातील या ध्रुवताऱ्यांचा प्रवास उलगडत गेला, तेव्हा सारीच रसिकमंडळी मुग्ध झाली.. आठवणींच्या कप्प्यातील जपलेली शिदोरी आणि रसिकांवर गारुड घालणारी लोकसंगीताची अदाकारी यांनी बहरत गेलेल्या प्रवासातून आगळा आविष्कार अवतरला..
विठ्ठल उमप आणि सुलोचना चव्हाण यांच्या वयोमानाचा जरी विचार केला तरी लोकसंगीताचा हा प्रदीर्घ प्रवास कार्यक्रमाच्या गणितात बसविणे तसे अवघडच होते. त्यामुळेच ‘प्रवास हा नक्षत्राचा’ म्हणजे या दिग्गजांच्या प्रवासाची क्षणचित्रे होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण दोघांची गाणी मात्र वयालाही लाजवणारी अशीच झाली.. कवी अरुण म्हात्रे यांचे समर्पक आणि काव्यमय सूत्रसंचालन उमप आणि चव्हाण द्वयींच्या प्रवासाचे अंतरंग रसिकांसमोर रिते करीत होते.
विठ्ठल उमप यांनी नमनापासून सुरुवात करून कृष्णाच्या संवादावर बोबडय़ा आवाजात गायलेली बोबडी गवळण गाऊन सर्वाना कृष्णविश्वातच नेऊन ठेवले. मग डोंबारी गीतानेही सर्वाची दाद मिळविली. उमप यांनी आपल्या काळ्या रंगाबाबतही अनेक आठवणी सांगताना ‘हात नको लावू माझ्या साडीला..’ या चालीवर आधारित ‘नाव नको ठेवू काळ्या रंगाला..’ हे विडंबनगीत सादर केले. मग सुधीर भटांच्या ‘वय निघून गेले..’ या गझलेचे विडंबन ‘हे वय अजून आहे..’ने रसिकांना टाळ्यांवर ठेका द्ययला लावला.. उमप यांची पहिली लोकप्रिय रेकॉर्ड ‘ये दादा अवर ये..’ या कोळीगीताने सर्वानाच मच्छिमार्केटमध्ये नेले. त्यातील खोचक संवादाची अचूक फेक आणि उमप यांच्या हावभावांतून निर्माण झालेला जिवंतपणा हेच त्यांच्या यशाचे द्योतक असल्याची अनुभूती प्रेक्षकांना आल्याशिवाय राहिली नाही. ‘माझी मैना गावाकडं राहिली गं..’ या लावणीनंतर उमप यांनी आपल्या रांगडय़ा आवाजातील कव्वालीने कार्यक्रमाचा शेवट केला.
सुलोचना चव्हाण यांनी मराठीत गाण्यापूर्वी अनेक वर्षे पंजाबी, गुजराती इत्यादी भाषांमध्ये आपली छाप सोडली आहे. माईंनी आपल्या गानप्रवासाच्या प्रारंभापासून आयुष्यभर जपलेले अनेक क्षण उलगडले, तेव्हा साऱ्यांनाच त्यांचे कष्ट, मेहनत आणि स्वाभावाचीही प्रचीती आली. ‘चोरी चोरी आगसी दिलमें लगाके..’ या गाण्याच्या मुखडय़ाने माईंनी सुरुवात केली. माईंचे मराठीतील पहिले गाजलेले गाणे ‘..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’ याची झलकही ठसकेबाज झाली. ‘कसं काय पाटील बरं हाय का?’, ‘हळूहळू गालात हसतोय गं’ आदी लावण्यांबाबतचे किस्से सांगताना ‘माझ्या लावणीवर मी बाई नाचवते आणि तिच्या अॅक्शनवर मी गाते’ हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. ‘फड सांभाळ तुऱ्याचा गं आला’ आणि ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ या माईंच्या गाजलेल्या लावण्यांनी प्रेक्षकांना ‘वन्स मोअर’ म्हणायला लावले. ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांच्या आठवणींनी सुलोचनामाईंचे डोळे पाणावले.
संदेश उमप आणि अनुदिप जाधव यांच्या संकल्पना आणि संयोजनातून साकारलेल्या या कार्यक्रमाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना सुनील देवळेकर यांनी समर्थपणे रेखाटली होती. तर शंकर गायकवाड, विनायक सोनावणे, विजय निरभवणे आदींच्या सहकार्याने कार्यक्रम उभा राहिला आहे. माईंचे पुत्र विजय चव्हाण यांनी उमप यांच्या एका गाण्यावर वाजविलेल्या डमरूला प्रेक्षकांनी दाद दिली. वेळेच्या बंधनामुळे कार्यक्रम संपला तेव्हा ‘प्रवास हा नक्षत्राचा’ संपूच नये असेच सर्वाना वाटत होते. यातच या कार्यक्रमाचे यश अधोरेखित होते.