Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईत विभागात सेना-काँग्रेस ‘आघाडी’ची मुसंडी
मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीवर ‘एनआरएमयू’चा लाल बावटा
प्रतिनिधी

 

मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २६६ पैकी १६४ जागाजिंकून ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन’ने (एनआरएमयू) पतसंस्थेवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र त्याचवेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) आणि रेल कामगार सेनेच्या ‘आघाडी’नेही मुंबई विभागात ७७ पैकी २५ जागाजिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.
आशियातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पतसंस्थेवर वर्चस्वासाठी गेल्या गुरुवारी मुंबईसह देशभरातील नऊ विभागांतून मतदान झाले. पतसंस्थेवर भागभांडवलधारकांचे २६६ प्रतिनिधी (डेलिगेटस्) निवडून देण्यासाठी झालेल्या निवडणुकीत ‘एनआरएमयू’च्या पदरात १६२ जागा पडल्या, तर ९९ जागा ‘आघाडी’ला मिळाल्या. परिणामी सुमारे ८०० कोटींची उलाढाल असलेल्या या पतसंस्थेवर पुन्हा एकदा ‘एनआरएमयू’चा लाल बावटा फडकला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत अवघ्या ८७ जागा मिळवणाऱ्या ‘सीआरएमएस’च्या खात्यात आणखी १२ जागांची भर पडल्याने, एनआरएमयूसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.
मुंबई विभागातून ‘एनआरएमयू’ला मोठा धक्का बसला आहे. मुंबई विभागातील ७७ जागांपैकी अवघ्या ५२ जागा एनआरएमयूला मिळाल्या असून, उर्वरित जागा सीआरएमएस व रेल कामगार सेनेच्या आघाडीने पटकावल्या आहेत. भायखळा, कुर्ला कारशेड आणि वाडीबंदर या ठिकाणी ‘एनआरएमयू’च्या पॅनेलचा साफ धुव्वा उडाला. या ठिकाणच्या पराभवामागील कारणांचा आढावा घेणार असल्याचे ‘एनआरएमयू’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. निवडणुकीच्या निकालानंतर सीआरएमएसच्या गोटातही ‘कभी खुशी कभी गम’ असे वातावरण आहे. एकीकडे या निवडणुकीत ‘परिवर्तन’ घडवून आणण्याचे स्वप्न भंगल्याचे दु:ख आहे, तर दुसरीकडे पतसंस्थेवर निवडून आलेल्या प्रतिनिधींची संख्या वाढल्याचा आनंद आहे. आता लवकरच प्रतिनिधींमधून पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी दोन्ही गोटांतून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.