Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

ढगांची वातावरणनिर्मिती; मात्र पावसाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / नाशिक

भल्या सकाळपासून आकाशात दाटणारे ढग.. कमालीच्या उष्म्यानंतर वाहणारा आल्हाददायक वारा.. सायंकाळपर्यंत काळ्याभोर ढगांनी वेढले जाणारे संपूर्ण अवकाश.. अशा वातावरणनिर्मितीनंतर पावसाची रिपरिप सुरू होण्यास आणखी काय हवे, हा प्रश्न साहजिकच कुणालाही पडू शकतो. तथापि, सध्या उत्तर महाराष्ट्रातील वातावरणाचा नूर दररोज असा असला तरी पाऊस मात्र ऐनवेळी अंतर्धान पावत असल्याची अनुभूती घ्यावी लागत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे पाठ फिरविली आहे. दररोज केवळ वातावरणनिर्मिती करून तो गायब होत असल्याने शेतकरी व सर्वसामान्यांसह प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.

सुवर्णकारांच्या मागणीविरोधात टपरीधारकांचे प्रतिआंदोलन
प्रतिनिधी / नाशिक

शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या सराफ बाजार परिसरात अतिक्रमणधारकांचा प्रश्न आता अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असून या विषयावरून अलिकडेच आंदोलन छेडणाऱ्या सराफ असोसिएशनला प्रतिशह देण्याच्या उद्देशाने सोमवारी नाशिक जिल्हा हॉकर्स टपरीधारक युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो किरकोळ विक्रेत्यांनी निदर्शने केली. सध्याच्याच जागेत आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धार संबंधितांनी व्यक्त केला.

अंगणवाडय़ांची आबाळ अन् सेविकांची कैफियत
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील अंगणवाडीच्या एखाद्या वर्गात अवघे १५ ते २० विद्यार्थी तर कुठे अक्षरश: छोटय़ा खोलीत कोंबलेली ६० ते ७० मुले, विद्यार्थ्यांना बसायला धड जागा नाही की सतरंजीचाही पत्ता नाही, एवढेच नव्हे तर बिले मंजूर होत नसल्याने अनेक ठिकाणी पोषण आहार बंद झाला असताना दुसरीकडे शैक्षणिक साहित्य व गणवेश आदी बाबींची आबाळ होत असल्याचा अनुभव महापालिकेच्या ४१९ अंगणवाडय़ांमधील तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांना येत आहे. बिकट स्वरूप धारण केलेल्या या प्रश्नाकडे अंगणवाडीच्या मुख्य सेविकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र उपकनिष्ठ बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी नाशिकचा तालिब मिर्झा
हिमाचल प्रदेशात दोन ते सात जुलै या कालावधीत उपकनिष्ठ गटाच्या (१५ वर्षांखालील) राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नाशिकच्या डॉन ब्रेकर्स स्कूलच्या तालिब मिर्झाची निवड करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेत विविध शाळांची नेत्रदीपक कामगिरी
नाशिक / प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत उत्तर महाराष्ट्रात शहर व ग्रामीण भागातील बहुतेक विद्यालयांचे निकाल शंभर टक्के लागले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागही निकालाच्या बाबतीत मागे राहिला नसल्याचे दिसून आले.
नाशिक येथील सी.डी.ओ. मेरी हायस्कूलचा निकाल ९३.१३ टक्के लागला. विद्यालयाचा आकाश कोळी नाशिक विभागात मागासवर्गीयांमध्ये दुसरा आला. विद्यालयातील पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांंमध्ये आकाश कोळी (९५.२३), आकांक्षा कुलकर्णी (९४.३०), अथर्व नांदुर्डीकर (९३.३८), प्रांजल करंकार (९३.०७), अक्षय येवेकर (९२.९२) आणि अस्मिता शिरूडे (९२.९२) यांचा समावेश आहे.

‘आयडियल’ सई कावळे
वाढत्या गंभीर गुन्हेगारीखाली नाशिक शहर होरपळत असताना त्याच्यावर वक्तव्य वा प्रतिक्रिया देऊन योग्य दिशा देण्याचा भार खरं तर समाजधुरीणांवर. अशा अभूतपूर्व प्रसंगी एका शाळकरी मुलीने नाशिकचा बिहार तर होत नाही हे वाचून व्यथित होणे आणि तितकेच महत्वाचे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्राकडे लगेचच धाव घेणे आणि अतिशय ऱ््हदयद्रावक, सुंदर असे पत्र लिहिणे हे सारेच फार आदर्श आहे. मोठमोठे लोक समाजाला मार्गदर्शन करू शकणार नाहीत, असे एका लहान सई कावळे नावाच्या मुलीने एक पत्राव्दारे, कदाचित प्रभावीपणे केले. तिचे हल्लीच्या ‘माहोल’मध्ये अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

मुलांचे भावविश्व
उच्चपदस्थ !

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोग तज्ज्ञ व बाल-आहरतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेणार आहेत..

राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
नाशिक / प्रतिनिधी

युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापनानिमित्त राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्काराने समाजसेवकांना, मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,पर्यावरण, योगा, क्रिडा, अपंग इत्यादी क्षेत्रात वैशिष्ठ्यपूर्ण सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींनी, संस्थांनी आपापले परिपूर्ण प्रस्ताव ३० ऑगस्ट २००९ पर्यंत मा. सेक्रेटरी अच्युतराव गंगाधर कुळकर्णी, २- ३५, हौसिंग बोर्ड सोसायटी, दिंडोरी रोड, पंचवटी, नासिक-४२२००३. (महाराष्ट्र), दूरध्वनी (०२५३)२५१८५३० व ९७६३३४०३९९, ९४२२२५५९८५ या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन संस्थेने केले आहे.

लक्ष्मीबाई बोबडे यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

सिडकोतील गणेश कॉलनीमधील भास्कर बोबडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई फकिरा बोबडे यांचे (८२) नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.