Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजभवनाजवळ सुरक्षा केंद्राची उभारणी करण्याची मागणी
प्रतिनिधी

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या सुरक्षेचा विचार करून राजभवनाजवळील समुद्रात एका सुरक्षा केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे दक्षिण मुंबईतील नामवंत नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केले. या शिष्टमंडळात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली ओंबळे, वंदना पाताडे, सिग्नेचर संस्थेचे डॉ. निलेश बक्षी, नेपियन सी रोड रहिवासी संघटनेचे सचिव निलू गिडवानी आणि पेडर रोड रहिवासी संघटनेचे सचिव रान अजूमल यांचा समावेश होता. दक्षिण मुंबईच्या सुरक्षेसाठी सेवानिवृत्त सेनाप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांची एक समिती नेमली जावी, ही समिती सभोवतालच्या सुरक्षा संस्थांना मार्गदर्शन करील व त्यांच्यात समन्वय राहण्यासाठी देखरेख करील, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांच्या सभा घेण्यात याव्यात आणि त्यांना विश्वासात घेण्यात यावे, राम प्रधान समितीचा अहवाल मागवून तो जनतेला उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्या. या वेळी वैशाली ओंबळेने पोलिसांच्या सुरक्षेबाबत खास उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यपालांनी राज्य सरकारला कराव्यात, अशी विनंती केली.