Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

शहरात उद्यापासून तीस टक्के पाणीकपात
पुणे, २९ जून / खास प्रतिनिधी

पावसाने जून महिना ओलांडला तरी दमदार हजेरी न लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठय़ावर मोठा परिणाम झाला असून खडकवासला धरण प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्याने शहराच्या पाणीपुरवठय़ात येत्या १ जुलैपासून तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कपात लागू केल्यामुळे शहराला १५ जुलैनंतरही पाणी मिळू शकणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या फक्त ०.६८ अब्ज घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी शहराला १५ जुलैपर्यंत कसेबसे पुरेल एवढेच आहे.

पालखी सोहळ्यासाठी उजनीतून पाणी सोडले
पुणे, २९ जून / खास प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार असल्याने वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनी धरणातून आज भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. येत्या ३ जुलै रोजी असलेल्या आषाढी एकादशीपर्यंत हे पाणी पंढरपुरी पोहोचेल यादृष्टीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहे. या धरणाची साठवण क्षमता ११७ अब्ज घनफूट एवढी आहे आणि उपयुक्त पाणीसाठा ५३ अब्ज घनफूट एवढा आहे. उपयुक्त पाणीसाठय़ापेक्षा कमी म्हणजे धरणात सध्या उणे १० टक्के पाणी शिल्लक आहे. पालखी सोहळ्याला लाखो वारकरी पंढरपूरला येतात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीतून दीड हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पंढरपुरी पोहचण्यास दोन दिवस लागतात.

आत्यंतिक काटकसरीने पाण्याचा वापर करा !
महापालिका आयुक्तांचे आवाहन
पुणे, २९ जून/प्रतिनिधी
लांबलेला पाऊस आणि पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून स्वयंस्फूर्तीने पाण्याची काटसकर करणे हाच एकमात्र उपाय आता शिल्लक राहिला आहे. या अभूतपूर्व परिस्थितीचा विचार करून पुणेकरांनी पाण्याची आत्यंतिक काटसकर करावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

नदी बुजविण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू
पुणे, २९ जून / प्रतिनिधी

संगमवाडी येथील नदीचे पात्र बुजविण्याच्या प्रकाराबाबत महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून अधिकाऱ्यांवर ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त उमाकांत दांगट आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी ही कारवाई सुरू केली आहे. ‘

परदेशी शिक्षणातील एजंटगिरीला आता आळा घालणार
केंद्रीय मंत्री वायलर रवी यांची माहिती
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी
अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमानंतर घसघशीत पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून परदेशी संस्थांमध्ये विद्यार्थी भरती करणाऱ्या बोगस एजंटगिरीला केंद्र सरकार आता आळा घालणार आहे. देशोदेशीची विद्यापीठे व शिक्षण खात्याला या एजंटगिरीबद्दल धोक्याची सूचना देण्यात आली असून, लवकरच कडक कायदाही केला जाणार आहे.

पुण्यातील अभिमत विद्यापीठांचे प्रस्ताव रखडणार?
पुणे, २९ जून/खास प्रतिनिधी

अभिमत विद्यापीठांवर ताशेरे ओढत त्यांच्या कार्यपद्धतीचा फेरआढावा घेण्याचा आदेश मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी जारी केल्याच्या पाश्र्वभूमीवर अभिमत विद्यापीठांसाठीचे राज्यातील सर्वच्या सर्व २४ प्रस्ताव रखडण्याची चिन्हे आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सर्वाधिक ११ प्रस्तावांचा यात समावेश आहे.

पिंपरी कॅम्पातील अनधिकृत बांधकामावरून सभागृहात गदारोळ
राजकीय दबावामुळे कारवाईचा फक्त ‘शो’
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
पिंपरीतील जय मोबाईल शॉपीच्या अनधिकृत बांधकामावरून पालिका सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला. सेवा विकास बँकेच्या राजकारणातून काँग्रेसच्या एका नगरसेवकाने हे बांधकाम पाडण्याची मागणी करीत प्रचंड थयथयाट केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास पाठबळ दिल्याने अवघ्या तासाभरात हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. िपपरी पालिकेच्या इतिहासात प्रशानसनाने एवढी तत्परता प्रथमच दाखविली आहे.

कचरा समस्या सोडविण्यासाठी हडपसर परिसरात ७८ प्रकल्प
प्रकल्प राबविणाऱ्यांना मिळकतकरात सवलत
हडपसर, २९ जून / वार्ताहर
येथील कचरा समस्या सोडविण्यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ७८ प्रकल्प सुरू करण्यात आले असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी माधव देशपांडे यांनी सांगितले.बायोगॅस, गांडूळखत प्रकल्पधारक आणि सोलर यंत्रणाधारकांना प्रत्येकी पाच टक्के सवलत पालिका देत असते, याचा नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

‘कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी शेअर बाजारात गुंतवण्यास विरोध’
आयटक, टीयूसीसी आंदोलनाच्या पवित्र्यात
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीची एक लाख ३० हजार कोटी रुपयांपैकी १५ टक्के रक्कम शेअरबाजारात गुंतवण्याचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत होणार असून हा प्रस्ताव मंजूर केल्यास नागरी हक्क सुरक्षा समिती तीव्र विरोध करेल असा इशारा अध्यक्ष मानव कांबळे यांनी दिला.

पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग
आमदार छाजेड यांच्यासाठी कलमाडींचा आग्रह
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरूकेल्याने राजकीय वर्तुळात याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार चंद्रकांत छाजेड यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असून, त्यांच्यासाठी खासदार सुरेश कलमाडी यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला असल्याचे समजते.

पिपरीत अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली
एकाच दिवशी दोन सभा तहकूब
पिपरी, २९ जून / प्रतिनिधी
पिपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन करताना पालकमंत्री अजित पवार यांनी कृपाकरून पालिका सभा तहकूब करणे बंद करा, असे आदेश नगरसेवक तसेच पालिका पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अवघ्या आठच दिवसात या आदेशाला केराची टोपली दाखवित सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या सभा तहकूब करून अनोख्या पध्दतीने नव्या सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात केली.

आई-वडिलांसह पत्नीला अकरा लाखांची भरपाई
पुणे, २९ जून / प्रतिनिधी
अपघातात नीलेश डागा (वय २७, रा. सिंहगड रोड) यांच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांचे आई- वडील यांना नऊ लाख ८८ हजार रुपये, तसेच पुनर्विवाह केलेल्या पत्नीला सव्वालाख रुपये अशी अकरा लाख १३ हजार रुपयांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे.नीलेश डागा यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. त्यातून एक लाख ४४ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न होते. २४ मार्च २००३ रोजी ते दुचाकीवरून दुकानात जात होते. सकाळी नऊ वाजता सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथे सिग्नलला थांबले असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक मारली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. डागा यांचे वडील बद्रीनारायण डागा (वय ६१) आणि आई गंगादेवी (वय ५५) यांनी नीलेशच्या मृत्यूबद्दल पंधरा लाख रुपये मिळण्याचा दावा दाखल केला होता. न्यायाधीकरणाचे अतिरिक्त सदस्य आर.एम. जोशी यांनी सदर दावा अंशत: मान्य करून नीलेशच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या ट्रक चालक, मालक व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी या सर्वानी मिळून ही रक्कम २८ एप्रिल २००६ पासून नऊ टक्के व्याजाने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. डागा यांच्या वतीने अ‍ॅड. लिखित गांधी यांनी बाजू मांडली.

‘नारायण राणेंना कोणी अवजड होऊ शकत नाही’
पुणे, २९ जून/प्रतिनिधी
आमच्यामध्ये राहून कितीजणांनी अवजड उद्योग केले हे आम्हाला माहिती आहे. मात्र नारायण राणेंना कोणी अवजड होऊ शकत नाही, असा इशारा खासदार नीलेश राणे यांनी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव न घेता गुरुवारी दिला.स्वराज्य युवा ब्रिगेड संघटनेच्या पुण्यातील शुभारंभप्रसंगी तसेच लोकसभेवर निवडून आल्याबद्दल सत्कार स्वीकारण्यास राणे पुण्यात आले होते. या प्रसंगी जिल्ह्य़ातून मोठय़ा संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. राणे म्हणाले की, राजकारण करायचे असेल तर प्रथम समाजकारण कर असा सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला होता. त्यानुसार मी गेली साडेचार वर्षे समाजकारण करीत होतो. लोकसभेची निवडणूक जिंकून देणाऱ्या कोकण जनतेचे सोने करणार असून, आता या मतदारसंघातून ३५ वर्षे मला कोणी हलवू शकणार नाही, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

‘आरोग्यसेवेचे खासगीकरण हवे’
पुणे, २९ जून / खास प्रतिनिधी

जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारी व खासगी आरोग्यसेवेचे खासगीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त केले. ‘एचआयव्ही’ची लागण झालेल्या बालकांचे आरोग्य व ‘एआरटी’ औषधोपचार या विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रयास या संस्थेच्या पुस्तिकांचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. लोकसभेवर निवडून गेल्यानंतर सुळे पुणे शहर व परिसरातील विविध शैक्षणिक-सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील संस्थांना भेटी देत आहेत. त्या अंतर्गतच प्रयास संस्थेला त्यांनी भेट दिली. प्रयासच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या १९ जिल्ह्य़ांमधील कार्यकर्त्यांशी सुळे यांनी या वेळी चर्चा केली. लोकप्रतिनिधी या नात्याने शिक्षण, आरोग्य, समाजकारणातील प्रश्न दिल्लीदरबारी उठविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे सुळे यांनी या वेळी सांगितले. त्याचप्रमाणे खासगी व सरकारी आरोग्यसेवांचे जनतेच्या हिताच्या दृष्टीने एकत्रीकरण करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हाजयात्रेसाठी विनाविलंब पोलीस अहवालाची सूचना
पुणे, २९ जून / खास प्रतिनिधी
हाज यात्रेसाठी मक्का व मदिना येथे जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंना पासपोर्टसाठी विनाविलंब पोलीस अहवाल (व्हेरिफिकेशन) देण्यात यावा, अशी सूचना गृह विभागाने केली आहे. हाज यात्रेला जाणाऱ्यांचा पोलीस पडताळणी अहवाल पासपोर्ट कार्यालयात तत्काळ पाठविण्यात यावा असेही विभागाने स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. सलीम शेख यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव पी. के. जैन यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी पोलीस पडताळणी अहवालासाठी दिरंगाई होत असल्याने अनेक यात्रेकरूंना हाज यात्रेला मुकावे लागते ही बाब निदर्शनास आणली. तसेच पोलीस पडताळणी अहवाल तत्काळ दिले जावेत, अशी मागणी केली.या मागणीनुसार गृह विभागाने हाज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे पोलीस पडताळणी अहवाल तातडीने द्यावेत असे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.

लोणावळ्यात अज्ञात व्यक्तीचा खून
लोणावळा, २९ जून/वार्ताहर
सहानी रोडवरील गौतम हॉटेलच्या मागील रिकाम्या, पडक्या सोसायटीत एका अज्ञात इसमाचा खून झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे आहे.
गौतम हॉटेलमागील पडक्या सोसायटीत तेथील वॉचमन लाईट बल्ब लावण्यासाठी गेला असता बंगल्यात काही तरी पडलेले आढळले. ते पाहण्यासाठी तो आत गेला असता तेथे एक ३५ वर्षीय तरुणाचा कोणीतरी खून केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. खून झालेल्या तरुणाच्या मानेवर, तोंडावर, उजव्या हातावर सत्तूरने वार केले असून, दरवाजामागे सत्तूर सापडला आहे. हा खून दोन दिवसांपूवी झाला असावा. या ठिकाणावरील वॉचमन कुटुंब फरार झाले आहे.

असंघटित कामगारांसाठी जागरण मोहीम परिषदा
पुणे, २९ जून/प्रतिनिधी
हमालांच्या पाठीवरील पोत्याचे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त नसावे, त्यांना माथाडी कायद्याचे संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी असंघटित कामगार जागरण मोहीम परिषदांचे आयोजन एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. तसेच, येत्या नऊ ऑगस्ट रोजी सर्व बाजारपेठा बंद ठेवून ऑगस्ट क्रांती मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.

तेलाचे राजकारण समजावून घेण्याची गरज - गिरीश कुबेर
पुणे, २९ जून/प्रतिनिधी
तेलाचा विषय राजकारणाशी निगडीत आहे. अमेरिका आणि जगाच्या अर्थकारणाचा तो अविभाज्य घटक आहे. त्यातूनच दहशतवादाची निर्मिती झाली. म्हणूनच प्रत्येकाने तेलाचे राजकारण समजावून घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली. ‘साहित्यदर्शन’ संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे सभागृहात सुवर्ण महोत्सवी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्या निमित्ताने ‘एका तेलियाने’ या विषयावर श्री. कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘दाभोळ येथील एन्रॉन प्रकल्पासाठी दुय्यम दर्जाची यंत्रसामग्री देणार होतो अशी कबुली, एन्रॉन कंपनीने नुकतीच दिली. म्हणजे हा प्रकल्प सुरू झाला असता तर वीज मंडळ, शासन आणि छोटय़ा मोठय़ा गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असती. प्रसारमाध्यमांनी अशा विषयांचा सखोल अभ्यास करून त्याचे निष्कर्ष वेळीच जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे.’ ‘साहित्यदर्शन’चे गणेश लोंढे, रवींद्र कासार यांनी स्वागत केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

जकातचोरी करणाऱ्या वाहनांकडून २४ लाखांची दंडवसुली
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरारी पथकाने दोन आठवडय़ात जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत संबंधितांकडून सुमारे २४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.जकात विभागाचे मुख्य अधीक्षक अशोक मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. १५ ते २८ जून दरम्यान शहरातील विविध भागात जकात चुकवून जाणारे सुमारे १३ प्रकार उघडकीस आले. मुंडे यांच्यासह सहायक अधीक्षक पी. बी. फुगे, उपजकात अधीक्षक सुरेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केलेल्या कारवाईत २३ लाख ६९ हजार ३४३ रुपये दंड वसूल करण्यात आला. काळेवाडी, थेरगाव, लांडेवाडी, भोसरी, मोरवाडी, िपपरी कॅम्प, कासारवाडी, कुंदननगर, मोशी, एमआयडीसी आदी भागातून जकात चुकवून निघालेल्या मोटारी भरारी पथकाच्या वतीने पकडण्यात आल्या. यापैकी बहुतांश सराईत जकातचोर आहेत. जागरुक नागरिकांकडून माहिती मिळाल्याने या मोटारी पकडणे शक्य झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.

नाल्यात मृतदेह आढळल्याने भोसरीत खळबळ
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
भोसरी येथील शंकर मंदिराशेजारील नाल्यात आज दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी परिसरातील संत तुकारमनगर गार्डन मंगल कार्यालयाशेजारी शंकराचे मंदिर आहे.या मंदिराच्या शेजारुन नाला वाहतो.या नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याचे स्थानिक रहिवाशांनी कळविले.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे ५५ वर्षे वय असलेल्या व्यक्तीचा मृतदेह नाल्यात पडलेला होता.शंकर मंदिराच्या शेजारी कट्टय़ावर चष्मा व पादत्राणे आढळून आली.या वस्तू मृत पावलेल्या व्यक्तिच्याच असून तो मंदिराच्या कट्टयावर झोपलेला असताना झोपेतच नाल्यामध्ये पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

पिंपरी पालिकेस स्वच्छतेचे चार लाखांचे पारितोषिक
पिंपरी, २९ जून / प्रतिनिधी
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या २००७-२००८च्या स्पर्धेतिपपरी-चिंचवड महापालिकेच्या ब आणि ड प्रभागास मिळून चार लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते महापौर अपर्णा डोके यांनी बक्षिसाचा धनादेश आणि प्रमाणपत्र स्वीकारले. पालिकेतील ब प्रभागास एक लाख आणि ड प्रभागास तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. पालिकेच्या वतीने महापौर डोके यांच्यासह प्रभाग अध्यक्ष हरिभाऊ तिकोणे, नगरसेवक राजेंद्र साळुंके, प्रभाग अधिकारी दिलीप गावडे, विश्वास भोसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. चव्हाण यांनी धनादेश व प्रमाणपत्र स्वीकारले. याप्रसंगी सहायक आरोग्याधिकारी बी. एस. नामपूरकर, जे. एन. देवकर, के. सी. लोंढे आदी उपस्थित होते.

वाणिज्य संधी बाबत मार्गदर्शन
पुणे, २९ जून / प्रतिनिधी

बारावीनंतर वाणिज्य विभागातील प्रत्येक विषयाचा आशय, त्या विषयापासून होणारा फायदा तसेच त्यानंतर मिळणाऱ्या नोकरी व्यवसायाच्या संधी विद्यार्थ्यांना समाजाव्यात म्हणून हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.चर्चासत्रे परिसंवाद याचा यात समावेश आहे.

वेबसाईटचे उद्घाटन
पुणे, २९ जून/प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक व वेतन भविष्यनिर्वाह निधी पथक यांच्यामार्फत वेबसाईटचे उद्घाटन पुणे विभागाचे उपसंचालक गंगाधर म्हमाणे यांच्या हस्ते करण्यात आले.अधिक माहितीसाठी www.payunit.pune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केले आहे.या वेबसाईटवर शाळांच्या माहितीचा समावेश करण्यात आला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

ठोकळ जन्मशताब्दीनिमित्त बुधवारपासून व्याख्यानमाला
पुणे, २९ जून / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक ग. ल. ठोकळ यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष असून ठोकळ यांच्या कारकीर्दीचा वेध घेणारी व्याख्यानमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केली आहे.
‘मसाप’ च्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायं. सहा वाजता १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे. १ जुलैला ग. ल. ठोकळ यांच्या कवितांवर डॉ. आनंद यादव यांचे व्याख्यान तर त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन स्वाती महाळंक करणार आहेत. डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांचे २ जुलैला ‘कादंबरीकार ठोकळ’ या विषयावर व्याख्यान होईल.
३ जुलैला ‘ग. ल. ठोकळ यांची कथा’ या विषयावर ह. मो. मराठे यांचे तर ४ जुलैला ह. ल. निपुणगे यांचे ‘विसाव्या शतकातील प्रकाशन व्यवसायात ग. ल. ठोकळ यांचे स्थान’ यावर व्याख्यान होईल.

प्रवीण दवणे यांचे रविवारी व्याख्यान
पुणे, २९ जून / प्रतिनिधी
साहित्यदर्शन पुणे आणि नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या ‘मैत्रबन’ या पुस्तकाच्या निमित्ताने ‘माझ्या लेखनाची आनंदयात्रा’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘हे शहरा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन हुतात्मा विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रीकांत चौघुले सूत्रसंचालन करणार आहेत. रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘साहित्यदर्शन’चे सुवर्णमहोत्सवी ग्रंथ प्रदर्शन १९ जुलैपर्यंत आचार्य अत्रे सभागृहात सुरू राहणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या पाच साथीदारांना अटक
पुणे, २९ जून / प्रतिनिधी

कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या आणखी पाच साथीदारांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. गायवळ टोळीचा सूत्रधार निलेश गायवळ याच्यावर बारा जून रोजी गोळीबार केल्याच्या आरोपावरून मारणे टोळीतील या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याण विठ्ठल ऊर्फ ज्योतिबा कांबळे (वय २७), स्वप्नील दिलीप ऊर्फ पप्पू ऊर्फ येडा तोंडे (२१), संतोष रूपेश अखडे (२२), अतुल लक्ष्मण जगताप (२०) आणि रूपेश मारणे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आनंता कदम, पप्पू कुडले या त्याच्या दोन साथीदारांना कोथरूड पोलिसांनी नुकतीच अटक केली होती.