Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

क्रीडा

विल्यम्स भगिनी उपान्त्यपूर्व फेरीत; फेडरर विजयी
विम्बल्डन, २९ जून/पीटीआय

अमेरिकेच्या सेरेना व व्हीनस विल्यम्स या भगिनींनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी विजेत्या रॉजर फेडरर यानेही उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. द्वितीय मानांकित सेरेना हिने एकतर्फी लढतीत स्लोवाकियाच्या डॅनिएला हन्तुचोव्हा हिचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडविला. यंदा प्रत्येक फेरीनंतर खेळात परिपक्वता दाखविणाऱ्या सेरेना हिने परतीच्या वेगवान फटक्यांचा उपयोग करीत पहिल्या सेटमध्ये हन्तुचोव्हाची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले.

वेस्ट इंडिजचा भारतावर सहज विजय
रामपॉलने उडविली भारताची भंबेरी * वेस्ट इंडिजची मालिकेत बरोबरी
किंग्स्टन, २९ जून/ पीटीआय
कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज रवी रामपॉल आणि यष्टीरक्षक दिनेश रामदिन यांच्या चमकदार
कामगिरीमुळे भारतीय फलंदाजांच्या तोडांतून ‘हे राम’ असे शब्द निघाल्या शिवाय राहिले नसतील. खेळपट्टीचा अंदाज नसलेल्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना १८८ धावाच करता आल्या आणि वेस्ट इंडिजने हे आव्हान आठ विकेट्स राखून सहज पार केले.

अखेर खेळाडूंना मिळाली पारितोषिकांची रक्कम; वीरधवलला ४७ लाख
पुणे, २९ जून / क्री. प्र.

महाराष्ट्राच्या खेळाडूंना रोख पारितोषिके व विविध क्रीडा पुरस्कार क्वचितच वेळेवर दिले जातात. त्यामुळेच अनेक खेळाडू अन्य राज्यांच्या संघाकडून खेळण्यास सुरुवात करतात. त्यांची ही तक्रार टाळण्यासाठी पदक विजेत्या खेळाडूंना पारितोषिकाची रक्कम ३० जूनपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते आणि ते त्यांनी पाळले. आज पदक विजेत्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे बक्षिसांचे धनादेश देण्यात आले. महाराष्ट्रातील खेळाडूंना २ कोटी ३४ लाख ९० हजारांची बक्षिसे देण्यात आली. पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्रातील खेळाडूंना १० लाख, रौप्यपदकविजेत्यांना सात लाख तर कांस्यपदकविजेत्यांना पाच लाखांची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. पण ती त्यावेळी न मिळाल्याने खेळाडूंत नाराजीचे वातावरण होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बचावार्थ हितचिंतक एकत्र
मुंबई, २९ जून/ क्री.प्र.
मुंबई क्रिकेट असोसिएशन एक नावापुरती संघटना शिल्लक असून त्यांच्या गाठीशी काहीच शिल्लक राहिलेले नाही. आहे ते सर्व विकून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत मुंबई क्रिकेटच्या संरक्षणार्थ काही क्रिकेटप्रेमींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या निवडणुकीत मुंबई क्रिकेट संघटनेच्या बचावासाठी निवडणूक लढविण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली असून आज मुंबईत अशा ६० ते ६५ जणांची एक बैठक झाली. माजी कसोटी क्रिकेटपटू, पंच, पदाधिकारी आदी सदस्यांनी आज निवडणुकीत उभे राहण्याबाबत चाचपणी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशन विकण्यात आल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. वानखेडे स्टेडियम गरवारेला, आयपीएलला आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील मनोरंजन केंद्र, शिर्के आणि कंपनीला आंदण दिल्याचा आरोप उपस्थितांनी केला. मुंबईच्या ज्युनियर क्रिकेटची अवस्था खालावली आहे. संघनिवडीतील भ्रष्टाचार वाढत चालला आहे. स्पर्धा वेळापत्रकानुसार न होता मे महिन्यांपर्यंत लांबविल्या जातात. एकाच दिवशी चक्क ४-४ स्पर्धादेखील उरकण्याचा उच्चांक केला जातो. एवढे विस्कळीत आयोजन यंदा केले गेले. मैदानाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरी निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध लढा देण्यासाठी उभे राहण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक येत्या १० जुलै रोजी होत असून यावेळी सत्ताधारी गटाला प्रखर विरोधाचा सामना करावा लागेल, अशीच चिन्हे सध्या सुरू असलेल्या हालचालींवरून दिसत आहेत.

मुंबई क्रिकेट असो.च्या उपाध्यक्षपदाचा रवी सावंत यांचा राजीनामा
मुंबई, २९ जून/ क्री.प्र.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कायदेविषयक उपसमितीचा सल्ला कार्यकारिणीमध्ये मंजूर केल्यानंतरही तो निर्णय
बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ सावंत यांनी राजीनामा दिल्याचे कळते. रवी सावंत यांनी राजीनामा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठविल्याचेही वृत्त आहे. येत्या १० जुलै रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक होणार असल्याने त्या पाश्र्वभूमीवर रवी सावंत यांच्या राजीनाम्याला अधिक महत्त्व प्रश्नप्त झाले आहे. रवी सावंत हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एक ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. त्यांनी सदस्यपदापासून संघटनेचे कोषाध्यक्ष व उपाध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे अनेक वर्षे सांभाळली आहेत. कायदेविषयक सल्ला देणाऱ्या समितीचा निर्णय कार्यकारिणीत मंजूर झाल्यानंतर तो काही व्यक्तींच्या आग्रहास्तव फिरविण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी पद सोडल्याचे बोलले जात आहे.

अव्वल स्थानावर पोहोचण्याची घाई नाही - सायना
हैदराबाद, २९ जून / वृत्तसंस्था

बॅडमिंटनमधील अव्वल मानांकित खेळाडू बनण्याची मला मुळीच घाई नाही. मात्र या वर्षाअखेर जगातील पहिल्या पाच बॅडमिंडनपटूंमध्ये माझासमावेश व्हावा, अशी माझी इच्छा असल्याचे सायना नेहवाल हिने म्हटले आहे. मलेशियाहून परतल्यानंतर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सायना म्हणाली,की इंडोनेशियन सुपर स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असले, तरी लगेच अव्वल मानांकित खेळाडू बनण्याचे ध्येय मी ठेवलेले नाही. या वर्षाअखेरीपर्यंतपहिल्या पाच क्रमांकांत आपला समावेश व्हावा, असे ध्येय मी ठेवले आहे. पहिल्या पाच खेळाडूंत समावेश होण्याचे ध्येय साध्य करण्याला माझे सध्या प्रश्नधान्यराहणार आहे. आता मी ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची तयारी करण्याकडे लक्ष केंद्रीत करणार आहे.त्या स्पर्धेनंतर तैपेई आणि मकाऊ येथील स्पर्धात मी खेळणार आहे.या स्पर्धेत चांगली कामगिरी करून पहिल्या पाच खेळाडूंमध्ये येण्याचे माझे उद्दिष्टसाध्य होईल, असा विश्वासही सायनाने व्यक्त केला. इंडोनेशियन सुपर स्पर्धेचे विजेतेपद पटकाविल्यामुळे सायनाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. अव्वल मानांकनपटकाविणे अवघड असले, तरी अशक्य नाही. अव्वल मानांकन मिळविण्यासाठी तुम्हाला सातत्याने विजय मिळवावे लागतात. त्यादृष्टीने विचारकरता तशी कामगिरी करण्यास अजून थोडा अवधी लागेल, असे ती म्हणते. इंडोनेशियन सुपर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यावर माझा अजूनही विश्वासबसत नाही. माझ्या दृष्टीने हे विजेतेपद म्हणजे फार मोठी कामगिरी आहे, असे ती म्हणाली.

अमेरिकेला नमवित ब्राझीलने पटकाविला कॉन्फेडरेशन चषक
जोहान्सबर्ग, २९ जून / एपी
ब्राझीलने आपल्या नेहमीच्या शैलीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेचा ३-२ असा निसटता पराभव करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील ‘गोल्डन बूट’ पटकाविणाऱ्या लुईस फॅबियानोने सामन्यात दोन गोल केले. अमेरिकेला
पराभव स्वीकारावा लागला तर ‘फिफा’ च्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची करामत त्यांनी करून दाखविली.

वॉनच्या निवृत्तीची घोषणा आज
लंडन, २९ जून/ए.एफ.पी.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन उद्या (मंगळवारी) सीनियर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या अ‍ॅशेस मालिकेच्या संभाव्य संघातून वॉनला वगळण्यात आल्यामुळे त्याच्या भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. वॉन आपल्या निवृत्तीची घोषणा उद्या एजबस्टन येथे वार्ताहर परिषद घेऊन करणार असल्याचे वृत्त इंग्लंड अ‍ॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने दिल्याची माहिती काल ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिली होती. उद्या एजबस्टन येथे इंग्लंड संघ अ‍ॅशेस मालिकेच्या तयारीसाठी वॉर्विकशायरविरुद्ध एक सराव सामना खेळणार आहे. चार वर्षापूर्वी याच एजबस्टन मैदानावर वॉनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियावर दोन धावांनी सनसनाटी विजय मिळविला होता. त्याच विजयामुळे इंग्लंड संघाने १९८६-८७ नंतर प्रथमच अ‍ॅशेस मालिका २१ अशा फरकाने जिंकण्याचा पराक्रम केला होता. अ‍ॅशेस मालिका विजय हा वॉनच्या कारकिर्दीतील परमोच्च बिंदू असला तरी सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला महिनाभर क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. शिवाय २००२-०३ च्या मालिकेतील त्याचा फलंदाजीचा फॉर्मही सध्या राहिलेला नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका गमावल्यानंतर वॉनने साश्रू नयनांनी कर्णधारपदाचा त्याग केला होता व त्यानंतर तो पुन्हा इंग्लंड संघात येऊ शकलेला नाही. कर्णधारपदाच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत २६ विजय, ११ पराभव तर १४ लढती बरोबरीत सोडविण्यात यश मिळविणारा वॉन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. निव्वळ धावांच्या पाठबळावर संघात पुन्हा परतण्याच्या वॉनच्या प्रयत्नांना मात्र सध्या खीळ बसली होती, कारण यॉर्कशायर संघासाठी कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला सात डावांत केवळ १४७ धावाच करता आल्या आहेत. दरम्यानच्या काळात रवी बोपाराचा फलंदाज म्हणून झालेला उदय हादेखील वॉर्नच्या अस्ताला कारणीभूत ठरला आहे. बोपाराने या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सलग तीन शतके ठोकली होती.

सुशीलकुमार, राहुल आवारेला सुवर्ण
जर्मन ग्रां प्रि कुस्ती
नवी दिल्ली, २९ जून / पीटीआय

वाढलेल्या वजनामुळे थायलंड येथील स्पर्धेला मुकलेल्या भारताच्या सुशीलकुमारने जर्मन ग्रां प्रि कुस्तीत मात्र दिमाखाने सुवर्णपदक पटकाविले. डॉर्टमंड येथे झालेल्या या फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन स्पर्धेत त्याने ही कामगिरी करून दाखविली. सुशीलकुमारसह महाराष्ट्राच्या राहुल बाबासाहेब आवारे यानेही सुवर्णपदक विजेती कामगिरी करून दाखविली. ५५ किलो गटात त्याने बाजी मारली. भारताने एकूण पाच पदकांची कमाई या स्पर्धेत केली. त्यात दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सुशीलकुमारने ६६ किलो गटात फ्रीस्टाइल प्रकारात ही अव्वल कामगिरी केली. राजीव तोमरने १२० किलो गटात फ्रीस्टाइल प्रकारामध्ये रौप्यपदकाची कमाई केली. तर रवींदर सिंग आणि रमेश कुमार यांनी अनुक्रमे ६० व ७४ किलो गटात कांस्यपदकांची कमाई केली. गेल्या महिन्यात सुशीलकुमारला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेला वजनाच्या समस्येमुळे मुकावे लागले होते. मात्र तेथून परतल्यानंतर त्याला क्रीडा मंत्र्यांनी अशी समस्या भविष्यात उद्भवता कामा नये, अशी ताकीद दिली होती.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ‘स्लेजिंग’ची सवय मोडणार नाही- कॉलिंगवूड
लंडन, २९ जून/ वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना मैदानावर शेरेबाजी ( स्लेजिंग) न करण्याची ताकीद दिली असली तरी रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखालील संघातील खेळाडू आगामी अ‍ॅशेस मालिकेत शेरेबाजी करतीलच, असे मत इंग्लंडचा फलंदाज पॉल कॉलिंगवूड याने व्यक्त केले आहे. अ‍ॅशेस मालिकेला आठ जुलैपासून प्रश्नरंभ होत आहे.या मालिकेत खेळाडूंनी शेरेबाजी करू नये, अशी सक्त ताकीद ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना एका पत्राद्वारे दिली आहे. द टेलिग्राफ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कॉलिंगवूड याने म्हटले आहे की, मैदानावर प्रतिस्पध्र्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी शिवराळ भाषेत शेरेबाजी करण्याची सवय ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या नसानसात भिनलेली आहे. शेरेबाजी हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मंडळाच्या सल्ल्याला त्यांचे खेळाडू कितपत बधतील याबद्दल शंकाच आहे.

सायमण्ड्सला भोवली बिअर
मेलबर्न, २९ जून / वृत्तसंस्था

बिअर घेऊन रग्बीचा सामना पाहण्यास गेल्यामुळे अंॅड्रय़ू सायमण्ड्स याची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातून हकालपट्टी करण्यात आली, असे आता स्पष्ट झाले आहे.
इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघातून सायमण्ड्स याची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळातर्फे करण्यात आली. मात्र त्या वेळी त्याच्या हकालपट्टीचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. आता या घटनेला महिना पूर्ण होईल. खुद्द सायमण्ड्स यानेच आपली हकालपट्टी का करण्यात आली यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्याने म्हटले आहे, की न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलॅंड यांच्यातील रग्बी सामना पाहण्यासाठी मी एका पबमध्ये गेलो होतो. तो सामना पाहताना मी बिअर घेतली. सामना पाहून हॉटेलवर परतण्यास मला उशीर झाला. मी परत आलो त्या वेळी मला आपली संघातून हकालपट्टी करण्यात आल्याचे कळले. ‘चॅनेल नाइन’ ला दिलेल्या मुलाखतीत सायमण्ड्स याने आपल्या हकालपट्टीचे कारण विशद केले आहे. वारंवार बेशिस्त वर्तन करून आपण चाहत्यांच्या प्रेमाचा अवमान केल्याचे सायमण्ड्स याने या मुलाखतीत मान्य केले.