Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

सोनिया गांधींच्या हस्ते लोकार्पण सोहळा
मालेगावच्या अद्ययावत रुग्णालयाचे आज उद्घाटन

प्रल्हाद बोरसे

सप्टेंबर २००६ मध्ये येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींना मदतीच्या रुपाने शासनाकडून वाटले जाणारे धनादेश चांगल्या सरकारी रुग्णालया अभाावी व्यवस्थित उपचार न मिळू शकल्याच्या कारणावरून दस्तुरखुद्द काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांना परत करीत मृतांच्या आप्तांनी रोष व्यक्त केल्यानंतर विद्युत वेगाने मंजुरी मिळालेल्या येथील २०० खाटांच्या अद्ययावत सामान्य रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी होत आहे. विशेष म्हणजे, सोनिया गांधी यांच्याच हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त दिमाखदार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.

धुळ्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वार्ताहर / धुळे

दंगल, रॉकेल, गॅस आणि डांबराचा काळाबाजार, चोऱ्या अशा विदारक स्थितीतून सध्या जिल्ह्य़ाचा प्रवास सुरू असून या परिस्थितीतून शहर व जिल्ह्य़ास बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून विशेष प्रयत्न होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

धुळे महापालिकेत सोमवारचा दिवस सत्ताधारी व विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजला. स्थायी समितीने वॉटरपार्कसाठी आरक्षित १५३ क्रमांकाच्या भूखंडावर अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारणीसाठी निविदा मागविण्याविषयी बैठक आयोजित केली होती. शिवसेना सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावास विरोध करताना वॉटरपार्कसाठी आरक्षित भूखंडावर अ‍ॅम्युझमेंट पार्कची काय गरज, असा सवाल उपस्थित केला. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांतर्फे ही खेळी खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता स्थायी समितीचे सभापती सतीश महाले यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सेना सदस्यांनी महापालिकेबाहेर प्रस्तावाची प्रत जाळत निषेध व्यक्त केला. सभापतींच्या दालनास कुलूप लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
छाया : मनेश मासोळे

जळगाव येथे तरणतलावात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
वार्ताहर / जळगाव

येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील तरण तलावात एका विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यूस क्रीडा संकुल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. क्रीडा संकुलातील तरण तलावात शहरातील मण्यार मोहल्ला परिसरात राहणारा शेख अबूबकर शेख कादर मित्रांसह पोहोण्यासाठी गेला. दोन फेऱ्या पोहून झाल्यानंतर तिसऱ्या फेरीच्या वेळी सात फूट खोल असलेल्या तलावात तो बुडाला. तो पाण्यातून वर न आलेला पाहून त्याचे मित्र तेथून पसार झाले. मात्र तेथील रक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात नेले. तथापि, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला होता. पालक मंत्र्यांनी समजूत घातल्यानंतर संबंधितांनी मृतदेह ताब्यात घेतला.

ट्रकखाली सापडून बालिका ठार
मनमाड, २९ जून / वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ चांदवड रस्त्यावर एका कांद्याच्या खळ्यामध्ये ट्रक घुसल्याने दीड वर्षांची कविता सजन गंजे ही सटाणा तालुक्यातील लखमापूरची मुलगी चिरडली गेली. या प्रकाराने संतप्त झालेल्या कांद्याच्या खळ्यावरील मजुरांनी नगरसेवक साईनाथ गिडगे व मल्हार सेनेचे मच्छिंद्र बिडगर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास चांदवड रस्ता रोखून धरला.
मेंढपाळांनी मेंढय़ांसह रस्त्यावर बैठक मारल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक तासभर ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून ट्रक चालकास ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. संबंधित ट्रक शहर पोलिसांनी ताब्यात घेतला.

मनमाड पालिका शिक्षण मंडळ सभापतीपदी नबिद शेख
मनमाड, २९ जून / प्रतिनिधी
मनमाड नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी काँग्रेसचे नबिद अफजल शेख यांची तर उपसभापतीपदी रिपाइंच्या पुष्पलता मोरे यांची अविरोध निवड करण्यात आली.
पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या उपस्थितीत शिक्षण मंडळ सदस्यांची सभा झाली. नियोजित वेळेत शेख व मोरे या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेला पॅटर्न शिक्षण मंडळासाठी वापरण्याचे ठरले असून आवर्तनाप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं व अपक्ष याप्रमाणे सर्वाना संधी देण्यात येणार आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अफजलभाई शेख यांचे नबिद हे पुत्र आहेत.