Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

बीपीटी रोडवरील दुचाकी वाहनांना लावलेला टोल रद्द
प्रतिनिधी

 

शिवडी गावातील बीपीटी रोडवरून वाहतूक करण्यासाठी १ जूनपासून दुचाकी वाहनांना २० रुपये, चार चाकी वाहनांना ३० रुपये तर अवजड वाहनांना ५० रुपये टोल लावण्यात आला होता. गिरीनगर, शिवडी कोळीवाडा गाव, रामगड, गाडी अड्डा, रेतीबंदर, इंदिरा नगर व कोळसाबंदर इत्यादी विभागांतील रहिवाशांना हा टोल जाचक ठरत होता. या रस्त्याचा वापर शिवडी रेल्वे ते स्थानकावर जाण्यासाठी करतात. शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले व शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच शिवसैनिकांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या निर्णयाविरोधात निदर्शने केली. मुंबई पोर्ट ट्रस्टने रसत्याच्या नूतनीकरणाचे काम केले नस्ताना अथवा नवीन कोणतेही बांधकाम केले नसताना टोला का लावता, असा सवालही शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी विचारला. त्याचप्रमाणे या रस्त्यावरील टोलनाका न हटविल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल, असा इशारा एका पत्राद्वारे मुंबई पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाला देण्यात आला होता.
याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राहुल अस्थाना यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मोटर सायकल वरील टोल त्वरीत बंद करण्यात आला आहे. चार चाकी वाहने व अवजड वाहने याबाबत विचारविनिमय सुरू असून ३० जून रोजी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.