Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

खासगीकरणातून जकात वसुली
आता मुख्यमंत्रीच घेणार निर्णय
नगर, २९ जून/प्रतिनिधी
महापालिकेच्या खासगीकरणातून जकात वसुली निविदा मंजुरीचे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर गेले आहे. विशेष बाब म्हणून या निविदेला मंजुरी द्यावी, असा कारणांसहितचा सविस्तर प्रस्तावच मनपा उपायुक्त अच्युत हांगे यांनी आज मुंबईत नगर विकास मंत्रालयात दाखल केला.

कोल्हारमध्ये ‘रास्ता रोको’, बसवर दगडफेक
उपोषण, ‘बंद’ कायम, दंगल नियंत्रण पथक दाखल
कोल्हार, २९ जून/वार्ताहर
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करावे, या प्रमुख मागणीसाठी कोल्हार-भगवतीपूरच्या गावकऱ्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत गाव बंद आंदोलन सुरू केले. याबरोबरच गावकऱ्यांच्या आमरण व चक्री उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलनास आज हिंसक वळण लागले. संतप्त गावकऱ्यांनी दुपारी दीड तास ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.

शिर्डीत मारामारी, २ गंभीर जखमी
आजी-माजी नगरसेवकांसह २३ जणांवर गुन्हा
राहाता, २९ जून/वार्ताहर
शिर्डी येथील लक्ष्मीनगर उपनगरात आज दोन गटांत हाणामारी होऊन दोनजण गंभीर जखमी झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आजी-माजी दोन नगरसेवकांसह दोन्ही गटांच्या २३जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खरिपाची मदार सर्वस्वी पावसावर
पिण्याच्या पाण्याचा तूर्त प्रश्न नाही

नगर, २९ जून/प्रतिनिधी

पावसाअभावी जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याची अडचण नसली, तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न मात्र आता गंभीर बनला आहे. जिल्ह्य़ातील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघुपाटबंधारे प्रकल्प, मध्यम प्रकल्प कोरडे पडल्यामुळे आता पावसाशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे खरिप पिकांसाठी आतातरी वरूणराजाने रूसवा सोडावा, अशी प्रार्थना शेतकरी वर्गातून केली जात आहे. जिल्ह्य़ासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा, मुळा धरणाचा पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय घटला आहे.

मनपाचा पुढचा वर्धापनदिन भुईकोट किल्ल्यात साजरा व्हावा - अन्बलगन
नगर, २९ जून/प्रतिनिधी
राज्य सरकारने भुईकोट किल्ला विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद केली असून, महापालिकेचा पुढील वर्धापनदिन या किल्ल्यात साजरा व्हावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी व्यक्त केली. मनपाच्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन व विविध सांस्कृतिक स्पर्धाचे उद्घाटन आज महावीर कलादालनात डॉ. अन्बलगन यांच्या हस्ते झाले. महापौर संग्राम जगताप अध्यक्षस्थानी होते.

बकध्यान
उन्हाळ्याची सुट्टी संपवून महाविद्यालये नुकतीच सुरू झालेली होती. अद्याप विद्यार्थी प्रवेशाच्या धांदलीत गुंतल्यामुळे वर्गात कोणीही बसत नव्हते. आम्ही सहकारी प्राध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे राहून भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना यासंदर्भात चर्चा करत होतो. तेवढय़ात माझ्या प्रयोगशाळेतील सहकारी मला शोधत खेळाच्या मैदानावर आला व प्रयोगशाळेकडे माझी कोणी वाट पाहात आहे, असा निरोप देऊन निघून गेला. आम्ही दोघेही गडबडीने प्रयोगशाळेत गेलो व तेथील दृश्य पाहून मी जागीच स्तब्ध झालो.

सर्वानाच वेध विधानसभेचे!
राजकीय पक्षांना सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. इच्छुक उमेदवारांची विविध माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू आहे. तशी ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही सदस्यांची सुरू आहे. त्यासाठी इच्छुक सदस्य कामाचा आधार घेताना दिसतात, तर काहीजण ‘चमकेश’च्या भूमिकेत आहेत. कशाचाच आधार नसणारे सदस्य चर्चेच्या बुडबुडय़ातून स्वतचे नाव पुढे आणत आहेत. इच्छुकांच्या अहमहमिकेत सदस्यांची भाऊगर्दी झाली आहे.

शाळाखोल्यांचे भाडे न दिल्यास संस्थांवर कारवाई
जि. प. शिक्षण समितीचा इशारा
नगर, २९ जून/प्रतिनिधी
खासगी शिक्षण संस्थांनी भाडय़ाने घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्यांचे थकित भाडे महिनाभरात न भरल्यास त्या सक्तीने खाली करून घेतल्या जातील व संस्थांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देणारा निर्णय आज शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.

नवीन साखर कारखाना व सहवीजनिर्मिती प्रकल्प ‘अशोक’ उभारणार
विरोधकांचा सभेवर बहिष्कार
श्रीरामपूर, २९ जून/प्रतिनिधी
पन्नास वर्षांपासून जुनी यंत्रसामग्री झाल्याने २५०० टनी नवीन साखर कारखाना, तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत घेण्यात आला. अशा प्रकारचा निर्णय घेणारा ‘अशोक’ हा राज्यातील पहिला कारखाना आहे.

रस्त्यावर मृतदेह आढळला, दुसरा गंभीर जखमी अवस्थेत
अपघात की घातपात?
राहाता, २९ जून/वार्ताहर
तालुक्यातील निमगाव शिवारात नगर-मनमाड रस्त्यावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविले. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले. परंतु हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. हा अपघात की घातपात, याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

पाथर्डी तहसीलमध्ये बोंबाबोंब आंदोलन
पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
पाथर्डी, २९ जून/वार्ताहर
तालुक्यातील तोंडोळी येथील दलित कुटुंबाची जमीन सावकाराकडून परत मिळण्यासाठी सुरू केलेले उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच होते. दलित संघटनेच्या वतीने आज तहसीलदारांच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जोशाबा सेवा संघाचे अध्यक्ष देवराम सरोदे, पं. स. सदस्य भगवान आव्हाड व लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ जगधने यांनी केले.तोंडोळी येथील भानुदास अंबादास ससाणे यांची गट नं. ५६मध्ये चार एकर जमीन होती.

जातेगाव घाटात टँकरच्या धडकेने मोटारसायकलवरील दोघे ठार
वाडेगव्हाण, २९ जून/वार्ताहर

नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात टँकरच्या धडकेने मोटारसायकलवरील २जण ठार झाले. आज सकाळी हा अपघात झाला. महंमद गफूर शेख (वय ४५) व लक्ष्मण चिमाजी गायकवाड (वय २५, दोघेही राहणार नारायणगव्हाण, तालुका पारनेर) अशी ठार झालेल्या मोटारसायकलस्वारांची नावे आहेत. ते नारायणगव्हाणवरून मोटारसायकलवर (एमएच १६ व्ही ३१८६) सुपे एमआयडीसीकडे जात होते. त्या वेळी टँकरची (केपीडी ९३ व्ही ९९३१) त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. अपघाताची माहिती समजताच सुपे दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल निमसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटात सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अपघातानंतर टँकरचालक फरारी झाला. नाझर शेखलाल शेख यांनी याबाबत फिर्याद दिली.

निकालानंतर लगेच दहावीची पुनर्परीक्षा - विखे
नगर, २९ जून/प्रतिनिधी
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी दहावीची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर परीक्षा रद्द होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी येथे केले.हिंद सेवा मंडळाच्या वतीने विखे यांचा शिक्षणमंत्री झाल्याबद्दल विशेष कृतज्ञता सोहळ्यात सत्कार करण्यात आला. त्या वेळी शिक्षण क्षेत्रात आगामी काळात करण्यात येणाऱ्या आमूलाग्र बदलांविषयी माहिती देताना ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर दसरे, वसंत लोढा, प्रा. शिरीष मोडक, प्रकाश पोखर्णा, प्रा.मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, प्राचार्य डॉ. केवल जयस्वाल या वेळी प्रमुख उपस्थित होते. विखे म्हणाले की, ऑक्टोबर परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय येत्या १-२ दिवसांत होईल. बारावीच्या परीक्षांसंदर्भातलाही असाच निर्णय पुढील वर्षी घेण्यात येईल. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे पहिल्या २ दिवसांतच पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले. सन २०१२पर्यंत राज्यातील सुमारे ५ हजार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे सरकारचे धोरण आहे.

बनावट सोनेविक्री; दोघा भामटय़ांना अटक
नगर, २९ जून/प्रतिनिधी
सोन्याची वीट असल्याचे भासवून बनावट सोने विक्री करून व्यापाऱ्याला गंडा घालू पाहणाऱ्या चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील दोघा भामटय़ांना कोतवाली पोलिसांनी आज दुपारी अटक केली. गंजबाजारातील वर्मा ज्वेलर्समध्ये मयूर प्रकाश शिरूडे (वय २१) व हितेश हनुमंत राजपूत (वय २४) हे दोघे आले होते. आपल्याकडे साडेतीन किलो वजनाची वीट असून, ती विकायची आहे, असे त्यांनी ज्वेलर्सचे संचालक संतोषकुमार वर्मा यांना सांगितले. सोन्याचा दर्जा तपासावा, यासाठी ४ ग्रॅम शुद्ध सोनेही विटेचा तुकडा असल्याचे सांगून दाखवला. प्रत्यक्षात वीट बघितल्यावर वर्मा यांना संशय आहे. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सहायक निरीक्षक कांचन जाधव, हवालदार दत्तात्रेय घोडके, काकडे, मिसाळ, मकासरे, काळे यांच्या पथकाने तत्काळ वर्मा ज्वेलर्समध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. उद्या (मंगळवारी) या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

एव्हरेस्टवीर कृष्णा आज नगरमध्ये
नगर, २९ जून/प्रतिनिधी

सवार्ंत कमी वयात एव्हरेस्टवीर झालेली पुण्याची कृष्णा पाटील उद्या (मंगळवारी) नगर दौऱ्यावर येत आहे. कृष्णाच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.इमेज पब्लिकेशनच्या वतीने कृष्णाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता साईसूर्य नेत्रसेवा, माणिक चौक येथे कृष्णाच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ‘इमेज’च्या हिमालय अपार्टमेंट, सातभाई गल्लीतील कार्यालयाचे उद्घाटन तिच्या हस्ते होईल. सकाळी ११ वाजता न्यू आर्टस् महाविद्यालयाला भेट व रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कृष्णा मार्गदर्शन करणार आहे.

भाजप शहर शाखेचे साठे, कुलकर्णी उपाध्यक्ष
नगर, २९ जून/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी मनेष साठे व नरेंद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सहचिटणीस म्हणून अनिल गट्टाणी यांची निवड झाली. शहराध्यक्ष अनंत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या बैठकीत या निवडी झाल्या. शहर शाखेतील काहीजणांची जिल्हा संघटनेत निवड झाल्याने ही पदे रिक्त होती.बैठकीत महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय सदस्य नोंदणी करून नवीन प्रभाग समित्या स्थापन करण्यावर चर्चा झाली. यासाठी शहराध्यक्षांसह केदार लाहोटी, श्रीमती सुरेखा विद्ये, कालिंदी केसकर, संतोष नवसुपे व अनिल गट्टाणी यांची समिती स्थापन करण्यात आली.महापालिका क्षेत्रामुळे नगर शहर पक्षसंघटनेस मनपाचा दर्जा देण्याबाबतचा ठराव प्रदेश शाखेकडे पाठविण्याचे बैठकीत ठरले. पक्षाचे नवनिर्वाचित खासदार दिलीप गांधी व मनपाचे स्वीकृत नगरसेवक सचिन पारखी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीला गांधी उपस्थित नसल्याने पारखी यांचा एल. जी. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला श्रीकांत साठे, हाजी अन्वर खान, रवी बाकलीवाल, उदय अनभुले, छाया रजपूत, सुनील पंडित, शिवाजी विधाते, युवा मोर्चा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.