Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

(सविस्तर वृत्त)

धारावी झोपडपट्टीतील मुलांसाठी उभे राहणार अत्याधुनिक क्रीडा संकुल
प्रतिनिधी

 

‘स्लमडॉग मिलिनिअर’ या चित्रपटामुळे जगाच्या नकाशावर पोहचलेले धारावी झोपडपट्टीतील हरहुन्नरी मुलांसाठी आता एमएमआरडीए पुढे सरसावली असून आठ कोटी रुपये खर्च करुन धारावी बस डेपोजवळ अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणार आहे. १२ हजार ४३४ चौ. मी. क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या संकुलाचे भूमिपूजन मंगळवारी मुंबईचे पालकमंत्री नबाब मलिक यांच्या हस्ते झाले.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेले उपनगर असा धारावीचा नावलौकीक जगात आहे. ही ओळख पुसण्याचा शासन प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी एमएमआरडीएने भव्य क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १२ हजार ४३४ चौ. मी. भूखंडावरील सहा हजार ६४३ चौ.मी. परिसरात क्रीडा संकुलची इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीत स्क्वॉश, बिलियर्डस, टेबल टेनिस, आदींची व्यवस्था केली जाणार आहे. अत्याधुनिक व्यायामशाळा, सेमी ऑलिम्पिक जलतरण तलाव, बास्केट बॉल, आणि व्हॉली बॉल कोर्ट याचेही प्रयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. कबड्डी, खो-खो यासारख्या देशी खेळांसाठीही मैदाने राखून ठेवण्यात येणार असून २०० मीटर्स लांब असणाऱ्या पाच मार्गिका धावपटूसाठी उभारला जाणार आहेत. याशिवाय या खेळांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ३०० प्रेक्षक बसू शकतील अशी गॅलरी बांधली जाणार आहे. इनडोअर खेळांप्रमाणे सभागृह, ग्रंथालय, उपहारगृह, आणि राहण्याची व्यवस्था या क्रिडा संकुलामध्ये करण्यात येणार आहे.
या नियोजित क्रिडा संकुलामुळे शहरातील तरुण वर्ग क्रीडा क्षेत्राकडे आर्कषित होईल असा आशावाद पालकमंत्री नबाब मलिक यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे अशा प्रकल्पांमुळे शहरांना जिवंतपणा येतो, असेही ते म्हणाले.
धारावीताल तरुणांना एमएमआरडीएने निर्माण करुन दिलेली ही नामी संधी असून तरुणांनी त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे खासदार एकनाथ गायकवाड यांनी या कार्यक्रमात तरुणांना आवाहन केले. प्राधिकरण सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल आमदार वर्षां गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले तर सर्वागिण विकास म्हणजे क्रिडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देणे त्यामुळे असे प्रकल्प उभारल्यानंतरच शहराचा ‘सर्वागिण विकास’ होईल असे एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.