Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

जीवन दर्शन
मित्रापासून सावध

आपल्याला खूप दु:ख सहन करावे लागणार आहे, असे ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले. तेव्हा पीटर म्हणाला, ‘प्रभूजी, असे काय म्हणता हो? तुमच्या बाबतीत असे होणे कधीच शक्य नाही. आम्ही छातीचा कोट करून तुमचे रक्षण करू!’ पीटरने आपल्या धन्याला समज देण्याचा प्रयत्न केला. पीटरला सिंहासन दिसत होते. येशूला क्रूस दिसत होता. पीटरसाठी जीवन म्हणजे धोपट मार्ग होता. येशूसाठी ती अरुंद वाट होती.

 


भावनाशील पीटरला वास्तवाच्या विस्तवाची जाणीव करून देणे आवश्यक होते. येशू त्याला म्हणाला, ‘सैताना, बाजूला हो. मला वेदनेच्या वाटेवरून जाणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय मुक्ती नाही. माझी वाट ठरली आहे.. ती बदलू नकोस. उलट, तूसुद्धा कर्तव्याचा क्रूस उचलून माझ्यामागे ये!’
जगण्याची उत्तरे सोपी नसतात. रस मिळण्यासाठी उसाची कांडे चरकात पिळली जातात. पीठ मिळण्यासाठी गहू उखळात कांडावा लागतो आणि भाकर होण्यासाठी पिठाला पोळून घ्यावे लागते. तसेच अध्यात्माचे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी साधकाला कठोर परिश्रम करावे लागतात, याची स्पष्ट जाणीव येशूने पीटरला आणि अन्य शिष्यांना करून दिली. अरण्यात चाळीस दिवस साधना करीत असताना येशूने कडक उपवास केला. त्याला भूक लागली तेव्हा सैतानाने त्याला दगडाच्या भाकरी करण्याचा मोह घातला. स्वार्थासाठी आत्मिक शक्तीचा वापर करण्यास येशूने नकार दिला. सत्तेचा गैरवापर हा आधुनिक जीवनातील सर्वात मोठा मोह आहे. सोय करतो तोच सोयरा समजला जातो. आपल्या माणसाची वर्णी लावण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले जातात.
येशूने सोयीचा नव्हे, तर क्रूसाचा खडतर मार्ग निवडला आणि आपल्या अनुयायांनी तोच मार्ग चोखाळला, असे त्याने शिकवले. साधकाला शत्रूपासून नव्हे, तर मित्रापासून मोठा धोका असतो. शत्रूपासून आपण नेहमीच सावध असतो. मित्र आपल्यावर सहज मोहिनी टाकू शकतो. चुकीचा सल्ला देणाऱ्या मित्राला वेळीच खडसावणे आवश्यक असते. येशूने तसे केले म्हणून पीटर संतपदाला पोहोचला.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd48@gmail.com

कुतूहल
धृवीय प्रकाश
ध्रुवीय प्रकाश म्हणजे काय व तो कसा निर्माण होतो?

ध्रुवीय प्रकाश हा आपल्या नावाप्रमाणे मुख्यत: ध्रुवीय प्रदेशात किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागांतूनच दिसतो. एका मोठय़ा रंगीत पण मखमली पडद्यासारखा रात्रीच्या आकाशात दिसणारा हा प्रकाश पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्याचा सुंदर आविष्कार आहे. याची निर्मिती ही पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित आहे. सूर्य हा सर्व दिशांना सतत विद्युतभारित कण उत्सर्जित करीत असतो. यातील पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या बऱ्याच कणांची दिशा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे बदलते, तर काही कण पृथ्वीभोवतालच्या व्ॉन अ‍ॅलनच्या पट्टय़ात अडकतात. काही कण मात्र चुंबकीय क्षेत्राच्या रेषांलगत प्रवास करीत पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकतात. चुंबकीय रेषा या पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशांजवळ असणाऱ्या चुंबकीय ध्रुवात एकत्र येत असल्यामुळे हे कणसुद्धा या रेषांलगत प्रवास करीत पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांजवळील वातावरणात शिरतात. इथे या कणांची टक्कर पृथ्वीच्या वरच्या (सुमारे ८० कि.मी. उंचीवरच्या) वातावरणातील रेणूंशी होते. या क्रियेत वातावरणातील रेणू अतिरिक्त ऊर्जा मिळून उत्तेजित होतात. कालांतराने ही अतिरिक्त ऊर्जा या रेणूंकडून ध्रुवीय प्रकाशाच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते.
हिरव्या किंवा लाल रंगाचा ध्रुवीय प्रकाश हा हवेतील ऑक्सिजनच्या रेणूंमुळे निर्माण होतो, तर पुसट लाल, गुलाबी किंवा गडद निळा-जांभळा ध्रुवीय प्रकाश हा नायट्रोजनच्या अणूंमुळे निर्माण झालेला असतो. अगदी क्वचित दिसणाऱ्या नारिंगी प्रकाशाची निर्मिती ही निऑनच्या रेणूंमुळे झालेली असते. ध्रुवीय प्रकाश हा फक्त पृथ्वीवरच नव्हे, तर ज्या ग्रहांना चुंबकत्व आणि वातावरण हे दोन्ही लाभले आहेत अशा मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून या इतर ग्रहांवरही आढळल्याची नोंद अंतराळयानांद्वारे केली गेली आहे.
अरविंद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
तुंगास्कात स्फोट

समजा, हिरोशिमावर झालेल्या अणुस्फोटापेक्षा एक हजार पटीपेक्षा जास्त क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट झाला तर काय होईल? काय होईल याची कल्पना करता येत नाही. परंतु दुर्दैवाने असे झालेय. ३० जून १९०८ रोजी सैबेरियातील तुंगास्काच्या बर्फाळ प्रदेशात सकाळी सव्वासातच्या सुमारास हा महाभयंकर स्फोट झाला. अर्थात हा स्फोट काही अणुचाचणी नव्हती तर निसर्गाचा तो एक कोप होता असे म्हटले तरी चालेल. ३० जून १९०८ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास या भागात राहणाऱ्या तुंगास जमातींना अचानक निळय़ापांढऱ्या रंगाचा तेजस्वी पट्टा आकाशातून सरकताना दिसला. सूर्यापेक्षा तेजस्वी असणार हा पट्टा क्षणात दिसेनासा झाला आणि मग कानठळय़ा बसणारे अनेक स्फोट झाले. या स्फोटात सहा कोटी झाडे एका क्षणात बेचिराख झाली. या परिसरातून १०० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिवासींच्या झोपडय़ा आकाशात उंच उडाल्या. रेनडिअरचे हजारो कळप मृत्युमुखी पडले. हा भाग तेव्हा रशियात होता. या स्फोटानंतर युरोप, रशियातील आकाश इतके तेजस्वी दिसत होते, की मध्यरात्रीसुद्धा दिवा न लावता वाचता येत होते. तुंगास्काच्या या स्फोटाचे रहस्य आजही उलगडले नाही. त्या वेळच्या लोकांच्या मते ढगांचा राजा आग्डी देवतेचा हा कोप होता. या स्फोटाचा अभ्यास करण्यासाठी १९२०च्या सुमारास रशियन तज्ज्ञ पोहोचले. पण काही ठोस हाती लागले नाही. अलीकडे टेक्सार विद्यापीठाने हा स्फोट म्हणजे अवकाशात वावरणाऱ्या कृष्णविवरांची पृथ्वीशी झालेली टक्कर होती असे म्हटले. ‘एन्की’ धूमकेतूमुळे होणारा उल्कावर्षांव ३० जून १९०८ रोजीच झाला आणि त्याच दिवशी हा स्फोट झाल्याने ही धूमकेतूचीच टक्कर आहे हे बऱ्याच जणांनी मान्य केले आहे.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
माणूसघाणी आणि एकलकोंडी
सकाळची वेळ होती. टेबलाभोवती साक्षी, साक्षीचा भाऊ नीतेश आणि क्षितिजा बसली होती. आईनं त्या सर्वासमोर थालिपीठाच्या बशा ठेवल्या. नीतेशनं विचारलं, ‘काय गं साक्षी, आज तुमचा कार्यक्रम काय?’
‘आम्ही आज समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत!’
आई म्हणाली, ‘क्षितिजा तुझ्यापेक्षा लहान आहे. काळजी घे तिची. नाही तर मीच येते तुमच्याबरोबर.’ दुपारनंतर त्या तिघी समुद्रावर गेल्या. साक्षीची आई किनाऱ्याजवळ ठेवलेल्या बाकावर बसली. त्यांनी क्षितिजाची काळजी घेण्याबाबत पुन्हा बजावून पिशवीतून मासिक काढून वाचू लागली.
साक्षीला समुद्रात पोहायचे होते. क्षितिजाला पोहण्याच फारसा सराव नव्हता. समुद्रातील लाटांची तिला भीती वाटायची. ती नुसतीच पाण्यात उभी होती. त्यातच साक्षीचं लक्ष तिच्याच वयाच्या चुणचुणीत मुलीकडे गेलं. कुरळे केस, अपरं नाक, गोबरा चेहरा, साक्षीने ओळख करून घेतली. तिचं नाव होतं मोनिका! मोनिकाची आणि साक्षीची चटकन मैत्री जमली. ती खेकडे पकडत आहे हे पाहून कुतूहलानं साक्षी तिच्याजवळ गेली व गप्पा मारू लागली. खेकडय़ांची थोडी माहिती तिला साक्षीकडून मिळाली.
‘मोनिका, पोहायची शर्यत लावू का आपण?’ दोघीजणी पोहत खडकापर्यंत गेल्या. साक्षीचं लक्ष क्षितिजाकडे गेलं. ती त्यांच्या मागे आली नव्हती. लांब एकटीच उभी होती. पण परत आल्यावरही साक्षीनं मोनिकाला का आली नाहीस, ते विचारले नाही.साक्षीनं जवळच्या टेकडीवर जाण्याबाबतची कल्पना मांडली. छोटी क्षितिजा काहीशा नाराजीनंच त्यांच्या मागे निघाली. साक्षी व मोनिकाला टेकडी चढण्याचा सराव असल्यानं त्या भरभर टेकडी चढून वर गेल्या व कुल्फी खात बसल्या.
क्षितिजा टेकडी चढताना दगडाला ठेचकाळून पडली. तिच्या गुडघ्याला लागले. तिला वाटले, साक्षी येईल, पण ती आणि मोनिका केव्हाच टेकडीवर पोहोचल्या होत्या. क्षितिजा जेव्हा तेथे लंगडत गेली तेव्हा त्या मजेत कुल्फी खात होत्या. काय झाले ते क्षितिजाला विचारलेसुद्धा नाही. उलट तिला तेथे पोहोचायला उशीर झाल्याबद्दल दोघी तिला बोलू लागल्या.
क्षितिजाला साक्षीचा फार राग आला. पुन्हा तिच्याबरोबर केव्हाही बाहेर जायचे नाही असे तिने ठरवले. क्षितिजा रडत म्हणाली, तुम्ही दुष्ट आहात. मी एवढी पडले. तुम्ही मला सोडून आलात. तुम्हाला काहीच वाटत नाही? साक्षीच्या मते उलट क्षितिजाच माणूसघाणी. एकलकोंडी होती. ती का नाही गप्पागोष्टीत सामील झाली? मोनिकाबरोबर गप्पागोष्टी करण्यात वेळ मजेत गेला. मला एक नवीन मैत्रीण मिळाली.
आपल्याला जे करण्यात आनंद वाटतो ते जरूर करावे. पण ते करताना आपल्यामुळे कुणावर अन्याय होतोय, दुर्लक्ष होतेय, कुणी दुखावते आहे असे होऊ देऊ नये. त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या आणि स्वत:च्याही नजरेतून उतरतो. आजचा संकल्प : माझ्या आनंदासाठी कुणाला दु:खी करणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com