Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

व्यक्तिवेध

अमेरिकेचा मुस्लिम चेहरा म्हणून यापुढे एका महिलेची ओळख करून दिली जाणार आहे. तिचे नाव आहे फराह पंडित. अमेरिकेच्या परराष्ट्रविषयक राजकारणात समाविष्ट करण्यात आलेला हा एक भारतीय चेहरा आहे. फराह पंडित यांना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी मुस्लिम समाजासाठी अमेरिकेच्या खास प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात कुणा एका समाजासाठी प्रतिनिधी नेमायची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच कैरो विद्यापीठात केलेल्या भाषणात नव्या बदलाचे सूतोवाच केले होते, त्याला धरूनच फराह यांना जगातल्या दीडशे कोटी मुस्लिम समाजाच्या खास प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले. विशेष म्हणजे ओबामा यांचे ते भाषण ज्या महिलेने तयार केले तिचे नाव आहे

 

अफिफा सईद. अफिफा सईद आणि फराह पंडित या दोघींचा जन्म काश्मीरमध्ये आणि तोही सोपोर या गावी झाला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये असणाऱ्या सोपोरमधून आई-वडिलांनी अमेरिकेत स्थलांतर केले. फराह यांचे आई-वडील १९६९ मध्ये, तर अफिफा यांचे आई-वडील १९७३ मध्ये अमेरिकेत गेले. फराह पंडित यांनी या नव्या नियुक्तीपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या युरोपविषयक सल्लागार म्हणून काम केले आहे. युरोपमधल्या मुस्लिम समाजाचा अमेरिकेबरोबर सलोखा निर्माण करण्याचे काम जॉर्ज बुश यांच्या प्रशासन काळात त्यांनी केले. या कार्यकाळात त्यांनी युरोपमधल्या मुस्लिमांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. २००४ ते २००७ दरम्यान त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीवर व्हाईट हाऊसमध्ये काम केले. हिंस्र दहशतवाद आणि पश्चिम आशिया यासंदर्भात त्यांनी तेव्हा काम पाहिले. २००३-०४ या काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ या संस्थेवर काम पाहिले. याच कारकीर्दीत त्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मुक्काम केला होता. सरकारमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी ‘इंटरनॅशनल बिझनेस फॉर एमएल स्ट्रॅटेजीज, एलएलसी’ या बोस्टनमधल्या सल्लागार कंपनीचे उपाध्यक्षपद सांभाळले होते. त्यांनी स्वत: ‘लॉ अॅन्ड डिप्लोमसी’ विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आग्नेय आशिया आणि इस्लामी संस्कृती हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय आहेत. मॅसॅच्युसेट्सच्या नॉर्दअॅम्पटनच्या स्मिथ कॉलेजमधून मानसशास्त्र विषयात त्यांनी प्रावीण्य मिळविले. १९८६ मध्ये त्यांनी मिल्टन अॅकॅडमीतून पदवी प्राप्त केली. फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसीच्या व्यवस्थापन समितीवर त्या सध्या काम पाहात होत्या. मिल्टन कॉलेजच्या विश्वस्तांमध्येही त्या आहेत. फ्लेचर क्लबच्या त्या अध्यक्ष आहेत. याखेरीज असंख्य पदांवर त्यांनी काम केले आहे. ‘वॉशिंग्टोनियन’ या नियतकालिकात त्यांचा अलीकडेच ‘वॉर ऑफ आयडियाज’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. ‘काश्मीरमधील बंडखोरी’ या विषयाचाही त्यांचा विशेष अभ्यास असून हाच विषय त्यांनी पदव्युत्तर पदवीच्या प्रबंधासाठी निवडला होता. काश्मीर प्रश्नावर बराक ओबामांचे खास प्रतिनिधी म्हणून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना निवडले जाणार, अशी शक्यता काही काळ चर्चेत होती. आता परराष्ट्रमंत्रिपदावर असणाऱ्या त्यांच्या पत्नी हिलरी यांनी संपूर्ण मुस्लिम जगतासाठीच काश्मिरी चेहऱ्याची निवड केली आहे. फराह यांनी ‘दहशतवाद’ या विषयावर दोन वर्षांपूर्वी लंडनच्या हेन्री जॅक्सन सोसायटीत केलेले भाषण पुष्कळच गाजले होते. मुस्लिमांनी मुख्य प्रवाहापासून फटकून वागू नये, असे विचार त्यांनी तेव्हा व्यक्त केले होते. आता मुस्लिमांना अमेरिकेच्या अधिक जवळ आणायची संधी त्यांना मिळाली आहे. फराह पंडित यांच्या नियुक्तीनंतर सोपोरमध्ये राहणाऱ्या चुलत भावंडांना अतिशय आनंद झाला आहे. सौदी अरेबियातल्या मुस्लिम महिलांनीही या निवडीचे स्वागत केले आहे.