Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

रांगाच रांगा चोहीकडे
करांचा भरणा करताना नवी मुंबईकर हैराण

नवी मुंबई (प्रतिनिधी) : पाण्याची बिले तसेच मालमत्ता कराचा भरणा करताना नवी मुंबईतील चाकरमान्यांना लांबच्या लांब रांगांमध्ये तिष्ठत राहावे लागू नये, यासाठी मोठा गाजावाजा करत प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्र उभे करण्याचा महापालिकेचा प्रयोग पुरता फसू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. हायटेक महापालिकेची बिरुदावली मिरवत महापालिकेने वेगवेगळ्या करांचा भरणा करताना रहिवाशांना सुविधा प्रश्नप्त व्हाव्यात यासाठी शहरात चार नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे पूर्णत संगणकीकृत असावीत, जेणे करून लोकांचा करांचा भरणा तत्काळ करण्याची सोय व्हावी, असा यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र या नागरी सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

‘आघाडीच्या निर्णयाची वाट पाहू नका’
पनवेल/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होईल किंवा नाही, याविषयी आताच काही बोलता येणार नाही; परंतु या आघाडीच्या निर्णयाची वाट न पाहता, अधिक वेळ न दवडता संघटना बळकट करण्याच्या कामी लागा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नुकतेच येथे कार्यकर्त्यांना केले. बॅ. ए. आर. अंतुले आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार काम करा, असा एकीचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसतर्फे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय ‘संपर्क अभियान’ सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात या अभियानाचा समारोप पनवेल येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. पनवेल नगरपालिकेतील काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्यानंतरच्या सत्तांतराचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकजुटीने राजकारण केले तर सत्ता मिळविणे शक्य आहे; परंतु आघाडी करताना विश्वासाचे वातावरण असणे अत्यावश्यक आहे. पनवेल नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा राजधर्म पाळला नाही, असे ते म्हणाले. माजी नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचे तरुण नेतृत्व जिल्ह्यात पुढे येत आहे, या नेत्याच्या पाठीशी सर्वानी उभे राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. राज्याचे मत्स्य आणि दुग्धविकासमंत्री रवी पाटील यांनीही भाषणात हा धागा पकडत सांगितले की, प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कार्याकाळात विकासकामे करून पनवेलचे रूप पालटले आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती त्यांना नक्कीच मिळेल. या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, जिल्हा प्रभारी नितीन देशपांडे, शाम म्हात्रे, महेंद्र घरत, डॉ. भक्तीकुमार दवे, जयंत पगडे, प्रशांत ठाकूर आदी नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या अनेक विधायक निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत. सरकारचे हे निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान काढण्यात आले, अशी माहिती रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिली.

नवी मुंबई पालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रस्तावास मंजुरी
नवी मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यालयीन कामकाजात गतिमानता व अत्याधुनिकता आणण्याच्या दृष्टीने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान योजनेंतर्गत कार्यालयीन संगणकीकरणाबाबत ई-गव्हर्नन्सचा सर्वंकष प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीने त्यास मान्यता देऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला होता. केंद्र शासनाच्या मंजुरी व नियमन समितीने १५ कोटी ११ लाख रुपयांच्या या प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाचे महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी समितीसमोर सादरीकरण केले.जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या सहा प्रकल्पांपैकी एकात्मिक पाणी योजनेचा २३० कोटी ५२ लाख रकमेचा प्रकल्प, तसेच मलनिस्सारण योजनांचा एकत्रित विकास करण्याचा ३५३ कोटी ६६ लाख रकमेचा प्रकल्प यापूर्वीच मंजूर झाला आहे व त्याचा पहिला हप्तादेखील महापालिकेस प्रश्नप्त झाला आहे.

वीज दरवाढीला शिवसेनेचा विरोध
पनवेल संक्षिप्त
पनवेल/प्रतिनिधी
महावितरण कंपनीतर्फे सुचविण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने कडाडून विरोध केला आहे. कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी याबाबत राज्य विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठविले असून, या प्रस्तावाबाबत हरकती आणि सूचना सुचविल्या आहेत. कंपनीची वीज वितरण व्यवस्था जुनी झाल्याने अनेक शहरांत आणि गावांमध्ये योग्य दाबाने आणि अखंडित वीजपुरवठा होत नाही, याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे. नवीन वीजपुरवठा जोडण्या विलंबाने मिळत असल्याने, तसेच अनेक ग्राहकांना शून्य युनिटची देयके येत असल्याने कंपनीच्या महसुलावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पाश्र्वभूीवर बुधवारी १जुलैला सीबीडी, बेलापूर येथे होणाऱ्या वीज नियामक आयोगाच्या जाहीर सुनावणीत सोमण हे पनवेल परिसरातील वीज ग्राहकांची बाजू मांडणार आहेत.
वाहतूक कोंडी सुटणार?
पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि वाहतूक कोंडी टाळणे यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील मोहोड यांनी नगरपालिकेत नुकतीच एक बैठक आयोजित केली होती.
आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत धिवरे, अनेक नगरसेवक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करावे, महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल बसवावेत, नवीन वाहतूक तळ उभारावेत आदी सूचना आमदारांनी यावेळी केल्या.