Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

सहस्रकापूर्वीचे ऐतिहासिक संचित, राहिले वंचित!
अजून नाही सरल्या आशा..
प्रशांत मोरे
दंतकथा, आख्यायिका आणि बखरींच्या भूलभुलैय्यातून खऱ्या इतिहासाचे कवडसे शोधणे तसे जिकिरीचे काम. ठाणे जिल्ह्याचे भाग्य असे की इथे तब्बल हजार वर्षापूर्वीच्या शिलाहार राजवटीतील अनेक खुणा इतस्तत: विखुरलेल्या आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर हे त्यापैकी एक ठळक उदाहरण. येत्या श्रावण शुद्ध नवमीस (गुरुवार, ३० जुलै) या मंदिराच्या उभारणीस ९४९ वर्षे पूर्ण होत आहेत. निश्चित तारीखवार माहिती असणारी महाराष्ट्रातील ही सर्वात प्रश्नचीन वास्तू. मात्र तब्बल हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या या खुणा जपून ठेवण्याबाबत, त्याची खरीखुरी महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत आजवर सार्वत्रिक उदासीनताच दिसून आली. परिणामी सहस्त्रकापूर्वीचे हे ऐतिहासिक संचित वंचितच राहिले आहे.

अनधिकृत बांधकाम आयुक्तांची गर्जना हवेतच विरली!
ठाणे/प्रतिनिधी : चार दिवसात अनधिकृत बांधकामास प्रश्नेत्साहन देणारे नगरसेवक आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची गर्जना हवेतच विरली आहे. उलट अनधिकृत बांधकामाबाबत एका पालिका पदाधिकाऱ्याविरोधात एनआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्यानंतरही पालिका अधिकारी मात्र पोलिसांना सहकार्य करण्यास तयार नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

पवारच्या नवीन घोटाळ्याचा आज होणार पर्दाफाश!
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली पालिकेतील लाचखोर उपायुक्त सुरेश पवार याचा आणखी एक नवीन घोटाळा स्थायी समितीच्या मंगळवारच्या सभेत उघड करण्यासाठी समिती सदस्यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. ज्या प्रकरणामुळे पवार लाच घेताना अटक झाला, त्या जाहिरात ठेक्याचा विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या पटलावर घेण्यात आला आहे. शहरातील जाहिरात फलकांचे कर वसुलीचा ठेका ३१ मार्च रोजी संपला होता.

बिल्डरच्या फायद्यासाठी नवीन रस्ता, नाल्याचा प्रस्ताव
ठाणे/प्रतिनिधी : बाळकुम भागातील एका बिल्डरच्या फायद्यासाठी लोकवस्तीतून नवीन रस्ता व नाला निर्माण करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव सर्वसाधारण सभेत हाणून पाडण्यात आला. एवढेच नव्हे तर, या वसाहतीचे बिल्डरनेच पुनर्वसन करावे आणि त्याच्याच खर्चातून रस्ता आणि नाल्याचे काम करावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. माजिवडा भागात लोढा बिल्डर्समार्फत मोठा गृहप्रकल्प उभारला जात आहे.

नांदणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
वाडा/वार्ताहर

तालुक्यात अतिदुर्गम व संपूर्ण आदिवासी क्षेत्रात असलेल्या नांदणी गायगोठा या अरविंद स्मृती संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेचा पहिल्याच वर्षीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याने जिल्हाभरातून या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांवर बक्षीस आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अरविंद स्मृती मंडळाची नांदणी गायगोठा येथे अनुदानित आश्रमशाळा असून, दहावीचा पहिल्याच वर्षीचा निकाल १०० टक्के लागला. दहावीमध्ये ३४ विद्यार्थी होते.

मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करा- माणिकराव ठाकरे
ठाणे/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसजनांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम केल्यास ठाण्यात पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त ठाकरे शहरात आले होते. एनकेटी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास शहराध्यक्ष कांती कोळी, ठाण्याचे प्रभारी हुसेन दलवाई, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश चिटणीस मनोज शिंदे, गटनेते नारायण पवार, रवींद्र फाटक आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काही नेते स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत असल्याने विधानसभा निवडणुकीतही समविचारी पक्षांशी आघाडी होईल, असे नमूद करून आपल्या ताकदीनुसार जिल्ह्यातून विधानसभेच्या जागांवर हक्क सांगितला जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले. मतभेद गाडून टाका, असे ठाकरे यांनी सांगितले तरी अकार्यक्षम व निष्क्रिय शहराध्यक्ष कांती कोळी यांना ताबडतोब बदला, अशी मागणी एका गटाने त्यांच्याकडे केलीच!

जव्हार प्रकल्पामधील आठ आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के
वाडा/वार्ताहर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येत असलेल्या आठ शासकीय आश्रमशाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर प्रकल्पातील इतर बहुतांशी शाळांचा निकाल ८५ टक्क्यांहून अधिक लागला आहे. अनेक अडचणींशी सामना करून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व या आश्रमशाळांमधील शिक्षकवर्ग, कर्मचारी वर्ग यांचे जव्हार प्रकल्प अधिकारी आय.एन. खाटिक यांनी अभिनंदन केले आहे. जव्हार प्रकल्पांतर्गत २५ शासकीय आश्रमशाळा १३ अनुदानित आश्रमशाळा असून, शासकीय आश्रमशाळांमधील विनवळ, देहरे, वांगणी, कारेगाव, गोंदे, कऱ्हे या सहा आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर अनुदानितमधील आडोशी, नांदणी गायगोठा या दोन आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जव्हार प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व आश्रमशाळांमधून ९३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधील ८५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रकल्पाचा एकूण निकाल ९३.१८ टक्के लागला आहे.शिक्षकांनी, तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळेच सर्वच आश्रमशाळांचे निकाल हे उत्कृष्ट लागल्याची प्रतिक्रिया खाटिक यांनी व्यक्त केली.

कसारामध्ये पेट्रोलपंप सुरक्षारक्षकाची हत्या
शहापूर/वार्ताहर

काही किरकोळ कारणाच्या वादावरून पेट्रोलपंप मालकाच्या मुलाने पेट्रोलपंप सुरक्षारक्षकाचा डोक्यात फावडा घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना कसाराजवळ घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील लतीफवाडीजवळील बाबा का ढाबा येथे ही घटना घडली. कसारा घाटातील लतीफवाडी येथील बाबा का ढाबाजवळच पेट्रोलपंप आहे. दोन्ही एकाच मालकाचे आहेत. आज पेट्रोलपंप मालकाचा मुलगा मनोज राजदीप शर्मा (२८) याने सुरक्षारक्षक व ढाब्याचा मॅनेजर इंद्रजित शर्मा (६५) यांना रूममध्ये बोलाविले व त्यांची बोलाचाली झाली. त्यानंतर मनोज शर्मा याने इंद्रजित शर्मा याच्या डोक्यात फावडा टाकून ठार केले व नाशिकच्या दिशेने पलायन केले. या पेट्रोलपंपाजवळ सुरक्षेसाठी दोन पोलीस असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजूनही पेट्रोलपंप मालकाचा मुलगा फरारी आहे. पोलिसांनी त्याची मारुती स्विफ्ट गाडी जप्त केली आहे.

गोळवलीत तीन रिव्हॉल्व्हर जप्त
कल्याण/वार्ताहर

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी डोंबिवलीमधील गोलवली गावातील अरुण पाटील व प्रदीप पाटील या जोडगोळीकडून तीन रिव्हॉल्व्हर व पाच काडतुसे हस्तगत केली आहेत.पोलीस निरीक्षक राहुलकुमार येवले यांनी विनापरवाना हत्यार विरोधात जोरदार मोहीम काढली असून यासाठी पोलीस उपनिरीक्षक उत्तम चके, पोलीस हवालदार चौघुले, पोलीस नाईक राजन मोरे, शाम रसाळ, शरद पाटील यांचे खास पथक तयार केले आहे. या पथकाने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा हॉटेलनजीक अरुण पाटील याला संशयावरून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर व पाच काडतुसे मिळाली. पोलिसी खाक्या दाखविताच आपण रिव्हॉल्व्हर, पिस्तूल व गावठी कट्टा व पाच काडतुसे बिहारमधील राजूसिंगकडून १५ हजार रुपयाला स्वसंरक्षणासाठी घेतले असल्याचे सांगितले. यातील एक पिस्तूल आपण प्रदीप पाटील याच्याकडे ठेवण्यास दिले असल्याचे सांगितल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

बेडेकर हायस्कूलचा दहावीचा निकाल ९२ टक्के
ठाणे/प्रतिनिधी

येथील डॉ. बेडेकर विद्यामंदिर (माध्य.) शाळेचा दहावीचा निकाल ९२.५७ टक्के लागला असून अद्वैत संजय इनामदार हा विद्यार्थी ६५० पैकी ६११ गुण (९४ टक्के) मिळवून शाळेत प्रथम आला आहे. विशेष म्हणजे अद्वैतची आई विजया रामचंद्र गोखले याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून १९७५ च्या पहिल्या बॅचमधून शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका उषा कळमकर यांनी अद्वैतचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. ८१ विद्यार्थी विशेष श्रेणी व ९१ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

१२ जुलै रोजी ठाणे वर्षा मॅरेथॉन
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी ‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ ही राष्ट्रीय व प्रश्नदेशिक स्तरावरील स्पर्धा येत्या १२ जुलै २००९ रोजी होणार असल्याचे मुख्य आयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी सांगितले.मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा २० वे वर्ष असून, आंतरराष्ट्रीय निकष व नियमांप्रमाणे तिचे आयोजन करण्यात येते, असा आयोजकांचा दावा आहे. निरनिराळ्या वयोगटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा खुली असून, १८ वर्षांखालील मुला-मुलींकरिता सात किलोमीटर, १४ वर्षांखालील धावपटूंसाठी तीन किलोमीटर, तर अपंग धावपटूंसाठी एक किलोमीटरची ही स्पर्धा आहे.राज्य व राष्ट्रीय स्तरावर ४२.१२५ किलोमीटर ही पूर्ण मॅरेथॉन, तर २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशी महिला खेळाडूंसाठी, तर राज्यस्तरावर १० किलोमीटरचा पुरुष खुलागट आणि रिले मॅरेथॉनचे राष्ट्रीय स्तरावरील ४२.१९५ किलोमीटर धावण्याचे आयोजन या स्पर्धेत केले जाणार आहे. ‘देशासाठी धावू या’ ही दोन किलोमीटरची स्वतंत्र स्पर्धाही यावेळी होणार आहे.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे. इच्छुकांनी २५४२२८५७ किंवा thanemarathontrust@yahoo.comया ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रधान यांनी केले आहे.